तरुण भारत

…तर आयपीएल स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोरोना व्हायरसच्या उद्रेकाने संपूर्ण जगच ‘थांबले’ असून जगभरात होणाऱया अनेक क्रीडा स्पर्धाही लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत किंवा रद्द तरी करण्यात आल्या आहेत. त्यात आयपीएल स्पर्धेचाही समावेश आहे. सध्या ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असला तरी ती रद्द केली जाण्याची चर्चा सुरू आहे. अशातच बीसीसीआयने ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेवर लक्ष ठेवले आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार असून कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली स्थिती ओसरली नाही तर कदाचित ही स्पर्धाही लांबणीवर टाकली जाऊ शकते. तसे झाल्यास त्या अवधीत आयपीएलचे आयोजन करण्याचा विचार बीसीसीआय करीत आहे.

Advertisements

या शक्यतेबद्दल बीसीसीआयचा एक पदाधिकारी म्हणाला की, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल आयोजित करण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकली गेली तरच हे शक्य होणार आहे. सध्या सर्वच देशांनी आपल्या सीमा विदेशी प्रवाशांसाठी बंद केल्या आहेत आणि ऑस्ट्रेलियाने तर लॉकडाऊन सहा महिन्याचे असण्याची शक्यता बोलून दाखविली आहे. मात्र यात बदल होऊ शकतो आणि परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. ब्रिटनमध्येही कोरोना महामारीचा व्यापक प्रसार झाला असल्याने तेही ऑस्ट्रेलियाप्रमाणे दीर्घ काळासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकतात. भारत सरकार आंतरराष्ट्रीय सीमाबंदी करण्यासंदर्भात पुढे कोणता निर्णय घेते, याबद्दलही आम्हाला अद्याप काही कळालेले नाही. त्यामुळे आयपीएलसाठी सुरक्षित ‘मोकळी’ जागा फक्त ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच मिळू शकते. पण याचवेळी टी-20 विश्वचषक स्पर्धा असल्याने त्याचे आयोजन करणे अशक्य होऊ शकते. आयसीसीने विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला तरच आयपीएल आयोजित केले जाऊ शकते,’ असेही हा पदाधिकारी म्हणाला. टी-20 विश्वचषक स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. समजा प्रत्येक देशाने आतापासूनच सहा महिन्यांचे लॉकडाऊन घोषित केले तर ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत त्याचा कालावधी संपुष्टात येतो. मात्र कोरोना व्हायरसचा प्रसार तोपर्यंत पूर्णपणे थांबलेला असणे आणि तो मानवी नियंत्रणात येणे आवश्यक असेल. थोडक्यात सांगायचे तर बरीच गणिते जुळून यावी लागतील. त्याचप्रमाणे आयसीसीकडे टी-20 विश्वचषक स्पर्धा 2022 पर्यंत लांबणीवर टाकण्याचा शेवटचा पर्याय असेल. कारण 2021 मध्ये ही स्पर्धा भरविण्यासाठी मोकळा वेळच नाही. पण या सर्व जर तरच्या गोष्टी आहेत. मात्र आयपीएल या अवधीत भरविण्याबाबत चर्चा झाली आहे, असेही हा पदाधिकारी म्हणाला.

या संदर्भात आयसीसीच्या पदाधिकाऱयांशी संपर्क साधला असता, विश्वचषक स्पर्धा नियोजित वेळेतच घेतली जाईल, लांबणीवर टाकण्याचा प्रश्नच उद्भवत  नसल्याचे त्यांनी सांगितले. याआधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष केविन रॉबर्ट्स यांनीदेखील ही स्पर्धा ठरल्या वेळेतच होण्याची आशा व्यक्त केली होती.

आयपीएल नाही तर खेळाडूंना मानधनही नाही

स्पर्धा नाही तर मानधनही नाही, हेच सूत्र सर्व प्रँचायझी आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंना लागू करतील आणि याचमुळे यंदाची आयपीएल स्पर्धा होऊ शकली नाही तर स्पर्धेत करारबद्ध असलेल्या खेळाडूंना याचा थेट आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. तूर्तास, यंदाची आयपीएल स्पर्धा दि. 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकली गेली असली तरी त्यानंतर देखील ती होण्याची शक्यता काही प्रमाणात धुसर झाली आहे.

‘आयपीएलमध्ये स्पर्धा सुरु होण्यासाठी एका आठवडय़ाचा कालावधी बाकी असताना 15 टक्के मानधन अदा केले जाते. त्यानंतर स्पर्धेदरम्यान आणखी 65 टक्के मानधन दिले जाते आणि उर्वरित 20 टक्के मानधन स्पर्धा संपल्यानंतर ठरावीक मुदतीच्या आत अदा करावे लागते’, असे आयपीएल प्रँचायझीतील एका सूत्राने वृत्तसंस्थेला सांगितले.

‘बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सध्याच्या घडीला कोणत्याही खेळाडूला काहीही मानधन अदा केले जाणार नाही. पण, आयपीएल स्पर्धाच होऊ शकली नाही तर त्यात करारबद्ध खेळाडूंची अपेक्षित आर्थिक समीकरणे मात्र बिघडू शकतात’, असे भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी नमूद केले. अगदी स्थानिक खेळाडूंना देखील याचा फटका बसू शकतो, असे ते म्हणाले. सध्याच्या घडीला स्पर्धेचा कालावधी कमी करुन मे मध्ये त्याचे आयोजन करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. पण, अद्याप या प्रयत्नांना किंचीतही यश प्राप्त झालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

Related Stories

लंकेच्या डावात मॅथ्यूजचे नाबाद शतक

Patil_p

मोहन बगानचा माजी फुटबॉलपटू कोरोनाचा बळी

Patil_p

क्रीडा मंत्रालयाकडून पंधराशे प्रशिक्षकांची भरती

Patil_p

नेदरलँडस्ची एकतर्फी बाजी

Patil_p

हॉकीच्या मानांकनात भारतीय संघांची झेप

Patil_p

बलबीर सिंग सिनियर यांची प्रकृती स्थिर

Patil_p
error: Content is protected !!