तरुण भारत

फ्रान्सिस सार्दिन यांनी गोव्यात भाजपचे सरकार आणले होते

चर्चिल आलेमांव यांचा पलटवार

प्रतिनिधी/ मडगाव

गोव्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना फ्रान्सिस सार्दिन यांनी ते सरकार पाडून भाजपचे सरकार सत्तेवर आणले होते असा आरोप बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमांव यांनी काल मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. गेल्या दोन दिवसामागे खा. सार्दिन यांनी चर्चिल आलेमांव यांच्यावर टीका करताना, चर्चिल भाजपला पाठिंबा देत असल्याचा आरोप केला होता. काल त्यांनी प्रतिउत्तर देताना खा. सार्दिन यांच्यावर जोरदार टीका केली.

खा. सार्दिन आपल्या आयुष्यात कधी तरी सत्य बोलणार असा सवाल उपस्थिती करून चर्चिल म्हणाले की, आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सर्व सामान्यातील असल्याने आपण त्यांना व सरकारला ठराविक मुद्दावर पाठिंबा दिलेला आहे. मात्र, सार्दिन यांनी काँग्रेसचे सरकार पाडून भाजपचे सरकार राज्यात आणले व गोव्यात भाजपला मजबूत केले. सार्दिन यांच्या बरोबर सुभाष शिरोडकर, दयानंद नार्वेकर, सोमनाथ जुवारकर, माविन गुदिन्हो, श्रीमती व्हिक्टोरिया फर्नांडिस, आलेक्स सिक्वेरा व फ्रान्सिस सिल्वेरा यांनी भाजपचे सरकार सत्तेवर आणले होते. भाजपने नंतर सार्दिनला बाजूला काढले व ते पुन्हा काँग्रेस पक्षात आले.

सार्दिन यांनी मुख्यमंत्री असताना सरकारच्या 100 कोटी रूपयांच्या बाँडचा घोटाळा केला होता व आपल्याजवळ पुरावे असल्याचा दावा चर्चिल यांनी केला. अशा सार्दिन यांनी इतरांवर आरोप करण्यापूर्वी स्वताकडे अगोदर लक्ष द्यावे असा सल्ला दिला. भाजपने आपल्याला अनेक वेळा ऑफर दिल्या परंतु, आपण भाजप पासून दूर राहिलो आहे. केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने कोसळले होते. त्यावेळी आपला पाठिंबा मागण्यासाठी दिल्लीवरून अटलजीचे जावई आपल्या घरी आले होते. पण, आपण पाठिंबा दिला नव्हता. भाजपमध्ये काही चांगली माणसे आहेत. मात्र, भाजपची तत्वे आपल्याला मान्य नसल्याने, आपण भाजपच्या विरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोठय़ा समाजातील नेत्यावर कारवाई होत नाही

सार्दिन यांनी बाँडचा घोटाळा केला परंतु, त्यांना अटक झाली नाही. उलट आपल्याला काँग्रेस व भाजपने अटक केली. मात्र, दिगंबर कामतला अटक झालेली नाही. आरोप केवळ आपल्यावरच झालेत. गोव्यात मोठय़ा समाजातील लोकांनी कितीही वाईट गोष्टी केल्यातरी त्यांना माफ केले जाते. मात्र, आपल्या सारख्या सामान्य व्यक्तीला अटक केली जाते असा आरोप त्यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील

जिल्हा पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाणावली व कोलवा या दोन मतदारसंघात उभे केले आहे. हे दोन्ही उमेदवार मोठय़ा मताधिक्याने विजयी होतील असे चर्चिल म्हणाले. काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे रात्रीच्यावेळी बाणावली मतदारसंघात येऊन काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहे. जर त्यांना धमक असेल तर त्यांनी दिवसा येऊन प्रचार करावा असे आव्हान चर्चिल आलेमांव यांनी दिले.

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन्य पक्षांकडे युती न करता स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

जि. पं. निवडणूक मतमोजणीसाठी 15 केंद्रे

Omkar B

गोव्यात आज नॉर्थईस्ट युनायटेडची लढत चेन्नईनशी

Amit Kulkarni

राष्ट्रवादीकडून पाच जि. पं. मतदारसंघांत उमेदवार

Patil_p

पोटके मैदानाचे काम त्वरित सुरू करा

Amit Kulkarni

डॉ.विशाल च्यारी यांना अर्थशास्त्रातील कार्यासाठी पुरस्कार

Amit Kulkarni

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत चेन्नई सिटी, आयजॉल एफसीचे विजय

Amit Kulkarni
error: Content is protected !!