तरुण भारत

भारत-अमेरिकेत 25 हजार कोटींचा संरक्षण करार

हशतवाद हाताळण्यास मोदी समर्थ : ट्रंप यांच्याकडून प्रशंसा, राष्ट्रपती भवनात भव्य स्वागत,

विस्तृत व्यापार करारावर सकारात्मक चर्चा

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या ऐतिहासिक भारत दौऱयाच्या दुसऱया दिवशी दोन्ही देशांमध्ये 25 हजार कोटी रूपयांचा संरक्षण सामग्री खरेदी करार करण्यात आला आहे. दोन्ही देशांमधला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण खरेदी करार मानला जात आहे. या कराराअंतर्गत भारत अमेरिकेकडून अत्याधुनिक ऍपाचे आणि एम एच 60 हेलिकॉप्टर्स घेणार आहे. यामुळे भारताचे वायूसामर्थ्य मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे.

ट्रंप यांचे पत्नी मिलानिया, कन्या इव्हांका आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या आसपास दिल्लीत आगमन झाले होते. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांचे राष्ट्रपती भवनात भव्य स्वागत करण्यात आले. त्यांना 21 तोफांची मानवंदना देण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रंप आणि मिलानिया यांचे स्वागत केले. त्यांना तिन्ही सेनादलांच्या सैनिकांनीही मानवंदना दिली. त्यानंतर काहीकाळ राष्ट्रपती भवनात थांबून त्यांनी राजघाटावर महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. तेथे ट्रंप पती-पत्नींनी वृक्षारोपणही केले. नंतर ट्रंप दांपत्य हैदराबाद हाऊसमध्ये गेले.

राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथसिंग, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुब्रम्हणियम जयशंकर, मोदी मंत्रिमंडळातील इतर मान्यवर मंत्री, ज्येष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांची ट्रंप यांच्याशी परंपरेनुसार ओळख करून देण्यात आली.

पंतप्रधान मोदींशी शिखर चर्चा

हैदराबाद हाऊस या इतिहासप्रसिद्ध इमारतीत अध्यक्ष ट्रंप आणि पंतप्रधान मोदी यांच्यात साधारणत दीड तास चर्चा झाली. ही चर्चा संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान, व्यापार आणि जनता संपर्क या पाच महत्वपूर्ण मुद्दय़ांवर दोन्ही नेते व त्यांचे साहाय्यक यांनी बोलणी केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्तरित्या निवेदने दिली.

व्यापार करारावर सकारात्मक भूमिका

भारत आणि अमेरिका यांच्यातील संभाव्य विस्तृत व्यापार करार हा या दौऱयापूर्वी चर्चिला गेलेला महत्वाचा विषय हाता. तथापि, काही मुद्दय़ांवर अद्याप एकमत न झाल्याने या दौऱयात व्यापार करार हाणार नाही, हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, दोन्ही देशांचे व्यापार मंत्री एकमेकांच्या संपर्कात असून व्यापार कराराचा पाया घालण्यात आला आहे. सर्व मुद्दय़ांवर एकमत होताच करार करण्यात येईल, जो दोन्ही देशांच्या लाभाचा असेल असे पंतप्रधान मोदी यांनी घोषित केले. ट्रंप यांनी त्यांच्या व्यक्तव्यात संरक्षण करार, दहशतवादाविरोधात संयुक्त लढा, भारत प्रशांतीय क्षेत्रात भारताचे वाढते महत्व आणि भारत-अमेरिका यांच्यात दृढ आर्थिक संबंध यांवर भर दिला.

मोदींकडून प्रीतीभोजन

दुपारी दीड वाजता पंतप्रधान मोदी यांनी ट्रंप यांच्यासाठी प्रीतीभोजनाचे आयोजन केले होते. यात शाकाहारी पदार्थांचाच समावेश होता. भारतीय भजी, रसमलाई, पुलाव, कोशिंबिर व इतर भारतीय पदार्थांचा समावेश या भोजनात प्रामुख्याने होता. भोजनप्रसंगीही दोन्ही नेत्यांनी साधारणतः 1 तासभर दोन्ही देशांच्या हिताशी निगडीत असणाऱया अनेक विषयांवर केली.

स्वतंत्र पत्रकार परिषद

सायंकाळी सव्वापाच वाजता ट्रंप यांची स्वतंत्र पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी भारतीय व विदेशी पत्रकारांच्या विविध विषयांवरील प्रश्नांना उत्तरे दिली. भारत-अमेरिका मैत्री दौऱयामुळे अधिक दृढ झाली असून दोन्ही देश एकमेकांचे महत्व जाणतात. भारताला प्रशांत महासागरीय भागात महत्वाची भूमिका घ्यावयाची आहे. ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया व भारत आदी देशांसमावेत अमेरिकेने या क्षेत्रात मजबूत फळी उभी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रपतींकडून विशेष भोजन

राष्ट्रपती ट्रंप आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यासाठी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात विशेष भोजन समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदीही अन्य अनेक मान्यवरांसह उपस्थित होते. यावेळीही दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. नंतर रात्री साधारण 10 वाजता हा दोन दिवसांचा दौरा आटोपून ट्रंप यांचे मायदेशी निर्गमन झाले.  

ट्रंप यांनी गोमांस टाळले 

टॉमॅटो केचपबरोबर गोमांस हा ट्रंप यांचा आवडता आहार आहे. ते विदेश दौऱयातही याच आहाराला पसंती देतात. तथापि, त्यांनी या भारत दौऱयात बहुसंख्य भारतीयांच्या भावना लक्षात घेऊन गोमांस टाळले आहे. संपूर्ण दोन दिवसांच्या या कालावधीत त्यांनी पूर्ण शाकाहारच घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्यासाठी शाकाहारी पदार्थांचीच योजना करण्यात आली होती. 

साधारण पाच तास चर्चा

ट्रंप आणि मोदी यांच्यात द्विपक्षीय संबंधांवर विविध टप्प्यांमध्ये साधारण पाच तास चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. दोन्ही नेत्यांनी एकत्रित अशी चर्चा तीन तास केली. त्यात प्रामुख्याने संरक्षण आणि व्यापार यांचाच समावेश होता. दहशतवाद हा विषयही महत्वाचा ठरविण्यात आला होता. या संबंधात विदेश व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याकडून थोडक्यात माहिती नंतर पत्रकारांना देण्यात आली. 

नागरीकत्व कायद्यावर चर्चा नाही

दोन्ही नेत्यांनी भारताच्या नागरीकत्व सुधारणा कायद्यावर कोणतीही चर्चा केली नाही. हा भारताचा अंतर्गत विषय असून भारत यावर योग्य पावले उचलेल याची आपल्याला शाश्वती आहे, असे ट्रंप यांनी नंतर त्यांच्या पत्रकार परिषदेत प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. आम्ही केवळ द्विपक्षीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय समीकरणे यावरच चर्चा केल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. 

गुंतवणुकीत स्वारस्य

अमेरिका भारतात गुंतवणूकविषयक स्थायी कक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा ट्रंप यांनी केली. महिला उद्योजकांना विशेषत्वाने प्रोत्साहित करण्यासाठी हा कक्ष कार्यरत असेल. भारतात गुंतवणूक करण्याच्या संधी कोणकोणत्या क्षेत्रात आहेत, याचा शोधही हा कक्ष घेणार आहे. अमेरिका लवकरच नियम शिथील करणार आहे. त्यामुळे भारतीयांनी तेथे गुंतवणूक करावी असे आवाहन केले.

Related Stories

बिहारमध्ये कोविड चाचण्यांमध्ये घोटाळा

Patil_p

गोव्याची पर्यटन ओळख पुसू देणार नाही

Omkar B

हरिहरेश्वर व दमण दरम्यान धडकणार निसर्ग

datta jadhav

महामार्गावर विमान, शेतात उतरले हेलिकॉप्टर

Patil_p

वेळीच उपचार घेतल्यास ‘ब्लॅक फंगस’मधून सुटका

Patil_p

अमेरिकेत महाग, भारतात स्वस्त

Patil_p
error: Content is protected !!