तरुण भारत

हवी फक्त इच्छाशक्ती

तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर प्रथम ती गोष्ट करण्याची इच्छा पाहिजे. माणसाच्या जीवनात इच्छाशक्तीला फार महत्त्व आहे. इच्छाशक्ती हा मनाच्या सामर्थ्यांचा एक भाग असून ती एक अमूर्त शक्ती आहे. त्याची प्रचीती माणसाच्या कार्यातूनच येते. इच्छाशक्ती म्हणजे कल्पनेतली इच्छा किंवा मनोरथ नव्हे. जी इच्छा अविरत परिश्रमाने प्रत्यक्षात आणता येते, ती म्हणजे इच्छाशक्ती. इच्छांची पूर्तता होण्यासाठी नैतिक शक्ती आणि निश्चय असावा लागतो. लहानसहान गोष्टींमधून इच्छाशक्तीला बळकटी मिळते. जेव्हा एखादी गोष्ट जाणीवपूर्वक नित्यनेमाने केली जाते, त्यातून इच्छाशक्ती दृढ होते.

इच्छाशक्ती वाढवण्यासाठी मनावर पूर्णपणे नियंत्रण पाहिजे. ते अशासाठी की कधी कधी ध्येय गाठण्यासाठी मनाविरुद्धही काम करावे लागते. जर शरीर लवचिक ठेवायचे असेल तर नित्यनेमाने व्यायाम हा केलाच पाहिजे. ते करणे तुम्हाला आवडो न आवडो. मनाला तशा प्रकारचे वळण लावणे आवश्यक असते. त्यासाठी कधी कधी क्षणिक भावनांवरही मात करावी लागते. माणसाचं एक मन म्हणत असतं की तू आराम कर तर दुसरं त्याला काम करण्यासाठी सुचवत असतं. जो माणूस काम करण्याची मनाची आज्ञा पाळतो तो पुढे जातो. कुणाच्याही आग्रहाला बळी न पडता, जो स्वत:चा निश्चय टिकवतो त्याची इच्छाशक्ती वाढते. यशस्वी होण्यासाठी, लोकांना मान देऊन त्यांचे थोडेफार ऐकावे लागते. पण स्वत:चा इच्छेचाही मान तेवढाच ठेवावा लागतो. त्यासाठी लोकमताला मान देताना एक मर्यादा ठेवावी लागते.

Advertisements

इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास

इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी समांतरच आहेत. इच्छा जर प्रबळ असेल तर माणसाला कार्यप्रवृत्त करते. इच्छाशक्तीचे सामर्थ्य माणसात सुप्तावस्थेत असते. माणसाची बुद्धी आणि इच्छाशक्ती यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. बिहारची अरुणिमा सिन्हाचं उदाहरण सर्वश्रृत आहे. एका पायाने अधू झालेल्या अरुणिमाने अपघात झाल्यापासून दोन वर्षांत एव्हरेस्ट सर केला. सर्वसामान्य माणसाला शक्मय नसणारी गोष्ट तिने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर साध्य केली. पद्मश्री देऊन भारत सरकारने तिचा गौरव केला.

जेव्हा आणीबाणीची, धोक्मयाची परिस्थिती निर्माण होते तेव्हाही इच्छाशक्ती जागृत होते. प्रतिकूल परिस्थितीचे अनुकूल परिस्थितीत रूपांतर करण्याची किमया इच्छाशक्तीमध्ये असते. कधी कधी अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी परतीचे दोर कापावे लागतात. हेलन केलर ही मूकबधीर, आंधळी होती. पण इच्छाशक्तीच्या जोरावर तिनं शिक्षण घेतलं, भरपूर लिखाण केलं. भावनांच्या आहारी न जाता, ध्येयाच्या मार्गात येणाऱया प्रत्येक अडचणीवर मात करा. त्यासाठी छोटय़ा छोटय़ा कार्यापासून सुरुवात करायला हवी. ते प्रथम साध्य करा. त्याने तुमची इच्छाशक्ती आपोआपच समर्थ होईल.

हवेत किल्ले बांधणं म्हणजे इच्छाशक्ती नव्हे

तुमच्या मनातील संकल्प शरीराने पार पाडले पाहिजेत तरच इच्छापूर्ती होईल. त्यासाठी शरीर आणि मनाने एकत्र कार्य करणे जरुरी आहे. जर शरीर थकलं असेल तर त्यावेळी विश्रांती घेणं आवश्यक असतं. तसेच शारीरिक व्याधीतून मुक्तता मिळविण्यासाठी मनही खंबीर पाहिजे. मी या आजारातून बरा होणारच असे जो मनापासून ठरवतो तो त्यातून मुक्त होतो. यासाठी योगासन, प्राणायाम हे आपल्या दैनंदिन जीवनात असणं आवश्यक आहे. एरव्ही अनियमित असणारे श्वसन प्राणायामाने नियमित होते. त्यामुळे शरीर आणि मनही शांत, समृद्ध बनतं. तुमचं शरीर आणि मन कार्यक्षम होतं. तुम्ही जसा हुकूम द्याल तशी कृती शरीर करतं. शरीराला तशी सवय लावावी लागते. त्यासाठी तुमच्या मनाचा निश्चय व्हायला पाहिजे. शरीर हे एक यंत्रच आहे. त्याची देखभाल नियमित करणं आवश्यक असतं.

मनाची एकाग्रता आणि इच्छाशक्ती 

मनाची एकाग्रता आणि इच्छाशक्ती यांचा फार जवळचा संबंध आहे. जी गोष्ट तुम्ही करायची ठरवली आहे त्याच्यावर तुमचे मन केंद्रित करा. एकाग्रतेमुळे मनाची शक्ती वाढते. एकाग्रता ही पूर्णपणे मानसिक शक्ती आहे. एकाग्रता म्हणजे मेंदूने दिलेली आज्ञा शरीराला आणि मनाला पाळायला लावणे. यासाठी मनाच्या चंचलतेवर नियंत्रण ठेवायला पाहिजे. म्हणजे हाती घेतलेले काम अर्धवट न सोडता तडीस नेणे आवश्यक आहे. भटकणाऱया मनाला आधी स्थिर केले पाहिजे. म्हणजे एकदा का मन ताब्यात आले की ते तुमच्या इच्छेनुसार एखाद्या विषयावर एकाग्र होऊ शकेल. जसा शारीरिक आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक असतो त्याप्रमाणे मनासाठी चिंतनाचा व्यायाम आवश्यक असतो. इच्छाशक्तीचा विकास करण्यासाठी मनावर नियंत्रण पाहिजे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीही इछाशक्तीचा उपयोग करून अनुकूलतेत बदलता येते. हातपाय गाळून बसण्यापेक्षा कामाने इच्छाशक्ती प्रबळ होते.

एकाग्रतेसाठी एक प्रयोग

मनाच्या एकाग्रतेमुळे एखादी गोष्ट आपणास ताबडतोब आणि अचूक करता येते. हाती घेतलेल्या कामावर संपूर्ण अवधान देण्यामुळे मनाची एकाग्रता साधता येते. एकाग्रता होत नसेल तर एक सोपा प्रयोग आहे. शांत आणि एकांत जागा निवडा. शरीर शिथिल करून बसा. डोळे बंद करून तुम्हाला हवी असलेली संकल्पना समोर आणा. दुसरा कोणताही विचार मनात आणू नका. मन सतत निसटण्याचा प्रयत्न करेल. अनेक प्रकारचे विचार मनात येतील. पण असे चिंतन काही वेळ करत राहिल्याने तुमचे मन आपोआपच एकाग्र होईल. दिवसाच्या शेवटी दिवसभरातील घटनांचा आढावा घ्या. त्यामुळे तुमची स्मृती वाढेल. इच्छाशक्ती वाढवण्यासाठी दैनंदिन घटनांकडे लक्षपूर्वक पाहिले पाहिजे. एखादा लेख वाचताना मनाची एकाग्रता ठेवून वाचला तर तो लक्षात राहतो. त्याच्या मुद्यांचा आढावा घेतला तर लेखाचा सारांश लक्षात राहतो. त्यासाठी सूक्ष्मनिरीक्षणशक्तीसुद्धा तुमच्याकडे पाहिजे. अनेक वेळा वस्तूंची, व्यक्तींची वैशिष्टय़े लक्षात ठेवली तर ती गोष्ट  लक्षात राहते.

Related Stories

करिअर, बुध्दिमत्तेचे पैलू

Patil_p

आगळी शिक्षणसेवा

Patil_p

मका लागवड लाभदायक

Patil_p

सूर्यनमस्कार एक परिपूर्ण व्यायाम

Patil_p

सरकारी मराठी पूर्व प्राथमिक शाळा क्र. 37 नानावाडी

Patil_p

गरज चित्तशुद्धीची

tarunbharat
error: Content is protected !!