तरुण भारत

गरज चित्तशुद्धीची

आपल्या परिसरातल्या  लोकांच्या आनंदाने आनंदित होण्यासाठी आपले मन स्वच्छ असले पाहिजे. त्यालाच अध्यात्मात चित्तशुद्धी म्हटले आहे. एकदा आपण सर्वांना भाऊ मानले की, सर्वांचा आनंद तोच आपला आनंद होतो. मग नाही आनंदा तोटा अशी आपली अवस्था होऊन जाते. त्यासाठी चित्तशुद्धी गरजेची आहे.

माणसाला देवाने सर्वात प्रगत प्राणी केले आहे  पण या माणसाला अजूनही जगावे कसे याची कला अवगत नाही. त्याने आपल्या मेंदूचा वापर करून जीवन आरामदायी केले आहे पण तेच आयुष्य सुखी करण्याची कला अजून त्याला पूर्णपणे अवगत झालेली नाही. आपण नेमके कसे जगत आहोत आणि आपल्याला एवढय़ा सुविधा असूनही समाधान का मिळत नाही, असा प्रश्न त्याला पडला आहे. सुखाच्या शोधाच्या प्रवासात त्याची वाट हरवली आहे. तो या वाटेवर काही मैल चालतो पण चालून चालून तो पुन्हा त्याच ठिकाणी यायला लागला आहे. बुद्धी असून बुद्धीहीन ठरला आहे.

Advertisements

सुखाचे तसेच आहे. ते नेमके कशात आहे, याचा शोध घेता घेता माणसाची दमछाक होते. तो आधी पैशात सुख शोधायला जातो. अनेक सुखांचा बळी देऊन तो पैसा कमावतो पण पैसा कमावतो तेव्हा त्याला कळून चुकते की, ज्या सुखासाठी म्हणून त्याने पैसे कमावण्याचा आटापिटा केला आहे, ते सुख मुळी त्या पैशांनी मिळतच नाही. त्याला ते समजते तेव्हा मात्र तो पैसा सोडून सुखाच्या मागे जात नाही कारण पैसा ही त्याची गरज  झालेली असते. पैशाने सुख मिळत नाही, सुखासाठी पैसा सोडवत नाही. पैसा कमावता कमावता सुखाचा आस्वाद घेण्यासाठी आवश्यक असलेले शरीरही विकलांग झालेले असते. अशा अवस्थेत काही लोक सुखासाठी देव देव करायला लागतात पण त्यांना देवही भेटत नाही. सारीच शोकांतिका झालेली असते.

माणूस मृगजळामागे धावणाऱया हरणासारखा सुखाच्या मागे धावत चालला आहे. या दोघांत एक फरक आहे. हरीण हा तहान लागल्यामुळे आणि पाणी मिळत नसल्याने त्या पाण्याच्या भासामागे पळत असतो पण माणूस जवळ सुखाची साधने असूनही या सुखाच्या भासामागे पळत असतो. हरिण अज्ञानी असल्याने मृगजळामागे धावतो पण माणूस सर्वात ज्ञानी असूनही त्याला त्या सुखाच्या मृगजळामागे धावताना आपल्या जवळ सुखाची साधने आहेत याची जाणीव होत नाही. लोक देवासाठी तीर्थाटनाला जातात.  तिथे जाऊन देवाचे दर्शन घेतले की पुण्य लागते असे त्याला वाटत असते पण, त्याला हे कळत नाही की आपल्या शेजारी राहणाऱयांची त्रासातून सुटका करणे हे तीर्थाटनापेक्षा मोठे पुण्य आहे.

सुखाच्या आणि आनंदाच्या शोधात फिरणाऱया लोकांना भरपूर भटकूनही सुख मिळत नाही पण, त्यांच्या लक्षात येत नाही की, आपल्या घरात आपण पदोपदी सुख निर्माण करू शकत असतो. आपल्या पत्नीने केलेल्या कपभर चहाचा एखादा घोट घेताच, ‘वा !’ असे म्हणा बरे. बघू घरात आनंद कसा निर्माण होत नाही ते ? आपल्या दारातल्या गुलाबाच्या झाडाला एक छान फूल आहे आहे, आपल्या परसातल्या पारिजातकाचे झाड फुलांनी डंवरून आले आहे, आपली नातवंडे आपल्याला प्रेमाने ‘आजोबा’ म्हणून हाक मारत आहेत या सगळय़ा घटनांत आपण आनंद शोधायचा ठरवले तर जगण्यात आनंदच आनंद आहे.

Related Stories

भक्ती भजन मंडळाचा सुवर्ण महोत्सव

Patil_p

व्यायाम उन्हाळय़ातील

tarunbharat

शास्त्रीनगर सरकारी मराठी शाळा क्र. 14

tarunbharat

शेव टोमॅटो नू शाक

Patil_p

आळस झटकून टाकावा

Patil_p

नवजात शिशुची काळजी

Patil_p
error: Content is protected !!