तरुण भारत

माठ देतो गारवा

हताश होऊनी मुकेपणाने बसती सारी घरे,

तप्त वारे, तप्त घरे, तप्त आसमंत सारे,

Advertisements

उन्हाळा…. उन्हाळा पाण्यासाठी आसक्त सारे ।।

या काव्यपंक्तीप्रमाणेच सध्या उन आपल्या उष्ण किरणांनी आसमंत तप्त करत आहे. अशा या उन्हाळय़ात वाहणाऱया घामाच्या धारा व पदोपदी लागणारी तहान भागविण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या सोयीस्कर शीतपेयांना पसंती देत आहेत. मात्र शरीराला थंडावा देणाऱया व गरिबांचे फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱया पर्यावरणपूरक मातीच्या माठांची या दिवसात अधिकच चलती असते. उन्हाळय़ात तहान भागविण्यासाठी माठाचे पाणी सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळे  उन्हाची चाहूल लागताच मातीचे माठ विक्रीसाठी बाजारात दाखल होतात. पूर्वी ग्रामीण भागात वापरात येणारे हे मातीचे माठ सध्या शहरातील प्रत्येक घराची तहान भागवत आहेत. त्यामुळे पुंभारांचा व्यवसायदेखील या दिवसात फुलत असल्याचे दिसून येते.

प्रत्येकावरच सध्या ‘पाण्याविना दाही दिशा’ असे म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे पाण्यावर आपले आयुष्य कसे अवलंबून आहे, याची प्रचीती फक्त उन्हाळय़ातच येते. एरवी पाणी न पिणारी मंडळीदेखील उन्हाळय़ात 2 बाटल्या पाणी तरी आपल्यासोबत सर्रास ठेवतात. कारण शरीरातील पाण्याची कमतरता जीव कासावीस करुन टाकत असते. अशातच, मातीच्या माठात ठेवलेले पाणी हे आरोग्याच्या दृष्टीने पोषक असल्याने व यामुळे कोणतीही रोगराई पसरत नसल्याने बहुतांश डॉक्टरांकडून माठातूनच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. हे पाणी रुचकर व गारवा प्रदान करणारे असल्याने एक ग्लास पाणी प्याल्याने तहानदेखील क्षणार्धात शमते.

या दिवसात तप्त उन्हामुळे कोणत्याही भांडय़ात अथवा पात्रात साठवलेले पाणी हे गरम (उष्ण) होते. अशा वेळी एक तर फ्रीज अथवा मातीच्या माठातील पाणी पिणेच अनिवार्य ठरते. बहुतेकजण फ्रीजमधील पाणी पिण्यापेक्षा या मातीच्या माठातील पाणी पिण्याला अधिक पसंती देतात. कारण मातीच्या माठात साठविलेले पाणी हे दिवसभर थंड राहत असून त्याला एक वेगळीच चव येते. माठातील एक ते दोन ग्लास पाणी हे उन्हाळय़ात नक्कीच आल्हाददायी वाटते.

माठात पाणी भरुन ठेवण्याची पद्धत आजतागायत

पूर्वीचे लोक उन्हाळय़ात पाहुणे मंडळी अथवा कोणी तहानलेल्या वाटसरुंना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी घरासमोर कायमस्वरुपी रांजण अथवा मातीचे भलेमोठे माठ भरुन ठेवत असत. आजही कोकण भाग अथवा ग्रामीण भागात घर, मंदिर अथवा दुकानांच्या समोर असे मातीचे माठ हमखास भरुन ठेवले जातात. हल्ली मातीच्या बाटल्याही मिळत असल्याने घराघरात मातीच्या पात्रातून पाणी पिण्याचा मोह हा आजतागायत कायमस्वरुपी ठरला आहे. शिवाय काही सामाजिक संघटनांकडूनही तहानलेल्या वाटसरुंसाठी पाणपोईची सोय केली जाते.

स्वस्त आणि मस्त मातीच्या माठांना मागणी

सध्या सगळीकडेच मातीचे माठ आकर्षणाचा बिंदू ठरत आहेत. हे माठ बनविण्यासाठी काळय़ा मातीचा वापर केला जातो. अधिक वेळ पाणी थंड ठेवणे हे या मातीचे वैशिष्टय़ आहे. याचबरोबर लाल मातीपासूनदेखील माठ बनविले जातात. काळय़ा मातीच्या तुलनेत लाल मातीच्या माठामध्ये पाणी अधिक वेळ थंड राहते, असे म्हटले जाते. सध्या बाजारात मिळणाऱया माठांवर केलेली रंगरंगोटी यामुळे ते खरेदी करुन थंड पाणी पिण्याचा मोह शहरावासियांना भुरळ घालत आहे. सध्या नवीन पद्धतीचे व विविध आकाराचे माठही कुंभारांकडून बनविण्यात येत असून माठाच्या लहान मोठय़ा आकारावरुन अगदी 200 ते 250 रुपयांपासून आरोग्यदायी गार पाणी पुरविणारे हे माठ बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांना परवडणाऱया या स्वस्त आणि मस्त मातीच्या फ्रीजची मागणी वाढली आहे.

माठाची गरज

शक्यतो मातीचा माठ हा हाताने बनविलेला असावा. ज्यामुळे त्यातील पाणी अधिकाधिक वेळ थंड राहते. रात्रीच्यावेळी वाळा अथवा एखादे मोगरीचे फूल माठातील पाण्यात टाकल्याने सकाळी थंडगार सुगंधी पाणी पिण्याचे सुख काही औरच! उन्हाळय़ात दिवसातून 10 ते 12 ग्लास माठाचे पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नसून तहानही लवकर भागते. त्यामुळे या उन्हाळय़ात प्रत्येकाच्या घरी एखादा तरी मातीचा माठ असणे गरजेचे आहे.

Related Stories

सरकारी शाळा क्र. 45 नार्वेकर गल्ली

Patil_p

अमेरिकेत वर्णद्वेशातून उफाळला असंतोष

Patil_p

बाजरीचे दिवस

Patil_p

कर्क रोगापासून सावधान…

Patil_p

शेव टोमॅटो नू शाक

Patil_p

नवजात शिशुची काळजी

Patil_p
error: Content is protected !!