तरुण भारत

आयपीएलचा कालावधी कमी होईल : गांगुली यांचे संकेत

फ्रँचायझी मात्र नाखुश, दक्षिण आफ्रिकेत 2009 साली खेळवलेल्या आयपीएलचे उदाहरण विचारात घेण्याची सूचना

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी यंदाच्या आयपीएलचा कालावधी, सामने कमी होऊ शकेल, असे संकेत दिले आहेत. सहभागी प्रँचायझी मात्र यावर तीव्र नाराज असून 2009 साली आयपीएलची आवृत्ती दक्षिण आफ्रिकेत खेळवूनही 37 दिवसातच पूर्ण केली होती, ते उदाहरण विचारात घेण्याची सूचना त्यांनी केली आहे.

बीसीसीआयने यंदाची आयपीएल 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय सर्वप्रथम जाहीर केला आणि त्यानंतर आता स्पर्धेतील सामन्यात कपातीचे संकेत दिले गेले आहेत. प्रँचायझी मात्र या निर्णयावर नाखुश आहेत.

पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे यंदाची स्पर्धा दि. 29 मार्च ते दि. 24 मे या कालावधीत खेळवली जाणार होती. पण, कोरोनाचे संकट आ वासून उभे ठाकल्यानंतर पूर्ण क्रीडा वर्तुळालाच त्याचा फटका बसत आला आहे.

2009 साली आयपीएलचे तत्कालीन सर्वेसर्वा ललित मोदी यांनी देशात सार्वत्रिक निवडणुका असल्याने ती आवृत्ती दक्षिण आफ्रिकेत खेळवण्याचा निर्णय घेतला व तो अंमलात आणला होता. त्यावेळी आयपीएल दि. 18 एप्रिल रोजी सुरु झाली व दि. 24 मे रोजी स्पर्धेची फायनल झाली होती. त्या हंगामात एकूण 59 सामने खेळवले गेले. यात 56 साखळी सामने, दोन उपांत्य सामने व अंतिम सामन्याचा समावेश होता. त्यानंतर या स्पर्धेची रुपरेषा किंचीत बदलली असून आता दोन क्वॉलिफायर, एक एलिमिनेटरचा नव्याने समावेश झाला आहे.

‘यंदाची आयपीएल स्पर्धा किमान दि. 15 एप्रिलपर्यंत खेळवली जाणार नाही. त्यामुळे, पंधरा दिवस इथेच कमी झाले आहेत. साहजिकच, स्पर्धेचा कालावधी कमी होऊ शकतो आणि सामन्यांची संख्याही कमी होऊ शकते. पण, ती किती कमी होईल व स्पर्धेचे नवे स्वरुप कसे असेल, याबद्दल आताच काही सांगणे कठीण आहे’, असे गांगुली याप्रसंगी म्हणाले.

सर्व पर्यायांवर विचार सुरु

जवळपास 3 हजार कोटींची उलाढाल अपेक्षित असताना बीसीसीआय व प्रँचायझी यांच्यात स्पर्धा रद्द झाल्यास होणाऱया नुकसानीचे काय, याबाबतही खल सुरु असल्याचे संकेत आहेत. आयपीएल खरोखरच पूर्ण रद्द करावी लागली तर हा मुद्दा कळीचा ठरु शकतो. बीसीसीआयने स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला, त्यापूर्वी प्रँचायझींनी यंदाची स्पर्धा चाहत्यांविना झाली तरी ती मान्य असेल, बंद स्टेडियममध्ये सामने भरवा, अशी सूचना केली होती. दरम्यान, पूर्ण स्पर्धाच रद्द करावी लागली तर प्रँचायझींनी करारबद्ध खेळाडूंना मानधन देण्याची गरज नसेल.

विदेशी खेळाडू नसतील तर आयपीएलही नको!

आयपीएल खेळवायची असेल तर विदेशी खेळाडूंना समाविष्ट केल्यानंतरच खेळवा. विदेशी खेळाडू खेळणे शक्य नसेल तर अशा परिस्थितीत यंदाची आयपीएल स्पर्धाच नको, अशी आग्रही भूमिका आयपीएल प्रँचायझींनी घेतली आहे. आम्हाला सर्व खेळाडू हवे आहेत आणि सर्व खेळाडूंना घेऊनच यंदाची आयपीएलही व्हावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत, असे या प्रँचायझींनी बीसीसीआयला कळवले आहे. प्रोजेक्ट, एम्प्लॉयमेंट, डिप्लोमेटिक आदी वगळता सर्व व्हिसा दि. 15 एप्रिलपर्यंत रद्द केले गेले असून यामुळे हे निलंबन मागे घेईतोवर विदेशी खेळाडूंना भारतात येता येणार नाही, असे सध्याचे चित्र आहे. स्पर्धेत सहभागी विदेशी खेळाडू, प्रशिक्षक व प्रशिक्षण पथकातील सदस्य बिझनेस व्हिसावर भारतात येत असतात.

Related Stories

कोरियन एफए चषक फुटबॉल स्पर्धा 9 मे पासून

Patil_p

प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकण कडय़ावरुन पडून मृत्यू

prashant_c

भारतीय महिलांना सांघिक नेमबाजीत सुवर्ण

Amit Kulkarni

भारतीय संघ ऑगस्टमध्ये लंका दौऱयावर?

Patil_p

मँचेस्टर सिटीचा न्यूकॅसलवर विजय

Patil_p

ब्रिटनच्या स्टोरेला सुवर्ण, ऑस्ट्रेलियाला व्हीलचेअर रग्बीत धक्का

Patil_p
error: Content is protected !!