कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता : राज्य सरकारकडून खबरदारी, आठवडय़ानंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे राज्यात पहिला बळी गेल्यानंतर सरकारने खबरदारी म्हणून शनिवारपासून एक आठवडय़ासाठी राज्यातील सर्व चित्रपटगृहे, मॉल, पब, क्लब, सेमिनार, शिबिर, जत्रा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विवाह, सभा-समारंभांमध्ये 100 पेक्षा अधिक जण एकत्र येऊ नयेत, असे निर्बंधही घालण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील निम्म्याहून अधिक दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे.
गुलबर्ग्यातील वृद्धाचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे शुक्रवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि डॉ. देवी शेट्टी तसेच विविध वैद्यकीय संघटना प्रमुखांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानंतर पत्रकार परिषदेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी याविषयी माहिती दिली. शनिवारपासून एक आठवडा क्रीडा स्पर्धा-कार्यक्रम, नाईट क्लब, पब, मेळावा, सेमिनार, यात्रा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवडय़ानंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे जनतेने सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारकडून चालविण्यात येणारी वसतीगृहे, सरकारी वसती शाळांमध्ये अधिक दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे. परीक्षा, सरकारी कार्यालये, अधिवेशन नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी योग्य मार्गसूची जारी करण्यात येईल. सर्व खासगी इस्पितळांनी कोरोनाचा संशयित रुग्ण आढळून आल्यास आरोग्य खात्याला सक्तीने माहिती द्यावी. विदेश दौऱयावरून येणाऱया प्रवाशांनी आरोग्य खात्याला माहिती द्यावी तसेच त्याच्या कुटुंबीयांनी त्याला 14 दिवस घरातच विशेष देखरेखीखाली ठेवावे. सर्व इस्पितळे, खासगी क्लिनिकांनी मागील 14 दिवसांपूर्वी विदेशातून येऊन इस्तिपळात उपचार घेत असलेल्या व्यक्तीची माहिती द्यावी, अशी सूचनाही त्यांनी दिली.
इंडियन मेडिकल असोशिएशनचे डॉ. देवी शेट्टी, खासगी इस्तिपळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. रविंद यांच्यासह अनेक इस्पितळातील तज्ञ डॉक्टरांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी आपल्या संस्थेमार्फत कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
समन्वय समिती स्थापन करणार
तातडीची उपाययोजना म्हणून राज्यभरात अतिरिक्त प्रयोगशाळा सुरू करणे, खासगी इस्पितळांशी समन्वय साधण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. जनतेने प्रवास टाळण्यावर भर द्यावा. केंद्र सरकार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शी सुत्रांचे पालन केले जात आहे. 70 टक्क्यांपेक्षा अधिक जणांनी स्वतः खबरदारी बाळगली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने विनाकारण भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. शक्यतो हस्तांदोलन टाळावे. दोघांमधील अंतर सहा फुटांपेक्षा अधिक राहिल यासाठी प्रयत्न करा. यापूर्वीच सभा-समारंभ निश्चित केलेले असतील तर ते साधेपणाने करण्यावर भर द्या, असा सल्ला येडियुराप्पा यांनी दिला.
बैठकीत उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, डॉ. अश्वथ नारायण, आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलू, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. सुधाकर, शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार, राज्य सरकारचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर व इतर खात्यांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
इस्पितळांना महत्वाच्या सूचना
राज्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले असल्याने आरोग्य खात्याते तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. दुसरा शनिवार आणि रविवारी देखील सर्व इस्पितळांमधील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱयांनी काम करावे, अशी सूचना दिली आहे. राज्यातील काही भागात कोरोनाचा फैलाव होत असल्याचे आढळून आल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सार्वत्रिक सुटय़ांदिवशी देखील आरोग्य खात्याच्या अखत्यारित येणाऱया सर्व इस्पितळांमधील सर्व कर्मचाऱयांनी कामावर हज्रा व्हावे, असा आदेश आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या आयुक्तांनी दिला आहे.
सर्व महाविद्यालयांना 15 दिवसांची सुटी
कोरोना व्हायरसबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे खबरदारी म्हणून राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांना शनिवार दि. 14 मार्चपासून 15 दिवस म्हणजेच 28 मार्चपर्यंत सुटी घोषित करण्यात आली आहे. शिक्षण खात्याच्या संचालकांनी याबाबतचा आदेश दिला आहे. कोरोना व्हायरस संसर्गजन्य असल्याचे घोषित करण्यात आल्यामुळे राज्य सरकारने खबरदारी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्य शिक्षण खात्याच्या अखत्यारित येणारी सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना 15 दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली आहे. तर येथील कार्यालयीन कर्मचाऱयांना मात्र नेहमीप्रमाणे सेवेत हजर रहावे लागणार आहे.
सहवीपर्यंतच्या शाळांना आजपासूनच उन्हाळी सुटी
सातवी-नववीच्या परीक्षा 23 पूर्वी संपविणे सक्तीचे :दहावी परीक्षा वेळापत्रकानुसार
कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे खबरदारी म्हणून सार्वजनिक शिक्षण खात्याने शनिवारपासून राज्यातील पहिली ते सहावीपर्यंतच्या सर्व शाळांना उन्हाळी सुटी घोषित केली आहे. जर परीक्षा सुरू असतील तर त्या रद्द करण्याचे आदेशही दिले आहेत. राज्याचा अभ्यासक्रम शिकविणाऱया शाळा, सीबीएससी, आयसीएससी, आयबी या शाळांना देखील हा आदेश लागू आहे.
दरम्यान सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्वतयारी सुटी देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 23 मार्चपूर्वी सक्तीने संपवून उन्हाळी सुटी देण्यात यावी. तसेच दहावी परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होतील. बारावी परीक्षा सुरू असून त्या नियमित होतील, असे शिक्षण खात्याच्या आयुक्तांनी आदेशपत्रकात नमूद केले आहे. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना मास्क परीधान करण्याची इच्छा व्यक्त केल्यास तशी संधी द्यावी. तसेच परीक्षा कालावधीत आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची सूचना शाळाप्रमुखांना (प्राचार्य-मुख्याद्यापक) देण्यात आली आहे.
पहिली ते सहवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना 2019-20 या शैक्षणिक वर्षात दिलेल्या एफए 1, एफए 2, एफए 3, एफए 4 तसेच एसए 1 आणि एसए 2 (13 मार्चपर्यंत झालेल्या परीक्षा) परीक्षांच्या आधारे श्रेणीनिहाय निकाल प्रसिद्ध करून पुढील इयत्तेत प्रवेश द्यावा, अशी सूचना आदेशात देण्यात आली आहे. उन्हाळी सुटी संपल्यानंतर 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकानुसार शाळा पुन्हा सुरू होणार आहे.
काय सुरू राहणार?
विवाह समारंभ, परीक्षा (सहावीपुढील), विधिमंडळ अधिवेशन, इस्पितळ, मेडिकल, एटीएम, वृत्तपत्र, दूध, पेट्रोल-डिझेल, मंदिरे, चर्च, मशीद, (100 पेक्षा अधिक जण जमू नये.)
काय बंद राहणार?
मॉल, सेमिनार, मेळावा, पब, नाईट क्लब, क्रीडा स्पर्धा, वंडर ला, सार्वजनिक कार्यक्रम, शाळा-महाविद्यालये (कार्यालय वगळून).