तरुण भारत

ड्रगनला कोरोनाचा विळखा

चीनमध्ये कोरोना विषाणुची झालेली लागण हे आता एकटय़ा चीन समोरील आव्हान राहिलेले नसून संपूर्ण जगासमोर हे आव्हान उभे राहिले आहे. ड्रगनला त्याने विळखा घातला आहे. पण अनेक मार्गाने तो जगभरात आपले पाय पसरत आहे. या विषाणूच्या थैमानामुळे संपूर्ण जगात भयकंपित वातावरण तयार झाले आहे. सध्याच्या जागतिकीकरणाच्या रेटय़ात विशेषतः एकविसाव्या शतकाच्या प्रारंभात देशांदेशामधील सीमारेषा अस्पष्ट होत असताना जग हे जणू खेडे बनले आहे. जगण्या-मरण्याचा संघर्ष आणि साम्राज्य विस्ताराच्या हव्यासातून एके काळी शेजारील राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये किंवा दोन बडय़ा शक्तींमध्ये कित्येकदा असूया-स्पर्धा डोके वर काढीत असे. आजही काही अंशी ती परिस्थिती आहे. असे असूनही शतकानुशतके राष्ट्रा- राष्ट्रांमधील व्यापार आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणीचा पूल कधीच तुटला नाही. संघर्षाच्या काळात त्याला तात्पुरता पायबंद बसायचा, पण तणाव निवळल्यानंतर पुन्हा सुरळीत व्हायचे. नवीन करार व्हायचे. वस्तूंची आयात निर्यात सुरू व्हायची. पण अगदी अलीकडे  संगणक क्रांतीनंतर पंधरा वर्षाच्या काळात राहणीमान  ग्लोबल झाल्यामुळे जागतिक व्यापार उदीम परिस्थितीमध्ये प्रचंड फरक पडला आहे. प्रत्येक माणूस ग्लोबल बनला आहे. कधी नव्हे ती एखाद्या देशाची अर्थव्यवस्था ही दुसऱया देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून राहू लागली आहे.त्यामुळे एका अर्थव्यवस्थेचा धक्का दुसऱयाला बसू लागला आहे. 2004 मध्ये आलेल्या त्सुनामीचे केंद्र इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाच्या पश्चिमेकडे हिंदी महासागरामध्ये होते. पण त्या भूकंपाचे पडसाद इंडोनेशिया,श्रीलंका, भारत, थायलँडसह तब्बल चौदा देशांमध्ये उमटले. त्याप्रमाणे कोरोना विषाणूमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला बसलेल्या धक्क्याचे पडसाद आता जगभर उमटू लागले आहेत. एखादा भयंकर साथीचा आजार देश कसा पोखरतो, देशातील रुग्णांना पोखरतोच शिवाय त्या देशाची अर्थव्यवस्थेलाही कसा पोखरतो, त्याचे पडसाद जगभरातील अर्थव्यवस्थेवर कसे उमटतात हे पहायचे असेल तर चीनवर कोरोना विषाणूने केलेल्या हल्ल्याकडे आणि त्यानंतर उद्भभवलेल्या परिस्थितीकडे पहावे लागेल. चीनच्या सर्व व्यवस्थेला आणि एकूण क्षमतेला या रोगाने आव्हान दिले आहे. तिची व्याप्ती इतकी प्रचंड आहे की रोज तब्बल दोन हजार लोकांना त्याची लागण होत आहे. जवळजवळ पंचवीसहून अधिक देशांमध्ये त्याने आपले पाय पसरले आहेत. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सहाशे-सातशे असल्याचा चीन सरकार दावा करीत असले तरी प्रत्यक्षात हा आकडा हजारोंच्या घरात असल्याचे सांगितले जाते.चीनमधील एका नावाजलेल्या कंपनीचा डेटा लीक झाल्यामुळे ही माहिती उघड झाली आहे. विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या 30 हजार सांगितली जात असली तरी हा आकडा दहा पटीहून अधिक असल्याचे सांगितले जाते. साथीच्या आजारासंबंधातील खरी आकडेवारी चीन जगापासून लपवून ठेवत आहे. साथीच्या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण जग आपल्यापासून संबंध तोडेल, अशी भीती चीनला वाटत आहे. या शतकातच जागतिक महासत्ता बनण्याची चीनला घाई आहे. एकविसावे शतक फक्त चीनचेच असणार आहे.’मेड इन चायना 2025’ हे घोषवाक्य घेऊन अध्यक्ष शी जिनपिंग चीनचे नेतृत्व करत आहेत. जगभरातील व्यापार आणि उद्योग विश्वावर  ताबा घेऊन आर्थिक महासत्ता बनण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. येत्या तीन वर्षात परकीय बनावटीचे सर्व संगणक आणि इतर उपकरणे चीनमधून हटवण्याचे आदेश सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. कोरोना आपत्तीमुळे या घोडदौडीला चाप बसेल का अशी शंका त्यांना वाटते. स्वप्नभंग होऊ नये म्हणून सत्य दडपले जात नाही ना? वास्तविक सार्वजनिक आरोग्याचा विचार केल्यास कोणत्याही संसर्गजन्य आजारात पारदर्शकता हवी; परंतु दुर्दैवाने चीनकडून ती पाळली जात नसल्याचे दिसून येत आहे. चीनमध्ये डॉक्टर्स या साथीच्या आजाराबद्दल सत्य कथन करीत आहेत,त्यांची तोंडे बंद करून अफवा पसरविण्याच्या आरोपावरून तुरुंगात डांबले जात आहे. या भयंकर विषाणुबद्दल सर्वप्रथम धोक्याचा इशारा देणारे डॉक्टर ली वेलियांग यांचा या विषाणूची बाधा झाल्यामुळेच गुरुवारी अखेर मृत्यू झाला.वास्तविक ली यांनी डिसेंबरमध्ये या धोकादायक विषाणूबद्दल एक संदेश केला होता. परंतु पोलिसांकडून त्यांचा आवाज दडपला गेला. उलट अफवा पसरवल्याच्या आरोपावरून त्यांना चौकशीस सामोरे जावे लागले. मृत्यूच्या दारात असताना ली यांनी रुग्णालयातील बेडवरूनच आपला मास्क लावलेला फोटो सोशल मीडियावरून पोस्ट केल्यानंतर चीनमध्ये संतप्त पडसाद उमटले. कित्येक रुग्ण कोरोना विषाणुमुळे मृत्युच्या दाढेत जात आहेत.परंतु त्यांच्या मृत्यू दाखल्यावर जबरदस्तीने निमोनियासारख्या दुसऱया एखाद्या आजाराची नोंद करून दिशाभूल केली जात आहे. वास्तविक जगाच्या डोळ्यात ही धूळफेक नसून चीन स्वतःच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे. चुकीच्या माहितीमुळे गोंधळ आणि भीती वाढत आहे. चीनच्या पोलादी पडद्यातून वास्तव बाहेर येत नसल्यामुळे कोरोना व्हायरसपेक्षा अधिक वेगाने अफवा पसरल्या जात आहेत.परिणामी पर्यटन, व्यापार उद्योग, रोजगार या अनुषंगाने सर्व बाजूंनी चीनचा जगाशी संपर्क तुटत चालला आहे. चीन जगातली सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत त्याचा 16 टक्के वाटा आहे. साहजिकच जगाचे लक्ष चीनमधील कोरोना घडामोडीकडे आहे. वास्तविक हे जागतिक संकट म्हणून बचावात्मक व प्रतिबंधात्मक उपायोजना करून या विरोधात सामुदायिकरित्या लढा देण्याची गरज आहे.जगभरातील संशोधक,अर्थतज्ञ व राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन यावर उत्तर शोधण्याची गरज आहे.यापूर्वी मलेरिया, इबोला सार्स, बर्ड फ्लू,स्वाईन फ्लू यासारख्या संसर्गजन्य आजारांशी सामना केल्याचा आपला इतिहास आहे. जीवजंतू,विषाणू आणि मनुष्यजात यांच्यातील संघर्ष अटळ आहे, हे विसरून चालणार नाही.

 

Related Stories

जागतिक आर्थिक विषमता वाढण्याची शक्यता

Patil_p

माध्यम साक्षरतेचं चांगभलं!

Patil_p

सदैव म्हणती हरिरमणी

Patil_p

….तर रामराज्य येईल

Patil_p

आंदोलनाचे आंतरराष्ट्रीयीकरण

Amit Kulkarni

देवाचा वास माणसाच्या हृदयातच असतो

Patil_p
error: Content is protected !!