तरुण भारत

मंतरलेले चैत्रबन…असा असामी

गदिमा, पुल जन्मशताब्दी गौरवग्रंथातून या दोन दिग्गज कलावंतांच्या कलासक्त व्यासंगाचा आपल्याला प्रत्यय येतोच परंतु या ग्रंथांचे संपादक प्रा. रणधीर शिंदे आणि प्रा. राजशेखर शिंदे यांचीही व्यासंगी संपादकीय दृष्टी स्पष्ट होते. या ग्रंथांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना आवर्जून वाचायला हव्यात.

स्वातंत्र्योत्तर कालखंडात मराठी रसिक मनावर ज्यांनी सर्वाधिक अधिराज्य गाजवले त्यात ग.दि.माडगुळकर  आणि पु.ल. देशपांडे या दोन कलावंतांचा अग्रक्रम लागतो. ही दोन व्यक्तिमत्त्वे प्रतिभेने स्वतंत्र होती तरी लेखन आणि संगीत हा या दोघांचा खरा जीवनप्रवास. गदिमा मराठी चित्रपटसृष्टीतील मंत्ररलेले चैत्रबन तर पुलं हे समाजातील व्यंगावर बोट ठेवणारे अवलिया बहुरूपी. दोघांच्या जन्मशताब्दी निमित्ताने समीक्षक प्रा.डॉ.रणधीर शिंदे यांच्या संपादनाखाली गदिमा यांच्यावर आणि समीक्षक प्रा.डॉ.राजशेखर शिंदे यांच्या संपादनाखाली पुलंवर अभ्यासपूर्ण गौरवग्रंथ साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित करण्यात आले आहेत. या दोन्ही संपादनातून  गदिमा आणि पुल यांच्या कलासक्त व्यासंगाचा आपल्याला प्रत्यय येतोच परंतु प्रा. रणधीर आणि प्रा.राजशेखर यांचीही व्यासंगी संपादकीय दृष्टी स्पष्ट होते. या ग्रंथांच्या या दोघांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना आवर्जून वाचायला हव्यात.

Advertisements

‘मंतरलेले चैत्रबन’ शीर्षकाने गदिमांवर तर ‘असा असामी’ शीर्षकाने पुलंवर हे गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. गदिमांचा स्वातंत्र्यलढय़ात सहभाग होता. त्यांनी स्वातंत्र्यगीते लिहिली. पुढे ते चित्रपटसृष्टीत विसावले आणि सर्व प्रकारच्या चित्रपट गीतलेखनातून गीतलेखनाचा त्यांनी विक्रमच केला. पटकथाही लिहिली. हिंदी चित्रपटालाही योगदान दिले. कादंबरी, कथा, नाटक, ललित असे लेखन करतानाच एक अभिनेता म्हणूनही त्यांनी लक्ष वेधून घेतले. गदिमांच्या या अभिरुचीने मराठी रसिकमनाचे पोषण आणि संवर्धन झाले. या सगळय़ा वाटचालीचा अभ्यासपूर्ण धांडोळा म्हणजे ‘मंतरलेले चैत्रबन’ गौरवग्रंथ. पुलं म्हणजे मराठी रसिकतेला पडलेले एक सुंदर स्वप्न. लेखन, अभिनय, संगीतातील एक आनंदयात्री. केवळ व्यक्तीचित्रण, प्रवासवर्णन आणि नाटय़लेखन करून मराठी वाचकमनावर पाऊणशे वर्षाहून जास्त काळ अधिराज्य गाजवणारा पुरुषोत्तम. पुलंनी नवरसाचे घुंगर बांधलेल्या वाणीने मराठी साहित्याला समृद्ध केले. त्यांचे हे कर्तृत्व मध्यमवर्गाची कित्येक पिढय़ांची अपूर्वाई. ही अपूर्वाई जपणे म्हणजेच त्यांच्या असामी लेखन कर्तृत्वाचे स्मरण करणे होय! प्रा. रणधीर गदिमा गौरवग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हणतात, गदिमांना एक लोकप्रिय लेखक व गीतकार म्हणून मोठी प्रतिष्ठा मिळाली. इतके बहुविध समाजप्रिय लेखन करणाऱया लेखकाच्या साहित्याचे स्वरूप आणि त्याचे काही एक पुनर्मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने ‘मंतरलेले चैत्रबन’ ग्रंथ महत्त्वाचा आहे. एखाद्या लेखकाला त्याचा समकाल आणि उत्तरकाल सांस्कृतिक पर्यावरणावर कसे समजून घेते, तेही यातून दिसणार आहे. तसेच गदिमांच्या लेखनसंबंधाने मराठी साहित्यचर्चेत काही मूलभूत प्रश्न निर्माण झाले, त्याचाही काही प्रमाणात उलगडा होऊ शकतो. कवी आणि गीतकार, सुबोध आणि दुर्बोधता, आधुनिकता आणि परंपरा, गंभीर आणि लोकप्रियता अशा प्रश्नांचा उलगडा ग्रंथातील विविध लेखनातून होईल. लेखकाचे आकलन आणि मूल्यमापान मांडत असताना ते समग्रपणे मांडता येते का? की त्यातले काही दुवे मांडता येतात हेही पाहता येते. तसेच त्या लेखकाच्या काही अलक्षित सामर्थांचाही नव्याने पुनर्शोध होऊ शकतो याची दिशा या संपादन लेखांतून मिळू शकते. प्रा.रणधीर यांचा ‘लेखकांच्या अलक्षित सामर्थांचाही नव्याने पुनर्शोध होऊ शकतो’ हा अशा लोकप्रिय लेखकाबाबतचा अधिक महत्त्वाचा मुद्दा असून या संपादनातून गदिमांची विचार सैंदर्यदृष्टी अधिक ठळकपणे लक्षात येत जाते. पुलं गौरवग्रंथाच्या प्रस्तावनेत प्रा.राजशेखर म्हणतात, मध्यवर्गीय अभिरूचीचे दर्शन पुलंच्या साहित्यात घडते. ते आपली लेखकपणाची स्पेस घेतात. राजकीय अनागोंदी झाली तेव्हा लेखकाच्या भूमिकेचे दर्शन ते घडवतात. आणीबाणी विरोधात उभे राहतात. पुलं हा सर्वांच्या गळय़ातील ताईत. राजकारणी असोत, समाजकारणी असतो, सामान्य लोक असोत ते सर्वांचे लाडके होते. पण वेळ आल्यावर आपल्या स्थानाला धक्का लागेल याचा विचार न करता सरकारच्या न पटलेल्या कृतीविरोधात त्यांनी रान उठवले. समाजाच्या निर्णायक क्षणाला, समाजाच्या हितरक्षणाला कठीण प्रसंगी लेखकाने मार्गदर्शन केले पाहिजे. ही समाजाची साधी अपेक्षा असते. ती पुलंनी आणीबाणीतून पूर्ण केली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारताना लेखकपणाची भूमिका त्यांनी घेतली होती. खरंतर प्रा.राजशेखर यांनी प्रस्तावनेत पुलंचे लेखन आणि दातृत्व याविषयी विस्ताराने लिहिले असले तरी त्यातला हा पुलंच्या लेखन भूमिकेचा भाग अधोरेखित करण्यासारखा आहे. जो पुलंसारख्या लोकप्रिय लेखकाच्या लेखपणाच्या खुणा अधिक ठळक करत जातो. अर्थात प्रा. राजशेखर यांचीही ही संपादकीय दृष्टी महत्त्वाची आहे. ‘गदिमा मंतरलेले चैत्रबन’ हा ग्रंथ सोळा लेखन विभागात बांधण्यात आला आहे. यात एकंदर गदिमा, प्रदेश, कुटुंबीयांच्या नजरेतून, आठवणीतील गदिमा, राजकारणातले गदिमा, साहित्यिकांच्या नजरेतून, कविताविश्व, गीतरामायण, गीतकार माडगुळकर, कथात्म साहित्य, नाटय़लेखन, प्रवासवर्णन, बालसाहित्य, ललितगद्य, पटकथाकार आणि अभिनेते, वाङ्मयीन दृष्टीकोन अशा विषयांचा त्यात समावेश आहे. तर यशवंतराव चव्हाण, पु.ल.देशपांडे, शरद पवार, लता मंगेशकर, सुलोचना, शांता शेळके अशा मागच्या पिढीतील मान्यवरांबरोबरच प्रभा गणोरकर, चंद्रकांत पाटील, सुनिलकुमार लवटे, विनय हर्डीकर या समकालीन पिढीच्या आधीच्या लेखकांचे तसेच समकालीन पिढीतील दासू वैद्य, सुनिता बोर्डे, प्रसाद कुमठेकर अशा अनेकांच्या लेखनाचा यात समावेश आहे. पुलं असा असामी या ग्रंथाची दहा लेखन विभागात बांधणी करण्यात आली. यात पुलःएक बायोस्कोप, वाहती जीवनसरिता, एकटाच गातो मी आनंदाचे, गंधर्वाचे, दिव्यत्वाची येथे येते प्रचिती, भेटतील तोंडवळे जगात असे, पुलंच्या साहित्याचा सर्वांगीण विचार, पुलंचा विनोद व विडंबन विचार, कुणाचा आस्वाद कुणाची मल्लिनाथी, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, कितीदा समजून घ्यावे तुज आदी विषयानुसार यात विभागणी करण्यात आली आहे. यात म.द.हातकणंगलेकर, गो.मा.पवार, दाजी भाटवडेकर, दिनकर गांगल, अविनाश सप्रे, मेघना पेठे, शोभा नाईक, मुकेश माचकर, राम जगताप, सुशील धसकटे, अनुजा चवाथे अशा तीन पिढीतील लेखकांनी पुलंविषयी आत्मियतेने लिहिले आहे. अर्थात हे दोन्ही ग्रंथ म्हणजे गदिमा, पुलं यांच्याविषयीची कृतज्ञता आहे.

अजय कांडर

Related Stories

प्रशंसनीय यश

Patil_p

तोचि हा ईश्वर मम प्रियतम

Patil_p

विजयी घोडदौड

Patil_p

वाढत्या चाकरमान्यांमुळे प्रशासन हतबल

Patil_p

औद्योगिक संस्था प्रमुखांचे आचरण शुद्ध हवे

Patil_p

साल 2021-22 – ऑनलाईन शिक्षणावरची भिस्त

Patil_p
error: Content is protected !!