तरुण भारत

राज्याच्या महसूली उत्पन्नात 15.80 टक्क्यांनी वाढ

आर्थिक सर्वेक्षण अहवाल विधानसभेत सादर

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील बँकांमध्ये ठेवींची रक्कम 6222 कोटींनी वाढली आहे. मात्र कर्ज पुरवठा त्या तुलनेत घसरलेला आहे. राज्याच्या महसुली उत्पन्नात 15.80 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत महसुली खर्चात 13.03 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. राज्यातील 10 हजार हेक्टर शेतजमीन सेंद्रीय पद्धतीच्या लागवडीखाली आणण्याचेही उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज गुरुवारी दुपारी गोव्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गोव्याची वित्तीय परिस्थितीचा ‘आर्थिक सर्वेक्षण’ अंतर्गत अहवाल त्यांनी काला बुधवारी राज्य विधानसभेत सादर केला. मागील वर्षीचा अर्थसंकल्प हा 455.10 कोटी रुपयांच्या शिलकीचा अर्थसंकल्प होता.

केंद्रीय कराच्या गोव्याच्या वाटय़ात 12 टक्के वाढ

राज्याचा महसूल वाढल्याचा दावा या सर्वेक्षणाद्वारे करण्यात आला आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात राज्याचा महसूल 12193.79 कोटी रुपयांचा आहे. 2018-19 च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यात 15.80 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. करांमध्ये 10.12 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. राज्य सरकारच्या स्वत:च्या करात 9.06 टक्क्यांनी वाढ झाली. केंद्रीय करातील गोव्याच्या वाटय़ामध्ये 12 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. राज्याचा करविरहित महसूल 3100.59 कोटी रु. एवढा झाला आहे. राज्याचा एकंदरीत महसूली खर्च 11739.69 कोटी रुपयांचा होईल, असा अंदाजही व्यक्त केला आहे.

राज्यात बँक ठेवींच्या रकमेत वाढ

राज्यात 53 बँकाच्या मिळून 824 शाखा आहेत. 1770 माणसांमागे बँकेची एक शाखा असे त्याचे प्रमाण आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात अर्थात 3 सप्टेंबर 2019 पर्यंत राज्यात 78.704 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत रु. 6272 कोटींनी त्यात वाढ झालेली आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत 23712 कोटी रु. ची कर्जे देण्यात आली.

राज्यातील दुग्धोत्पादनात वाढ

राज्यात होऊ घातलेल्या मोपा विमानतळ प्रकल्पाच्या पूर्ततेस आता थोडा विलंब लागणार आहे. कारण प्रकरण न्यायालयात गेले होते व अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने त्यावर निर्णय दिलेला आहे. राज्य सरकार राज्यातील 12 हजार शेतकऱयांच्या मदतीने 500 विविध गट स्थापन करून त्याद्वारे 10 हजार हेक्टर शेतजमीन जैविक शेतीअंतर्गत लागवडीत आणणार आहे. डिसेंबर 2019 पर्यंत राज्यातील दुग्धोत्पादनात वाढ झाली. 81655 लिटर प्रतिदिन 2018-19 वरून 2019-20 मध्ये हे प्रमाण 82339 लिटर प्रतिदिन असे झाले आहे.

विदेशी पर्यटकांच्या प्रमाणात 3 टक्क्यांनी वाढ

राज्यातील पर्यटन व्यवसायाबाबत आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे की, 2019-20 या वर्षात 42 लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. त्यात 37.07 लाख देशी आणि 4.93 विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. विदेशी पर्यटकांच्या प्रमाणात 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

वाहनांची संख्या घटली

राज्यातील वाहनांच्या संख्येत दरवर्षी सरासरी सुमारे 80 हजार नव्या वाहनांची भर पडत असते. चालू आर्थिक वर्षी मात्र मोठी घसरण निर्माण झाली आहे. 2016-17 मध्ये 80403, 2017-18 मध्ये 86119, 2018-19 मध्ये 75085 तर यंदा डिसेंबर 2019-20 पर्यंत केवळ 46352 वाहनांची नव्याने नोंदणी झालेली आहे. राज्यात सध्या 14 लाख 55 हजार वाहनांची नोंद आहे. सर्वाधिक 71 टक्के वाहने ही दुचाकी आहेत तर 22.57 टक्के वाहने ही चार चाकी आहेत.  

अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज राज्याचा 2020-21 चा अर्थसंकल्प राज्य विधानसभेत मांडणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच ते अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्यावर्षी मुख्यमंत्री राहिलेले मनोहर पर्रीकर आजारी होते. त्यांच्या वतीने अर्थसंकल्पाची प्रत मांडण्यात आली होती. आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अर्थसंकल्पीय भाषण दुपारी 2.30 वा. सुरू करतील, असा अंदाज आहे. राज्य विधानसभेत आज अनेक कामे असली तरी देखील अर्थसकल्प सादर करणे हे अत्यंत महत्वाचे काम असल्याने मुख्यमंत्री सावंत हे भोजनोत्तर कामकाजाच्या वेळी म्हणजेच 2.30 वा. अर्थसंकल्प सादर करतील, असा अंदाज आहे. मुख्यमंत्री अर्थसंकल्प नेमका काय मांडणार आहेत. याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. बुधवारी त्यांनी अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरविला. तत्पूर्वी आज दुपारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावली असून त्यात मुख्यमंत्री इतर मंत्र्यांना कल्पना देतील.

Related Stories

राज्यस्तरीय शिक्षक दिन कार्यक्रम पुढे ढकलला

Patil_p

खांडोळा येथे वीज ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन

Patil_p

बाबू आजगावकर यांना पदावरून हटवा

Patil_p

जहाजांवर अडकलेल्या 8 हजार गोमंतकीयांच्या सुटकेचे प्रयत्न

Patil_p

मेळावली वनसंपदेच्या रक्षणासाठी उद्या महिलांचे रक्षाबंधन

Omkar B

वाडे वास्कोतील तळय़ाच्या देखभाल प्रश्नावरून पुन्हा वाद

Patil_p
error: Content is protected !!