नटणे हे वरकरणी आकर्षक वाटत असले तरी त्यामुळे स्वच्छतेचे काम होत नाही. नैसर्गिक आकर्षकपणा येण्यासाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही शरीराचा प्रत्येक अवयव स्वच्छ हवा त्यासाठी रोज अंघोळ केली जाते ज्याने त्वचेचे आरोग्य राखले जाते. पण या बरोबरच तोंडाचे आणि दातांचे आरोग्यही महत्वाचे आहे. कारण बऱयाचशा रोगजंतूंचे आगमन प्रथम तोंडावाटे होते. मग हे पाहुणे एकतर पोटात जातात किंवा दातांच्या फटींमध्ये, जिभेवर ठाण मांडून बसतात आणि जंतुसंसर्ग होऊन रोग निर्माण करतात . हे टाळायचं झाल्यास दातांची रचना आणि त्याचे भाग जाणून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वयोमानानुसार वेगळय़ावेगळय़ा टप्प्यात दातांची निगा कशी राखावी हे समजून घेणे महत्वाचे आहे .
निसर्गाने दोन प्रकारचे दात दिलेले आहेत.
1. दुधाचे दात ( 6 महिने – 12 वर्षे )
2. कायमचे दात ( 6 वर्षे – 70 वर्षे अंदाजे)
दात मुख्यत्वे 3 आवरणानी बनलेले असतात.


1. इनॅमल – सर्वात बाहेरचा पांढरा दिसणारा भाग, ह्या भागाला चेतना नसल्याने कीड लागली असता संवेदना होत नाही.
2. डेन्टनि – इनॅमलच्या आतला भाग, सचेतन भाग असल्याने जेव्हा कीड या भागापर्यंत पोहोचते तेव्हा थंड, गरम पदार्थाच्या सेवनाने झिणझिण्या येतात.
3. पल्प – हा सर्वात आतील भाग ज्यामध्ये दाताच्या पालनपोषणाची जबाबदारी असते कारण यात दाताला रक्त पुरवठा करणारी नस असते. या भागापर्यंत कीड पोहोचली असता जोरात कळा येणे, सूज येणे हे प्रकार घडतात .
4. . आल्वोलाय बोन – दातांना जबडय़ामध्ये घट्ट धरून ठेवण्यासाठी या हाडांची मदत होते.
बरेचसे पेशंट दातांची कीड पल्प म्हणजेच सर्वात आतील भाग जिथे नस असते, तिथेपर्यंत पोहोचल्यानंतर दंतवैद्यांकडे येतात, अशा वेळी दाताच्या मुळांना स्वच्छ करून रूट कॅनॉल ट्रीटमेंट करणे गरजेचे असते. जर हीच कीड इनॅमल किंवा डेन्टनिमध्ये असते तेव्हा साध्या सिमेंट भरण्यानेही दातांची शक्ती मजबूत ठेवता येते. पण पेशंटला या दरम्यान काहीच त्रास होत नसल्याने दुर्लक्ष केले जाते. बरेचसे पालक लहान मुलांच्या दातांच्या बाबतीत दुर्लक्ष करताना दिसतात कारण ते पडून नवीन दुसरे कायमचे दात चांगले येणारच असा त्यांचा समज असतो. दुधाचे दात 6 महिन्यांपासून ते 12 वर्षापर्यंत असतात. मुलांची जबडय़ाची हाडं खूपच मृदू आणि छिद्रमय असल्याने पू भरणेही खूप जलद होते परिणामी सूज येते. बाळाच्या जन्मापासूनच मौखिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी.
मुख्यत्वाने दोन प्रकारच्या संभावना लहान मुलांमध्ये दिसून येतात .
गर्भावस्थेतच दुधाच्या दातांची निर्मिती होत असते. त्यामुळे गर्भवतीचा आहार कॅल्शियम आणि फॉस्फोरसयुक्त असणे आवश्यक. बाळाच्या 6 व्या महिन्यात पहिला दात फुटतो आणि हळूहळू 26 महिन्यापर्यंत दुधाचे सर्व दात येतात, त्या काळात बाळाला ताप येणे, जुलाब, सर्दी होणे, तोंडातून लाळ गाळणे, बाळाची किरकिर वाढणे यासारख्या तक्ररी वाढतात.
उपाय
बाळ जन्माला आल्यापासूनच अंघोळीच्या वेळी बाळाचे तोंड म्हणजेच जीभ आणि हिरडय़ांना स्वछ नखं काढलेल्या बोटाने हलकासा दाब देत शुद्ध नैसर्गिक मधानेही मसाज करायला हरकत नाहड. बाटलीतून साखरयुक्त दूध मुलांना दिले जाते. हे पिता पिता मुले झोपी जातात. हा साखरेचा थर दाताच्या पृष्ठभागावर साचतो आणि दाताची हानी व्हायला सुरवात होते. मुलं मोठी झाल्यावर तोंड व्यवस्थित धुवायला देत नाहीत त्यामुळे दातांकडे दुर्लक्ष होते. सुरुवातीला खडूसारखा पांढरा थर दातावर दिसायला लागतो मग काही दिवसांनी तोच भाग चॉकलेटी रंगाचा होतो हीच किडीची सुरवात. मग मुलांना दात दुखणे, किरकिर वाढणे, पु भरणे, सूज येणे बऱयाच वेळा ताप येतो, आहार चावण्यात त्रास होत असल्याने त्यांचे जेवण कमी होते, जरा मोठी असणाऱया मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो, मुले हसायला लाजतात. बाळाची रोग प्रतिकारक शक्ती कमी असेल तर मग अशी इन्फेकशन्स खूप विकोपालाही जाऊ शकतात. आतून नव्याने फुटणाऱया कायमच्या दातांनाही याचा परिणाम होतो, ते किडूनच येतात, त्यामुळे बाळाच्या दुधाच्या दातांची काळजी घेणे खूप गरजेचे असते.
बाळाच्या दातांची काळजी ः
1. बाळाच्या जन्मापासूनच प्रत्येक वेळेला बाळाला दूध पाजवून झाल्यावर एका स्वच्छ सुती कापड बोटाला गुंडाळून बाळाच्या हिरडय़ा आणि जीभ पुसून घ्यावी . पुसताना नखे वाढलेली नाहीत याची खबरदारी घ्यावी . शक्मयतो बाळाला बिन साखरी दुधाची सवय केलेली बरी.
2. बाळ जरा मोठे झाल्यावर म्हणजेच जेव्हा ते बाहेरचा आहार घेऊ लागते तेव्हा जेवणानंतर सॉफ्ट ब्रशने दातांना साफ करावे . जो पर्यंत बाळाला थुंकणे जमत नाही तोपर्यंत बाहेरच्या टूथपेस्ट न वापरणेच योग्य. पण रोज दिवसातून दोनदा सकाळी आणि रात्री ब्रश करण्याची सवय मुलांना लावावी .
3. मुलांच्या आहारात तंतुमय पदार्थ जास्त असावेत जसे की गाजर , काकडी , फळांमध्ये संत्री, मोसंबी, सफरचंद इत्यादी ज्याने नैसर्गिक मौखिक स्वच्छता होईल .
4. बाजारात मिळणारे फास्ट फूड, जंक फूड पासून मुलांना लांब ठेवावे. कारण असे पदार्थ दातांच्या फटीत अडकतात आणि मग दात किडायला सुरवात होते, शिवाय पोटात जाऊन पचायलाही ते जडच. त्यामुळे लहान मुलांच्या नाजूक पचन संस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम होतो .
4. शक्मयतो वर्षातून किमान एकदा तरी बाळाबरोबर घरातील सर्वानीच दंतवैद्याकडे तपासणी करून घ्यावी.
बऱयाच लोकांचा असा समज असतो की दाताचे उपचार खूप महाग असतात शिवाय मानसिक भीती ती वेगळीच. पण हे टाळायचे झाले तर आपण आपल्या मुलांना मौखिक आरोग्याबद्दल जागरूक करणे गरजेचे आहे.
(पूर्वार्ध)
– डॉ. स्नेहल अवधूत सुखटणकर
दंतवैद्य