तरुण भारत

खेळाचे महत्त्व जाणूया…

काही कामानिमित्त परगावी जाणे झाले. संध्याकाळी गावामध्ये फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. अतिशय सुंदर, सुबक असे ते टुमदार गाव! आजूबाजूचा परिसर न्याहाळत असताना नजर एका जागी स्थिरावलीच. तिथे एक भलामोठा वटवृक्ष होता, त्याच्या पारंब्यांनी जमिनीचा अर्धाअधिक भाग व्यापला होता. त्यातील दोन पारब्या मुलांना अगदी खेळण्यायोग्य होत्या. आठ दहा मुले तिथे मनसोक्त खेळत होती, हसत होती. दोघा दोघानाच तिथे खेळता येत होते. बाकीची मुले टाळय़ा वाजवून गाणी म्हणायची, धावायची असा त्यांचा खेळ सुरू होता. तेवढय़ात त्यातील दोन मुले पारंब्यांवर खेळण्यासाठी मधेच भांडू लागली. मुले जास्त असल्यामुळे सगळय़ांना एकाचवेळी पारंब्यांवर झोके घेणे शक्मय नव्हते. मग त्यातीलच दोन मुलांनी सगळय़ांना खेळायला मिळण्यासाठी एक युक्ती शोधून काढली. ती मुले छान गोलाकार उभी राहिली आणि त्यांनी एक नियम केला, दोनच्या पटीमधील अंक क्रमाक्रमाने म्हणायचे, जो चुकेल तो बाद होणार आणि सर्वात शेवटी त्याला पारंब्यांवर खेळायला मिळणार. सगळय़ांना नीट खेळता कसे येणार हा प्रश्न त्यांचा त्यांनीच चुटकीसरशी सोडवला आणि ती परत खेळात रंगून गेली. थोडय़ावेळाने लपाछपी सुरू झाली. सगळे खेळ अगदी उत्साहात सुरू होते. कित्येक दिवसांनी अशा पद्धतीने मनसोक्त खेळणारी मुले पाहिली आणि समाधान वाटले.

खेळ वा खेळ खेळणे हे खरंतर मुलांचे
टॉनिक आहे. व्यक्तिमत्व विकासात मोलाची भूमिका बजावणारा तो एक महत्त्वाचा घटक आहे. परंतु बदलती जीवनशैली, कमालीची स्पर्धा, काँप्युटर, मोबाईलने व्यापलेले विश्व, शाळा, अभ्यास, टय़ूशन, अदर ऍक्टिव्हिटीज या साऱयामध्ये व्यग्र असणारी मुले अशा प्रकारे खेळतात का? धावणे, कबड्डी, खो-खो, लपाछपी असेल वा अशा वेगवेगळय़ा पद्धतीचे खेळ कितीसे खेळले जातात, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.

Advertisements

खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. खेळणे जसे शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक आहे तसेच मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण आहे. नेहमी बोलत असताना ‘खेळ’ हा शब्द आपण वेगवेगळय़ा पद्धतीने वापरतो. खेळणे या अर्थी खेळ, खेळायचे ते खेळणे या अर्थी, खेळ करणे, खेळवणे, काय खेळ मांडलायस अशा विविध प्रकारे या शब्दाचा वापर होत असतो. खेळ अर्थात हा शब्द इंग्रजीमध्येही वेगवेगळय़ा अर्थाने वापरण्यात येतो. परंतु मध्ययुगीन इंग्रजीमध्ये ‘प्ले’ या शब्दाचा अर्थ आनंदासाठी घेतलेली झेप (A तज् दि रदब्), tद ज्त्aब् a gaस, tद ज्त्aब् aह ग्हूल्सहू, tद ज्त्aब् rदत, ज्त्aब् aह aम्t असा नोंदवलेला आहे. हा अर्थ अगदी योग्य आणि मनाला भावणारा आहे कारण खेळकरपणा वा खेळ या शब्दाला अभिप्रेत असणाऱया सर्व गोष्टी यातून व्यक्त होतात.

खेळ वा खेळणे या गोष्टी मुलांच्या शारीरिक-मानसिक जडणघडणीमध्ये, भावनिक विकासात खूप मोलाची भूमिका बजावतात. एकत्र येऊन खेळणारी मुले सतत विकासाच्या पुढच्या टप्प्याकडे जात असतात. अल्बर्ट आईनस्टाईनने तर खेळाला ‘अत्युच्च कोटीतले संशोधन’ म्हटले आहे. मुलांना जीवनसत्त्वाची जेवढी गरज असते तेवढीच खेळाचीही असते. खेळ खेळताना मुलांची कल्पकता वाढत असते. एकमेकांना समजून घेणे, जुळवून घेणे, आपण कोण आहोत, स्वतःचे महत्त्व, दुसऱयाचाही विचार, संवाद कौशल्य, समूहाचे नियम या साऱया गोष्टी मुले शिकत असतात. खेळ खेळताना मुले तो खेळ पाहतात, तशी कृती करून बघतात, निरीक्षण करतात, एखादी समस्या आली तर तीही सोडविण्याचा प्रयत्न करतात, विचार करतात. ज्यावेळी मुले एकत्र येऊन खेळतात त्यावेळी दुसऱया मुलाच्या भावना, गरजा विचारात घ्याव्या लागतात. म्हणजेच दुसऱयाला समजून घेणे, जुळवून घेणे अर्थात समायोजन या महत्त्वाच्या गोष्टी तिथे आकार घेत असतात.

गंमत म्हणजे एखादा खेळ खेळताना मुले काही नियम करतात आणि ते नियम अगदी काटेकोरपणे पाळतातही. उदा. सुरुवातीच्या उदाहरणातील त्या मुलांनी सर्वांना खेळायला मिळावे यासाठी दोनच्या पटीतील अंक म्हणत जो चुकेल तो बाद-आऊट. असे करत आऊट होणाऱयाने शेवटी खेळायचे अशा पद्धतीने क्रमवार नंबर लावत तसा नियम केला आणि तो पाळलाही! मुलांचे अटेन्शन वाढविणारा हा खेळ ती नकळत खेळत होती. प्रयत्नपूर्वक तिथे लक्ष केंद्रीत करत होती. दोन पारंब्यावर सगळय़ांनी कसे खेळायचे वा सर्वांना खेळायला मिळणार कसे या प्रश्नाचे उत्तर त्यांचे त्यांनीच शोधून काढले होते. म्हणजेच खेळामुळे निर्णय घेणे, स्वतः एखादे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्याचीही मानसिकता तयार होत असते.

खेळल्यामुळे मुलांच्या मनावरील ताण हलका होतो. शारीरिक व्यायाम तर होतोच, हालचाल होते याचा मेंदूवरही सकारात्मक परिणाम होतो. मेंदूला प्राणवायूचा पुरवठा वाढतो. त्यामुळे बौद्धिक क्षमतेतही वाढ होते. मेंदूला त्रास देणारे ‘फ्री रॅडिकल्स’ कमी होतात. मेंदूतील पेशींचेही आयुष्य वाढते, ताण सहन करण्याची क्षमता वाढते. खेळांचे विविध प्रकार अर्थात शारीरिक खेळ, रचनात्मक खेळ, सांघिक खेळ, रोल प्ले (म्हणजे मुले शाळा-टीचर वा अशा वेगवेगळय़ा भूमिका वठवत खेळले जाणारे खेळ) संवादात्मक खेळ (जसे अंताक्षरी, गोष्ट पूर्ण करा, यक्षप्रश्न इ.), अन्य वेगवेगळे क्रीडाप्रकार असतील, एकंदरच अशा पद्धतीने विविध खेळ खेळणे मुलांना खऱया अर्थी विकासाच्या टप्प्यावर नेत असते.

अलीकडच्या काळामध्ये अनेक कारणांमुळे अशा प्रकारचे खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झालेले आढळते. टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटरवरील गेममध्ये मुले जास्त रमताना दिसतात. अगदी गावापासून शहरापर्यंत सर्वत्र कमी अधिक प्रमाणात हे चित्र पहायला मिळते. मोबाईलचे व्यसन, आत्मकेंद्री होणारी मुले त्यातून निर्माण होणाऱया समस्या याचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. मुलांच्या बालपणापासून याबाबतीत सजग राहात आभासी जगात रमण्यापेक्षा एकत्र येऊन मुलांनी वेगवेगळय़ा पद्धतीचे खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

समन्वयाची भावना, आत्मविश्वास, शारीरिक-मानसिक व्यायाम, आत्मनिर्भरता, समस्या सोडविण्याचे कौशल्य, व्यक्त होणे आणि दुसऱयाला समजून घेणे, तणाव कमी करणे या आणि यासारख्या अनेक गोष्टींसाठी निदान दिवसातून एक तास तरी मनसोक्त खेळणे आवश्यक आहे. आयुष्यामध्ये खेळकरपणा, आनंद जपत संतुलित व्यक्तिमत्त्वाकडे वाटचाल करायची असेल तर खेळाचे महत्त्व जाणायला हवे हे मात्र खरे!

Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583

Related Stories

इम्युनिटी

Patil_p

देहातील आत्मा बंधनात आहे की मुक्त?

Patil_p

स्वयंव्याधी निवारणाचा सिद्धांत

Patil_p

चांदण्या शिंपीत जाशी

Patil_p

शॅनॉनचा लढा आणि गुगलची माघार

Patil_p

तूंहे तयांसि होयीं शरण

Patil_p
error: Content is protected !!