सध्या कोरोना विषाणूजन्य आजारामुळे अख्खे जग घाबरुन गेले आहेत.
- वास्तविक, कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत असला तरी त्याचा मृत्यूदर हा अत्यंत कमी आहे. चिकुनगुनिया, स्वाईन फ्ल्यू यांसारख्या आजारांचा मृत्यूदर हा जवळपास 10 टक्के होता; परंतु कोरोनाचा मॉर्टेलिटी रेशो अवघा 2.5 ते 3 टक्के आहे. त्यातही वयोवृद्ध नागरिक व लहान मुलांना याचा धोका अधिक असतो.
- याखेरीज, मधुमेह, कर्करोग, हृदयरोग अशा काही आजारांनी आधीपासूनच बाधित असल्यास अशा व्यक्तींनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.
- सध्याच्या काळात अशा रुग्णांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी, मुलांनी कटाक्षाने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे योग्य ठरणार आहे. कारण कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे एकाकडून दुसर्याकडे या विषाणूचा संसर्ग होतो.
- खोकणे, शिंकणे, थुंकणे या माध्यमातून कोरोनाच्या विषाणूंचा प्रसार होतो. त्या विषाणूंच्या संपर्कात असलेल्या वस्तू, व्यक्ती किंवा पदार्थावर ते विषाणू जाऊन बसतात. तसेच हवेतूनही कोरोनाचे विषाणू पसरत असल्यामुळे नाकावाटे, तोंडावाटे कोरोनाची बाधा होऊ शकते. म्हणूनच यासंदर्भात आरोग्यतज्ञांकडून दिल्या जाणार्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे.
- येणारे काही दिवस प्रत्येकानेच ठराविक वेळाने हँडवॉश किंवा सॅनिटायजरच्या साहाय्याने हात स्वच्छ आणि शास्रोक्त पद्धतीने धुवावेत.
- खोकणार्या आणि शिंकणार्या व्यक्तींपासून चार फूट दूर अंतर राखावे. आपल्याला शिंक अथवा खोकला आल्यास तोंडावर रुमाल धरावा. खबरादीचा उपाय म्हणून तोंडाला
मास्क वा रुमाल बांधावा. तसेच शक्य असल्यास हँडग्लोव्हजचा वापर करावा. - याखेरीज धूम्रपान, मद्यपान टाळणे, किरकोळ स्वरुपाच्या सर्दी-खोकला-ताप यांकडे दुर्लक्ष न करणे, गरजेशिवाय घराबाहेर न पडणे आदी गोष्टी खबरदारीचा उपाय म्हणून गरजेच्या आहेत.
- कोरोनाची लागण झाली की मृत्यू अटळ आहे अशा गैरसमजात राहू नये. नुकतेच भारतात कोरोनाबाधित 11 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून ते आता ठणठणीत बरे झाले आहेत. त्यामुळे योग्य वेळी निदान आणि योग्य वेळी नेमके उपचार झाल्यास कोरोनावर मात करता येते. त्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची आणि सतर्कतेची.
- अलीकडेच पुण्यातील राष्ट्रीय विषाणू निदान संस्थेने हा महाघातक विषाणू मानवाच्या शरीराबाहेर ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे येणार्या काही दिवसांत कोरोनावर प्रभावी औषध विकसित होण्याची आशा पल्लवित झाली आहे. त्यामुळे येणार्या काळात कोरोनाविरुद्धचा हा लढा आपण लवकरच जिंकणार आहोत; पण तोपर्यंत गरज आहे ती सर्वंकष सामूहिक प्रयत्नांची.