तरुण भारत

निपाणीत शुकशुकाट, फक्त पाखरांचा किलबिलाट…!

अमर गुरव/ निपाणी

जिल्हय़ातील दुसऱया क्रमांकाचे मोठे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱया निपाणीत रविवारी संपूर्ण दिवसभर शुकशुकाट पहायला मिळाला. कोरोना विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यासाठी रविवारी देशभरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला निपाणीतही 100 टक्के प्रतिसाद मिळाला. एरव्ही माणसांची धावपळ, वाहनांचा गोंगाट व प्रदुषणाचा मारा सहन करणाऱया शहराने रविवारी मात्र मोकळा श्वास घेतला.

यापूर्वी 1984 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशाबरोबर संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली होती. भारतात तेव्हा जनतेने उत्स्फुर्तपणे बंद पाळून हत्येचा तीव्र निषेध केला होता. याचवेळी निपाणीतही कडकडीत बंद होता. तसेच निपाणीचे तत्कालीन नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे यांच्या अकाली मृत्यूनंतरही 8 ऑक्टोबर 2001 रोजी निपाणी पूर्णपणे थांबली होती. याशिवाय विविध प्रकारची आंदोलने, काळा दिन, हुतात्मा दिन यादिवशी बंद पाळला गेला. मात्र 14 तासाहून अधिक काळ पूर्ण रस्ते निर्मनुष्य असलेली स्थिती शहराने पहिल्यांदाच अनुभवली. विशेष म्हणजे शहरातील मुख्य असलेला जुना पी. बी. रोडवर रविवारी माणसे वाहनांऐवजी चक्क पक्षांचा किलबिलाट ऐकायला मिळाला.

सिमेंटच्या वाढलेल्या जंगलांमध्ये पक्ष्यांनी मुक्तपणे विहाराचा आनंद घेतला. एरव्ही निपाणी बंद असताना बहुतांशी व्यावसायिक, कर्मचारी हे पर्यटनाचा बेत आखत. मात्र रविवारी संपूर्ण देशात ‘जनता कर्फ्यू’मुळे प्रत्येकजण बंद दरवाजाआड असल्याचे दिसून आले.

पालिकेकडून ‘संधीचे सोने’

दरम्यान जनता कर्फ्यूमुळे एकही व्यक्ती रस्त्यावर दिसणार नाही. हे गृहीत धरुन नगरपालिकेतर्फे संपूर्ण बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबविण्याबरोबर बसस्थानक धुवून काढण्यात आले. तसेच येथे फॉगींग मशीनद्वारे आयुक्त महावीर बोरण्णावर यांच्या पुढाकाराने बहुतांशी शहरात पालिका कर्मचाऱयांकडून जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. पालिकेच्या या उपक्रमाचेही कौतूक होत आहे.

अन् ऊर भरुन आला

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यूमध्येही आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस प्रशासन, डॉक्टर, नर्स, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कर्मचारी, पत्रकार यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. त्यामुळे सायंकाळी 5 वाजता शहर व उपनगरात बंद दरवाजाआड असलेल्या नागरिकांनी 5 मिनिटांसाठी घराबाहेर तसेच रस्त्यावर येऊन टाळय़ांचा गजर तसेच घंटानाद केला. यामुळे एकच भावनिक वातावरण निर्माण झाले. तसेच अत्यावश्यक सेवेकऱयांना उर्जा मिळण्याबरोबरच त्यांचा उरही भरुन आल्याचे पहायला मिळाले.

Related Stories

एसजी, साईराज वॉरियर्स, युनायटेड, नरवीर, पीसीसी संघांचे विजय

Amit Kulkarni

मनपातील महसुल विभागात गोंधळाचे सावट

Patil_p

देवबाग-सदाशिवगड येथील नृसिंह यात्रा 25 पासून

Amit Kulkarni

हॉटेलमधील कचरा विल्हेवाटीबाबत चर्चेसाठी लवकरच बैठक

Patil_p

बेळगाव जिह्यात गुरुवारी 185 जणांना कोरोनाची बाधा

Rohan_P

कोरोनाकाळात वृत्तपत्र विक्रेत्यांची सेवा उल्लेखनीय!

Amit Kulkarni
error: Content is protected !!