तरुण भारत

‘महासत्ता’धीशाचे उद्या भारतात आगमन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारपासून दोन दिवसीय भारत दौऱयावर येणार आहेत. अहमदाबाद, आग्रा आणि दिल्ली या तीन शहरांमध्ये ट्रम्प यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आणि बैठका होणार असल्याने तिन्ही शहरांमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भारतीय सुरक्षेबरोबरच अमेरिकन सुरक्षा यंत्रणेकडूनही सर्व व्यापक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याव्यतिरिक्त त्यांना वैयक्तिक सुरक्षा रक्षकांचे देखील कवच असेल. तसेच प्रशासकीय आणि दुतावास पातळीवरील यंत्रणेकडूनही दौऱयाची सुसज्जता केली जात आहे. आग्रा भेटीच्या मार्गावर 4 ते 5 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून संपूर्ण मार्गावर सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे.

‘नमस्ते ट्रम्प’ : अमेरिकेतील ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमाप्रमाणे आयोजित नमस्ते ट्रम्प या मोटेरा स्टेडियमवरील कार्यक्रमास सुमारे सव्वा लाख लोक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमात काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि बॉलिवूड कलाकारांच्या अदाकारी अपेक्षित आहेत. या कार्यक्रमानंतर मोदी आणि मान्यवरांसोबत राष्ट्राध्यक्ष भोजन घेतील.

साबरमती आश्रम : ट्रम्प यांच्या भारत भेटीच्या पहिल्या दिवशी साबरमती आश्रमास भेट देतील. तेथे हे दोन नेते सुमारे 15 मिनिटे असतील. तेथे ट्रम्प यांना भेटीदाखल चरखा आणि महात्माजींचा जीवनपट उलगडणारी पुस्तके भेट देण्यात येतील. बापूजी आणि कस्तुरबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या हृदयकुंज कुटीत राष्ट्राध्यक्ष सपत्नीक काही काळ चरख्यावर सुतकताई करतील.

आग्रा-ताजमहाल भेट : दौऱयाच्या पहिल्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प हे आग्रा येथील जगप्रसिद्ध वास्तू ताजमहालला भेट देणार असल्याने सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या 10 तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. ताजमहालच्या परिसरात ते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दाखल होणे अपेक्षित असून तेथे सुमारे 30 ते 45 मिनिटे असतील. येथे त्यांच्यासाठी स्नायपर्सची सुरक्षाही असेल.

राजधानी दिल्लीही सज्ज : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प राष्ट्रपती भवनात मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतील. तेथून राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीसमोर नतमस्तक होतील. त्यानंतर हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चेत ते सहभागी होतील. त्यानंतर ते भोजन आटोपून पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प संयुक्त पत्रकार परिषद घेतील.

उद्योगपतींसमवेत चर्चा : संयुक्त पत्रकार परिषद झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन दुतावासाला भेट देऊन तेथे देशातील नामवंत उद्योगपतींची भेट घेतील. त्यात दोन्ही देशातील आर्थिक सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या मेजवानीला उपस्थित राहून ट्रम्प रात्री दहाच्या सुमारास अमेरिककडे प्रयाण करतील.

Related Stories

कोरोनाचा कहर : पंजाबमध्ये रुग्ण संख्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर

pradnya p

सीबीएसई परीक्षांची 31 डिसेंबरला घोषणा

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये 589 नवे कोरोना रुग्ण; 9 मृत्यू

pradnya p

भारतासाठीच्या क्षेपणास्त्र यंत्रणेचे उत्पादन सुरू

Patil_p

अमित शहांच्या उपस्थितीत बोडोलँड शांतता करारावर स्वाक्षऱया

prashant_c

लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यास संक्रमण वाढण्याची भीती

Patil_p
error: Content is protected !!