तरुण भारत

ही लढाई घरात बसूनच जिंकावी लागेल

आयुष्यापेक्षा क्रिकेट मोठे नाही, घरीच बसून रहा : विश्वचषक जेता माजी कर्णधार कपिलदेव यांचे प्रतिपादन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

कोरोनाविरुद्धची लढाई आपण निश्चितच जिंकू, याबद्दल विश्वास वाटतो. मात्र, त्यासाठी सरकार, आरोग्य खात्याने जे निर्देश घालून दिले आहेत, त्यांचे काटेकोर पालन करावेच लागेल. तसे केले तरच आपण कोरोनावर मात करु शकतो. ही लढाई अशी आहे, जी घरात बसूनच जिंकावी लागेल, असे प्रतिपादन भारताचे विश्वचषक जेते कर्णधार कपिलदेव निखंज यांनी केले. केंद सरकारने जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये दिलेल्या अटींचे काटेकोर पालन नागरिकांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो आणि कोणीही त्याला अपवाद नाही. यामुळे सर्व नागरिकांनी घरातच बसून रहावे आणि बाहेर जाणे कटाक्षाने टाळावे. हे संकट मोठे आहे. पण, यामुळे नागरिक अधिक खंबीर होतील आणि त्यांचे मनोधैर्य वाढेल’, असा दावा त्यांनी पुढे केला.

सध्या पूर्ण लॉकडाऊन असताना वेळ कसा व्यतित करता, या प्रश्नावर कपिलदेवनी आपण प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहतो, असे नमूद केले. ‘यापूर्वी वेगवेगळे कार्यक्रम, बैठका, निमंत्रणे यामुळे सातत्याने बाहेर जावे लागायचे. प्रवास करावा लागायचा. त्यामुळे घरी फारसा नसायचो. पण, आता लॉकडाऊनमुळे पूर्ण वेळ घरी असतो. पत्नीसमवेत वेळ व्यतित करतो. इतक्या वर्षात प्रथमच अशी संधी मिळाली. यापूर्वी वेळ मिळत नसे. पण, आता अशी तक्रार करण्याची काहीच सोय राहिलेली नाही’, असे ते तपशीलवार बोलताना म्हणाले.

‘घरी स्वच्छता करणे, बाग स्वच्छ करणे, असे छंद मी आता जोपासले आहेत. माझी छोटी बागच आता माझ्यासाठी गोल्फ कोर्स झाले आहे. मागील अनेक वर्षात हे शक्य झाले नव्हते. घरच्या आचाऱयाला आम्ही सुट्टी दिली आहे आणि मी स्वतः स्वयंपाक करतो आहे’, असेही ते स्मित हास्यासह म्हणाले. पत्नी रोमी इंग्लंडला येणार होती, त्यावेळी मी स्वयंपाक करणे शिकले होतो. त्याचा आता फायदा होतो आहे, असेही त्यांनी नमूद केले.

सध्याचे क्रिकेटपटू क्रिकेट अति होत आहे, असे म्हणायचे, त्यांनी आता काय करायला हवे, या प्रश्नावर कपिल यांनी वेगळी भूमिका मांडली. ‘क्रिकेटमुळे विश्रांती मिळत नाही, असे क्रिकेटपटू नेहमी म्हणायचे. आता देवाने संधी दिलीच आहे तर हवी तितकी विश्रांती घ्या. खेळाडूंनी आपल्याला जे आवश्यक आहे, ते करावे. तंदुरुस्तीसाठी जिमला वेळ द्यावा, ज्यांना विश्रांती आवश्यक वाटते, त्यांनी पूर्ण वेळ विश्रांती घ्यावी’, याचा कपिलनी येथे उल्लेख केला.

सध्याच्या परिस्थितीशी क्रिकेटची सांगड घालायची असेल तर त्याकडे तुम्ही कसे पाहता, यावर कपिलदेव यांनी आयुष्यापेक्षा क्रिकेट अजिबात मोठे नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केले. ‘आयुष्यापेक्षा क्रिकेट मोठे नाही. त्यामुळे, प्रथम स्वतःला सांभाळा आणि याचवेळी इतरांनाही सांभाळा. सध्याची जी परिस्थिती आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा. चित्रपट, क्रिकेट, लोकांच्या भेटीगाठी या सर्व गोष्टी नंतर होतच राहतील. पण, जर आयुष्यच बाकी राहिले नाही तर क्रिकेट घेऊन काय कराल? आता सध्याच्या घडीला इतक्याच बाबीवर लक्ष केंद्रित करायला हवे की, कोरोनावर मात करायला हवे आणि हे करायचे असेल तर घरातच थांबून रहावे लागेल. सर्व काही सुरळीत झाल्यानंतर सारे काही परत येईल’, असे ते विस्तृतपणे बोलताना म्हणाले.

आयपीएल रद्द तर रद्द! काहीही चिंता नको

ऑलिम्पिक एका वर्षाने लांबणीवर टाकले गेले आहे. असाच निर्णय आयपीएलबाबतही घ्यावा लागेल का, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘आपण कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक असायला हवे. यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित करावी लागली तर करुद्यात. त्याने काहीही बिघडत नाही. जेव्हा आपण आजारी असतो, त्यावेळी डॉक्टरांकडे जातो. आताही असे समजा की, पृथ्वी आजारी आहे आणि देवाने आराम करण्यासाठी वेळ दिला आहे. आपण समाजासाठी काय करु शकतो, त्यावर आता लक्ष केंद्रित करावे लागेल’, असे कपिल म्हणाले.

Related Stories

फ्रेंच स्पर्धेतील विजेती स्वायटेक क्वारंटाईनमध्ये

Patil_p

पंडय़ा बंधू, सूर्यकुमार मुंबई इंडियन्स संघात दाखल

Patil_p

सतीश, आषिश, सुमित सांगवान उपांत्य फेरीत,

Patil_p

बुमराह म्हणतो, मी फक्त माझी जबाबदारी पार पाडतो!

Patil_p

रशियाच्या कारात्सेव्हचे पहिले एटीपी जेतेपद

Patil_p

सिंधूच्या विनंतीला साईची मान्यता

Patil_p
error: Content is protected !!