तरुण भारत

कोरोना संकटामुळे प्राण्यांचा जीव धोक्यात

चीनमधील धक्कादायक प्रकार : अफवांमुळे पाळीव प्राण्यांची होतेय हत्या : विषाणू संसर्गासंबंधी अफवांचे पेव

वृत्तसंस्था/ वुहान 

Advertisements

चीनमध्ये फैलावलेल्या कोरोना विषाणूचे भय जगभरात दिसून येत आहे. लोकांसोबत आता कोरोना विषाणू प्राण्यांसाठीही संकट ठरला आहे. विशेषकरून चीनच्या काही भागांमध्ये पाळीव प्राण्यांच्या जीवावर बेतले आहे. हा विषाणू प्राण्यांमधूनही फैलावू शकतो हे समजल्यावर लोक पाळीव प्राण्यांना घरापासून दूर सोडू लागले आहेत.

बहुमजली इमारतींमध्ये राहणारे लोक या पाळीव प्राण्यांपासून कायमस्वरुपी मुक्ती मिळवत आहेत. इमारतीच्या बाल्कनीमधून फेकण्यात येत असल्याने पाळीव प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. मागील काही दिवसांमध्ये चीनमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. स्थानिक पोलिसांना रस्त्यांवर मृत आढळणाऱया पाळीव प्राण्यांसंबंधी अनेक तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत.

हैबेई प्रांताच्या तियानजिन शहरात एका पाळीव श्वानाला उंच इमारतीवरून फेकण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अशाच प्रकारे शांघायमध्ये 5 मांजरांना बहुमजली इमारतीवरून फेकत ठार मारण्यात आले आहे. स्वतःच्या घरांमध्ये बेडवर पाळीव प्राण्यांना गोंजारणो लोक आता मुक्या जीवांचे आयुष्य संपवू लागले आहेत.

टीव्ही वाहिन्यांद्वारे जागरुकता

अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्यावर चीनच्या शासकीय वृत्तवाहिनीने पाळीव प्राण्यांसंबंधी जागरुकतेचे कार्य हाती घेतले आहे. पाळीव प्राणी संशयित रुग्णाच्या संपर्कात आल्यास वेगळे ठेवले जावे, त्याला मारण्याचा प्रयत्न होऊ नये असे डॉ. लंजुआन यांनी म्हटले आहे. काही स्थानिकांनी अफवा पसरविल्याने चिनी नागरिकांमधील भीती वाढल्याने लोक प्राण्यांची हत्या करू लागले आहेत. अफवा रोखण्यासाठी चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कने जागतिक आरोग्य संघटनेचे निवेदन प्रसिद्ध केले आहे.

पेटा आशियाने उठविला आवाज

प्राण्यांची हत्या करणाऱयांचा पोलीस लवकरच छडा लावतील. चीनच्या वुहान मांसबाजारातून विषाणू पसरल्याचे मानले जात असले तरीही याचे पुरावे मिळालेले नाही. पाळीव प्राण्यांना या विषाणूचा वाहक मानत लोकांनी त्यांचा जीव घेण्यास प्रारंभ केल्याचे विधान पेटा आशियाचे पदाधिकारी कीथ गुओ यांनी केले आहे.

काही अपवाद देखील…

काही पाळीव प्राण्यांचे मालक स्वतःच्या प्राण्यांसाठी मास्क खरेदी करत असल्याचेही सुखद चित्र दिसून येत आहे. संबंधित लोक स्वतःसह प्राण्यांनाही या विषाणूपासून वाचवू पाहत आहेत. पाळीव प्राणी या विषाणूला बळी पडू शकतात असा इशारा देण्यात आल्याने त्यांच्यासाठी मास्क खरेदी केले जात आहेत. बीजिंगमध्ये काही दुकानदार प्राण्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या मास्कची विक्री करत आहेत.

 

Related Stories

नासाच्या इनजेन्युइटीचा मंगळ ग्रहावर विक्रम

Patil_p

हल्ल्यांमुळे न्यूयॉर्कमध्ये दहशत, सुरक्षेत वाढ

Patil_p

इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलीप यांचे निधन

triratna

जर्मन उद्योग कणखर

Omkar B

चीन : विमानात शौचालयाऐवजी डिस्पोजेबल डायपरचा वापर करा

datta jadhav

दुसऱया लाटेचा इशारा

Patil_p
error: Content is protected !!