तरुण भारत

आपटी नि उसळीचा खेळ!

‘कोरोना’ विषाणूचा उत्पात आणि त्यामुळं पसरत चाललेलं भय हे दोन्हीही घटक कमी होण्याचं नाव काढत नाहीत…त्याचबरोबर जगभरातील बाजारांची जी दाणादाण उडालीय त्यालाही आवर घालणं कठीण होत चाललंय. या पार्श्वभूमीवर ‘भारतीय शेअर बाजारा’नं नुकतीच पाहिली ती अभूतपूर्व घसरगुंडी. आता हे सत्र चालू राहतंय की काय असं वाटत असतानाच ‘सेन्सेक्स’नं शुक्रवारी आश्चर्यकारकरीत्या उसळी घेतली…

रोना व्हायरस’नं जगभरातील ‘मार्केट्स’ना अक्षरशः गारद केलंय, ‘भांडवली बाजारां’ना हताश केलंय, गुंतवणूकदारांना निःसंशय रडविलंय (मागील 38 सत्रांत त्यांना गमवावे लागलेत तब्बल 46 लाख कोटी रुपये)…त्यात स्थान मिळविलंय ते आपल्या ‘सेन्सेक्स’नं देखील…30 ‘स्टॉक्स’चा समावेश असलेल्या मुंबईतील ‘शेअर बाजारा’च्या इतिहासाचा, एका दिवसाच्या कारभाराचा विचार केल्यास यापूर्वी असं ‘हत्याकांड’, अशी ‘अमानुष कत्तल’ पाहण्याचा प्रसंग कधी आला नव्हता…‘सेन्सेक्स’ गुरुवारी चक्क 8.2 टक्क्यांनी, 2 हजार 919 गुणांनी आपटला, चिखलात घुसला. यापूर्वी जमिनीवर लोळण्याच्या बाबतीत विक्रम नोंदविला गेला होता तो गेल्या सोमवारी, 1 हजार 942 अंकांचा घणाघाती फटका बसल्यामुळं…‘मुंबई शेअर बाजारा’चा ‘निर्देशांक’ गुरुवारी 32 हजार 778 गुणांवर झोपला…

Advertisements

‘जागतिक आरोग्य संघटने’नं (डब्ल्यूएचओ) ‘कोरोना’ला ‘पॅनडेमिक’ म्हणजे ‘महामारी’ ठरविल्यानंतर, भयानक आर्थिक मंदीच्या दिशेनं विश्वाचा प्रवास चाललाय हे कळल्यानंतर ‘ग्लोबल स्टॉक मार्केट्स’मध्ये अपेक्षेनुसार दर्शन घडलं ते ‘ब्लडबाथ’चं. या पार्श्वभूमीवर मुंबईला ‘सोवळं’ राहणं जमणार तरी कसं ?…14 जानेवारी, 2020 ते 12 मार्च, 2020 दरम्यानच्या कालावधीत ‘सेन्सेक्स’ ‘कोव्हिड-19’मुळं तब्बल 9 हजार 175 अंकांनी म्हणजेच 22 टक्क्यांनी कोसळला (चीनमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती ती 11 जानेवारी या दिवशी)…गुरुवारीच गुंतवणूकदारांचे 11.4 लाख कोटी रुपये एखाद्यानं जादू केल्याप्रमाणं गायब झाले, तर ‘रिलायन्स’ व ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ यांनी गेल्या 52 आठवडय़ांतील सर्वांत वाईट कामगिरीची नोंद केली (या घसरगुंडीच्या परिणामस्वरूप दहा प्रमुख भारतीय कंपन्यांच बाजारमूल्य 4.22 ट्रिलियन रुपयांनी आदळलंय)…

12 मार्च रोजी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ 13.2, ‘ओएनजीसी’ 12.6, ‘ऍक्सिस बँक’ 12.3, ‘आयटीसी’ 11.1, तर ‘बजाज ऑटो’ 9.8 टक्क्यांनी आपटला…‘बाँबे स्टॉक एक्सचेंज’चं बाजारमूल्य 160 लाख कोटी रुपयांवरून (17 जानेवारी…विक्रम) शुक्रवार, 13 मार्च या दिवशी पोहोचलं 113.49 लाख कोटी रुपयांवर….सार्वजनिक क्षेत्रातील बहुतेक बँकांना दर्शन घडलं ते समभागांच्या तुफानी विक्रीचं. भारतीय गुंतवणूकदारांवर निराश होण्याची वेळ आली ती विदेशी गुंतवणूकदारांमुळं. त्यांनी मार्च महिन्यातील पहिल्या 12 दिवसांतच तब्बल 26 हजार 500 कोटी रुपयांना (सुमारे 3.5 अब्ज डॉलर्स) ‘इंडियन स्टॉक मार्केट’मधून बाहेर खेचलंय, कारण ‘ग्लोबल फंडमॅनेजर्स’नी लक्ष केंद्रीत केलंय ते अमेरिकी राजकोषावर, रोख रकमेवर नि सोन्यावर. परदेशी गुंतवणूकदारांनी अखंड विक्री केल्यानं दबाव प्रचंड वाढलाय तो रुपयावरचा. शुक्रवारी ‘भारतीय चलन’ प्रति ‘डॉलर’ 74.49 पर्यंत घसरलं (नीचांक). सध्या मात्र ते 73.91 वर पोहोचलंय, कारण ‘भारतीय रिझर्व्ह बँके’नं 25 हजार कोटी रुपये ओतण्याचं काम केलंय…

जर वैश्विक बाजार येऊ घातलेल्या दिवसांत पुन्हा उड्डाण करण्यास अपयशी ठरल्यास ‘सेन्सेक्स’वर, भारतीय कंपन्यांवर, आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर वेळ येईल ती फार मोठय़ा संकटाला तेंड देण्याची…जगभरातल्या ‘शेअर बाजारां’त ‘ब्लडथबाथ’चं दर्शन घडलंय अन् आपल्या मार्केट्सवर वेळ आलीय ती वणव्याला सामोरं जाण्याची. ‘कोरोना व्हायरस’नं तब्बल 145 राष्ट्रांना धडक दिलीय. विश्वाचा ‘आर्थिक मंदी’च्या दिशेनं प्रवास चाललाय हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळं भीती जास्तच वाढल्याचं विश्लेषकांना वाटतंय…

‘दलाल स्ट्रीट’च्या इतिहासात शुक्रवार 13 मार्चची अशुभ दिवस, अतिशय ‘क्रूर’ दिवस म्हणून नोंद होणार असंच वाटलं होतं, परंतु जे घडलं ते विश्वास बसण्यासारखं मात्र अजिबात नव्हतं…व्यवहाराला सुरुवात झाली आणि ‘सेन्सेक्स’ गटांगळय़ा खात 29 हजार 389 पर्यंत पोहोचला. त्यानंतर 45 मिनिटं ‘ट्रेडिंग’ थांबविण्यात आलं…जेव्हा ‘खेळा’ला पुन्हा प्रारंभ झाला तेव्हा ‘मुंबई शेअर बाजारा’च्या ‘निर्देशांका’नं कुठल्याही नकारात्मक बाबीकडे लक्ष न देता झेप घेतली ती तब्बल 5 हजार 381 गुणांची…‘सेन्सेक्स’च्या 40 वर्षांच्या इतिहासाचा विचार केल्यास ही सर्वोत्तम ‘इंट्रा-डे’ कामगिरी. त्यामुळं ‘निर्देशांका’ला आश्चर्यकारकरीत्या 34 हजार 103 पर्यंत पोहोचणं शक्य झालं (1 हजार 325 अंकांचा फायदा)…

‘सेन्सेक्स’नं एका सत्रात नोंदविलेली ही चौथ्या क्रमांकाची कामगिरी. परंतु निराश करणारी बाब म्हणजे ‘निर्देशांका’नं नोंद केली ती गेल्या दोन वर्षांतील सर्वांत खराब कृतीची (29 हजार 389 अंक)…विशेष म्हणजे शुक्रवारच्या ‘चमत्कारा’पूर्वी ‘भांडवली बाजारां’वर नियंत्रण ठेवणाऱया ‘सेबी’नं म्हटलं होतं की, ‘भारतीय ट्रेडिंग सिस्टम्स’ सुदृढ असून कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी संस्था सज्ज आहे…नवी दिल्लीच्या दृष्टीनं ही फार मोठी सकारात्मक बाब. येऊ घातलेल्या दिवसांत समभागांचं कमी मूल्य आणि घसरणारं तेल यांची साथ आम्हाला खात्रीनं मिळेल…भारतीय ‘भांडवली बाजार’ अजूनही आकर्षक वाटत असला, तरी अनेकदा तर्कहीन बाबी परिस्थितीवर वर्चस्व मिळवितात. बऱयाचशा गोष्टी अवलंबून असणार त्या ‘कोव्हिड-19’च्या भारतातील नि जगभरातील भविष्यावर !

– राजू प्रभू

Related Stories

युपीआय आधारित डिजिटल पेमेंट विनाशुल्क?

Patil_p

घरगुती सिलेंडर महागला, आता मोजावे लागतील ‘एवढे’ पैसे

triratna

युपीआयच्या मदतीने घरातूनच करा व्यवहार

Patil_p

हॉटेल उद्योगाच्या महसुलात घट

Patil_p

कॉफी डे एंटरप्राईझेसची महसूल कमाई 90 टक्क्मयांवर

Patil_p

जगभरातील कोरोनामुक्ती 8 कोटींवर

datta jadhav
error: Content is protected !!