तरुण भारत

रामाचा एक गुण तरी अंगीकारुया!

आपल्या देशातील आतापर्यंतचा सर्वात महान आणि आदर्श राजा म्हणून श्रीरामाकडे पाहिले जाते. अशा या आदर्श राजाचा जन्मदिवस रामनवमी. आपण शेकडो वर्षे विविध प्रथा व परंपरेने साजरी करतोच आणि यावर्षी एका महाभयंकर संकटाशी आपण सामना करीत आहोत त्यामुळे आपण हा उत्सव साजरा करू शकत नाही हा केवढा मोठा दैवदुर्विलास! मात्र या आदर्श राजाचे स्मरण घरबसल्या करायला काय हरकत आहे. कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला वेढले आहे. दिवसाकाठी एकेका अत्यंत प्रगत राष्ट्रामध्ये शेकडोंच्या संख्येने मनुष्यप्राण्याचे बळी हा विषाणू घेतो आहे. अमेरिकासारखा देश पूर्णतः हादरला! स्पेन, इटलीसारखे देश विरघळायला लागले आहेत. जर्मनीसारख्या राष्ट्रात जनतेचे आरोग्य धोक्यात आणि जगभरातील अनेक देशांवर पूर्वी आपले अधिराज्य गाजविणाऱया इंग्लंडमध्ये मृत्युने थैमान मांडावे! हे सर्व आपण आपल्या उघडय़ा डोळय़ांनी पाहतो आहोत. या विषाणूंनी भारताचा उंबरठा ओलांडला. आतापर्यंत 37 जणांचे बळी गेले. ज्या चीनमध्ये या विषाणूंनी जन्म घेतला, त्या चीनमधील परिस्थिती आटोक्यात आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये मृत्युने थैमान माजवावे हे सर्व आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडले आहे. जगातील प्रगत राष्ट्रांच्या विरोधात शिजलेले हे कटकारस्थान आहे असे म्हटले तर ते निश्चितच वावगे ठरणार नाही. युरोपियन राष्ट्रांच्या तुलनेत विविध पातळीवरील प्रगतीचा विचार करता भारत चार कोस जरी दूर असला व जगात दुसरा क्रमांकावरील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या राष्ट्राने आज वेळीच जी काय पावले उचलली आणि आज जो जनता कर्फ्यू अजून चालू आहे ते खरे तर स्वागतार्ह पाऊल आहे. ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला कानमंत्र ऐकला ते वाचतील आणि ज्यांनी मोदींनाच उलटपक्षी आव्हान देत निजामुद्दीन येथे जाऊन एकत्रित प्रार्थना व सभा घेतल्या त्याची आज हालत अत्यंत बिकट होत आहे. आपल्या भारतीय संस्कृती व परंपरांचे पालन केल्यास निश्चितच भारतीयांना कोरोना असो वा अन्य काही त्यांना तुमच्या आजूबाजुला येण्याचा धीर देखील होऊ शकणार नाही. रामायणाचा अभ्यास केला असता भोग देवालादेखील चुकलेले नाहीत. तिथे मानवाचे काय! आज कोरोना महामारीचे मानवाने निर्माण केलेले भूत प्रत्येक देशातील जनतेच्या मानगुटीवर येऊन बसू पहात आहे. आजपर्यंत आपल्याला, आपल्या देशाला तसेच जगाला मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू, प्लेगसारख्या साथींनी मृत्युला तांडवनृत्य करायला भाग पाडले. देशात विदेशात अर्थात जगात हजारोंचा नव्हे तर लाखोंच्या संख्येने माणसे त्याला बळी पडली. तरीदेखील एवढी भीती कधी निर्माण झाली नव्हती. एवढी दहशत कोरोनाच्या विषाणूची संपूर्ण जगात बसवली. आयुष्यात कोणासमोर हरला नाही त्या अमेरिकेलादेखील कोरोनाने हरवले. ज्या चीनमध्ये या कोरोनाने जन्म घेतला त्या चीनसाठी तो भस्मासूर ठरला व तिथे त्याने आतापर्यंत किमान त्यांच्या सरकारी नोंदीनुसार साडेतीन हजारांचे बळी घेतले. प्रत्यक्षात हा आकडा नेमका चीनमध्ये किती आहे हे निश्चितच कळत नाही. मात्र आज भारतात वेळीच उपाययोजना हाती घेतल्याने भारताच्या शेजारी असलेल्या चीनमधून हा फैलाव भारतात पोचायला बराच विलंब लागला. खरोखरच आपण भाग्यवान आहोत म्हणून तर आजपर्यंत आपण या महामारीपासून थोडेफार दूर आहोत. भारतात या महामारीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याकडे भारत सरकारने तसेच गोवा महाराष्ट्र, कर्नाटक, यातील राज्यांबरोबरच देशातील सर्वच राज्यांनी जी कंबर कसली आहे त्याला इतिहासात तोड नाही. भारत हा एक आध्यात्मिक देश आहे. भारतीय शास्त्र व भारतीय विज्ञान परंपरादेखील महान आहे. आपले आयुर्वेदशास्त्र प्रत्येक रोगावर उपाय सांगते. इलाजही सांगते. आपण त्याकडे कितपत गांभीर्याने पाहतो हे प्रत्येकाने ठरवावे. भारताकडे प्राचीन काळापासून औषधोपचार आहेत. आपल्या देशातील कित्येक ग्रामीण भाग हे वनौषधी आयुर्वेदिक पारंपरिक उपचारांवर जगतात. ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल. आजच्या या पवित्र दिनी आपण सारेजण श्रीरामाचे भक्त! हनुमंताचे उपासक! या दैवतांची नावे घेऊन कोरोना महामारीचे या देशातून अगोदर उच्चाटन करण्याची शपथ घेऊ व त्यादृष्टीने आपण आपल्या सामर्थ्याद्वारे जगासमोर एक आदर्श निर्माण करू. त्यासाठीच सध्या लॉकडाऊन अर्थात जनता कर्फ्यूच्या माध्यमातून थोडे दिवस घरी बसू! शक्य होईल त्यावेळी घराबाहेर पडून आपल्या नडलेल्यांना मदत करू. स्वच्छता राखू. आपल्या अरबट चरबट विरूद्ध आहार सातत्याने घेण्याच्या आधुनिक सवयी बदलू! शुद्ध आहार, शुद्ध विचार व शुद्ध चांगल्या सवयी लावून घेऊ आणि त्या आपल्या पर्यायाने देशाला जगाला आदर्श राज्य बनविण्याची शपथ घेऊया. रामासारखा राजा झाला नाही पण यापुढे होणार नाही असे न म्हणता सध्याच्या राजकर्त्यांना सुबुद्धी प्राप्त होवो असा विचार मनात आणूया. यंदाची रामनवमी घरातच साध्या पद्धतीने साजरी करू. शुद्ध आचरण, प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची हातोटी व वीरवृत्ती आणि कोणत्याही गोष्टीचा त्याग करण्याची वृत्ती असे प्रभू रामचंद्रांचे असंख्य गुण आहेत. त्यातील एखादा जरी अंगी बाळगला तरी देखील आपले व आपल्याबरोबर इतरांचे देखील जीवन सार्थकी लागेल. याशिवाय सध्या जगात सर्वत्र हैदोस घालत असलेल्या कोरोनाशी आपल्याला युद्ध करायचे आहे यासाठी केवळ रामभक्ती करून नव्हे तर प्रत्यक्षात कोरोनाला हरविण्यासाठी आपल्याला उपाययोजना आखून स्वतःला काही दिवस घरातच कोंडून घ्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्यासाठी देवदूत म्हणून आलेले आहेत असे समजून आपण प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची जरी काळजी घेतली तरी हा देश कोरोनाला कायमस्वरूपी  हद्दपार करू शकतो. त्यासाठी थोडाफार त्याग करावाच लागेल. रामनवमीच्यानिमित्ताने रामाचा एक गुण तरी अंगीकारुया!

Related Stories

मुंबईला तडाखा!

Patil_p

अस्वस्थ वर्तमानाची आर्त साद

Amit Kulkarni

भारवीचे ‘किरातार्जुनीयम्’ (7)

Patil_p

पवारांचा पॉवर डे

Patil_p

जे अवतरले अमरकार्या

Patil_p

शिष्यत्व म्हणजे रियाज, गाणं म्हणजे रियाज!

Patil_p
error: Content is protected !!