तरुण भारत

जोकोविच, केनिन-मुगुरुझा अंतिम फेरीत

मेलबर्न :

सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने रॉजर फेडररचा पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. महिलांमध्ये अमेरिकेच्या फारशी परिचित नसलेल्या सोफिया केनिने अग्रमानांकित ऍश्ले बार्टीचे आव्हान संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली तर गार्बिन मुगुरुझानेही अंतिम फेरी गाठताना विम्बल्डन विजेत्या सिमोना हॅलेपला स्पर्धेबाहेर घालविले.

Advertisements

रॉजर फेडररला आधीच्या फेरीपासूनच धोंडशिरेची दुखापत झाली होती. त्याचा फटका या सामन्यातही झाल्याने त्याच्या कोर्टवरील हालचालीवर मर्यादा आल्या होत्या. पहिल्या सेटमध्ये दोनदा जोकोविचला दोनदा झुंज द्यावी लागली. हा सेट टायबेकरवर जिंकल्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. मेडिकल टाईमआऊट घेतल्यानंतर फेडररचा प्रतिकार नंतर मंदावत गेला आणि जोकोविचने ही लढत 7-6 (7-1), 6-4, 6-3 अशी जिंकून अंतिम फेरी गाठली. ‘रॉजर आज खेळण्यासाठी कोर्टवर आला, मी त्याचा आदर आहे. तो जखमी होता. त्यामुळे कोर्टवर त्याच्या सर्वोत्तम हालचाली होत नव्हत्या,’ असे जोकोविच सामन्यानंतर म्हणाला. जोकोविचने आजपर्यंत एकदाही मेलबर्न पार्कवर उपांत्य किंवा अंतिम सामना गमविलेला नाही. डॉमिनिक थिएम व अलेक्झांडर व्हेरेव्ह यापैकी एकाशी त्याची जेतेपदासाठी लढत होईल. तो 17 व्या ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याच्या मार्गावर आहे.

बार्टीला धक्का, ऑस्ट्रेलियन्स निराश

महिला एकेरीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बार्टीला पराभवाचा धक्का बसल्याने ऑस्ट्रेलियन चाहत्यांची निराशा झाली आहे. 1978 नंतर ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटूला ही स्पर्धा अद्याप जिंकता आलेली नाही. 14 व्या मानांकित अमेरिकेच्या 21 वर्षीय सोफिया केनिनने प्रत्येक सेटमध्ये दोन सेट पॉईंट्स वाचवत तिला 7-6 (8-6), 7-5 असे नमवित अंतिम फेरी गाठली. शनिवारी तिची मुगुरुझाशी जेतेपदाची लढत होणार आहे. मॉस्कोमध्ये जन्मलेली केनिन या स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्यानंतर स्वतःही चकित झाली होती. या स्पर्धेत ती नेहमीच दुर्लक्षित राहते तर सेरेना विल्यम्स व 15 वर्षीय कोको गॉफ सर्वांचे नेहमीच लक्ष वेधून घेतात. ‘मला काही बोलताच येत नाही, अशी माझी स्थिती झालीय. खरं सांगायचं तर मलाच यावर विश्वास बसत नाहीय. पाच वर्षांची असल्यापासून मी हे स्वप्न पाहत आले आहे आणि आज ते साकार झाले आहे. इथवर मजल मारण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे,’ असे केनिन म्हणाली. ती अगदी बालवयाची असतानाच तिच्या कुटुंबियांनी अमेरिकेला स्थलांतर केले होते.

हॅलेपची झुंज, पण मुगुरुझाची बाजी

महिलांच्या दुसऱया उपांत्य सामन्यात दोन वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेल्या स्पेनच्या मुगुरुझाने चौथ्या मानांकित हॅलेपचे कडवे आव्हान 7-6 (10-8), 7-5 असे संपुष्टात आणले. मुगुरुझाचा फॉर्म घसरल्याने तिला या स्पर्धेत मानांकन देण्यात आले नव्हते. दोन्ही सेटमध्ये ती पिछाडीवर पडली होती. पण नंतर मुसंडी मारत तिने विजय साकार केला. ‘मी मागे पडलेय याचा अजिबात विचार केला नाही. फक्त खेळत राहणे, एवढेच मी करीत होतो. कारण एका टप्प्यावर मला नक्कीच संधी मिळेल, असे माझी धारणा होती,’ असे मुगुरुझा नंतर म्हणाली. ‘सुदैवाने अंतिम लढतीआधी 48 तास मिळणार आहेत. मला सज्ज होण्यासाठी एवढा अवधी पुरेसा आहे. कारकिर्दीत आम्ही सर्वच जण या कोर्टवर आणि एवढय़ा मोठय़ा गर्दीसमोर खेळण्यासाठीच तयारी करीत असतो. ही संधी आता मला मिळाली आहे,’ असेही केनिन म्हणाली.

Related Stories

ऑस्ट्रेलियन संघात 5 पदार्पणवीर

Patil_p

रियल माद्रीदचा मिलीटो कोरोना बाधित

Patil_p

इंडिया ज्युनियर्स महिला हॉकी संघ विजयी

Patil_p

आयपीएलमधील कॅरेबियन खेळाडू मायदेशी परतले

Patil_p

पाकचा दक्षिण आफ्रिकेवर मालिका विजय

Patil_p

झिंबाब्वे संघाच्या कर्णधारपदी चिभाभाची निवड

Patil_p
error: Content is protected !!