तरुण भारत
Image default

अनेक पदके जिंकण्याची नेमबाजांत क्षमता

एकमेव ऑलिम्पिक सुवर्णजेता भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राचा विश्वास 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

भारतीय नेमबाजांमध्ये अनेक पदके पटकावण्याची क्षमता असून आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकेही पटकावू शकतील, असा विश्वास भारताचा माजी ऑलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्राने व्यक्त केला आहे.

37 वर्षीय अभिनव बिंद्रा हा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीचे सुवर्ण पटकावणारा एकमेव भारतीय नेमबाज असून आगामी स्पर्धेत त्यात आणखी खेळाडूंची भर नाश्चतच पडेल, अशी आशा त्याला वाटते. ‘आपल्याकडे या स्पर्धेत अनेक सुवर्णपदके मिळवू शकतील, असे प्रतिभावंत नेमबाज आहेत. ते निश्चितच असे यश मिळवतील अशी मला खात्री वाटते,’ असे बिंद्रा म्हणाला. भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत टोकियोसाठी विक्रमी 15 कोटा स्थाने मिळविली आहेत. मागील वर्षी भरघोस यश मिळविलेल्या नेमबाजांनी वर्ल्ड कपमधील रायफल-पिस्तुल प्रकारांत तसेच मोसमाअखेरच्या वर्ल्ड कप फायनलमध्येही सुवर्णवेध साधले होते. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांना मोकळय़ा हातानी परतावे लागले होते. त्यानंतर समितीने अनेक बदल करण्यास सुचविले. या समितीत स्वतः बिंद्रा अध्यक्षपदावर होते. या बदलांमुळेच नेमबाजांच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे दिसून आले.

अलीकडच्या काही वर्षात भारतीय नेमबाजांनी अप्रतिम कामगिरी केली असून त्या आधारावरच भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये जास्त पदके मिळवतील, अशी आशा बिंद्राला वाटत आहे. ‘अनेक पदके मिळवण्याची चांगली संधी आहे. मात्र मी त्यावर आता फारसे बोलणार नाही,’ असे तो म्हणाला. 2012 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला दोन पदके मिळाली होती, हीच आजवरची ऑलिम्पिकमधील नेमबाजांची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मात्र नेमबाजांची अलीकडील कामगिरी पाहता त्या बरोबरीची किंवा त्याहून सरस कामगिरी टोकियोमधील स्पर्धेत ते करण्याची शक्यता आहे. सर्वोच्च आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करण्याच्या युवा नेमबाजांच्या क्षमतेनेही बिंद्रा प्रभावित झाला आहे.

मागील वर्षी सर्व स्पर्धांत मिळून भारताने नेमबाजीत 21 सुवर्ण, 6 रौप्य व 3 कांस्यपदकांची कमाई केली. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बिंदाने 10 मी. एअर रायफल नेमबाजीत सुवर्णपदक पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी करताना भारतीय खेळाडूकडून ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण मिळविण्याचा दुष्काळही संपुष्टात आणला होता. याशिवाय 1980 नंतर भारताला मिळालेले ते पहिलेच ऑलिम्पिक सुवर्णपदक होते. मॉस्कोत झालेल्या त्या स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकले होते. बिंद्रा व निकोलो कॅम्प्रियानी यांनी ‘टेकिंग रेफ्युजी’ हा प्रकल्प सुरू केला. त्यात रेफ्युजी (निर्वासित) झालेल्या क्रीडापटूंना ऑलिम्पिक पात्रता मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन व मदत केली जात आहे. या प्रकल्पाबद्दल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी कौतुक केले आणि त्यांचे आभारही मानले होते.

एबीटीपी सेंटर्समध्ये फिटनेसवर भर

सर्वच क्रीडापटूंना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी सुधारणा व्हावी यासाठी बिंद्राने ‘अभिनव बिंद्रा टार्गेटिंग परफॉर्मन्स’ (एबीटीपी)  या हाय परफॉर्मन्स सेंटरची स्थापना केली असून पुणे, नवी दिल्ली, मोहाली, बेंगळूर व भुवनेश्वर अशा पाच ठिकाणी त्याच्या शाखा सुरू केल्या आहेत. क्रीडा कौशल्याबरोबरच फिटनेसवर या केंद्रात भर दिला जात असून अत्याधुनिक सुविधा त्यात पुरविण्यात आल्या आहेत. ‘खेळाडू हाही माणूसच आहे. त्यामुळे त्याचे आरोग्य चांगले राहणे अत्यावश्यक आहे. त्याच्या आरोग्याची काळजी आम्ही घेतली तर त्याच्याकडून उत्तम कामगिरी आपोआपच होऊ लागते. क्रीडापटू हा रोबोट किंवा मशिन नसल्याने त्याच्या उत्तम आरोग्याला प्राधान्यक्रम असायला हवा,’ असे बिंद्राचे मत आहे.

Related Stories

टेलर, कायतानो यांची अर्धशतके

Patil_p

खेळपट्टीच्या टीकाकारांवर रिचर्ड्सची टीका

Patil_p

सानिया-मॅकहेल उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

ऑलिंपिक क्रीडाग्राममध्ये 21 नवे कोरोना रूग्ण

Patil_p

अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा प्रेक्षकांविना होणार

Patil_p

रोहितने ‘इंडिया क्रिकेटर’चे संबोधन का हटवले?

Omkar B
error: Content is protected !!