तरुण भारत

लॉकडाऊनचे गांभीर्य कळतंय पण वळत नाही

गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकात लॉकडाऊनचे हसे होत आहे. जर गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला तर अधिकाऱयांविरुद्ध शंखनाद केला जातो. पोलिसांनी ढिले सोडले तर वर्दळ वाढते. अशावेळी पोलिसांच्या नावेच उलटी बोंब मारली जाते.

लॉकडाऊननंतरही कर्नाटकात कोरोनाचा फैलाव वाढतोच आहे. राजधानी बेंगळूरमध्ये 50 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर संपूर्ण राज्यात बाधितांची संख्या 125 हून अधिक आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांची लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर सुरुवातीचे चार-पाच दिवस त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकात लॉकडाऊनचे हसे होत आहे. जर गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला तर अधिकाऱयांविरुद्ध शंखनाद केला जातो. त्यामुळे साहजिकच राजकीय नेते त्यांना आवर घालतात. पोलिसांनी ढिले सोडले तर वर्दळ वाढते. अशावेळी पोलिसांच्या नावेच उलटी बोंब मारली जाते. कर्नाटकात सध्या असेच घडत आहे.

देशातील पहिला बळी कर्नाटकातील गुलबर्गा येथे गेला. आतापर्यंत तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा परिणाम म्हणून सुरुवातीच्या काळात कोरोनाची वाढ रोखली होती. काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथील निजामुद्दिन भागात तबलिग समाजाची धर्मसभा झाली. या धर्मसभेला जाऊन कर्नाटकातील वेगवेगळय़ा गावात परतलेल्यांची संख्या मोठी आहे. आता त्यांच्यामुळे कोरोनाचा फैलाव झपाटय़ाने वाढतो आहे. सुरुवातीला गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिल्लीहून कर्नाटकात परतलेल्यांची संख्या 300 च्या घरात असेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यांचा हा अंदाज खोटा ठरला. दोन दिवसांत हा आकडा 1500 हून अधिक झाला आहे. एका बेळगावातून 100 हून अधिक जणांनी नवी दिल्ली झालेल्या जमातला हजेरी लावली होती. जिल्हा प्रशासनाने 62 जणांना शोधून काढले आहे. निजामुद्दिनहून परतलेल्या बिदरमधील 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ही संख्या वाढतच चालली आहे. मरकजमधून परतणारे निवांत घरी बसले नाहीत. ते सर्वत्र संचार करतच राहिले. आता तेच महागात पडणार आहे.

कोरोनाने लोकांना खूप काही शिकविले. राबणाऱया हातांना काम नाही, उद्योगधंदे लॉकडाऊनमुळे बंदच आहेत. ज्यांचे हातावर पोट चालते त्यांचे वांदे सुरू आहेत. सरकारने रास्त दर धान्य दुकानाच्या माध्यमातून गरिबांना धान्यवाटप केले आहे. अनेक संस्थांनीही मास्क, धान्य, अन्न, फळे वाटप हाती घेतले आहे. मास्कचा प्रचंड तुटवडा आहे. कोरोनाच्या विषाणूंपासून संरक्षण देण्याची क्षमता ज्या एन-95 मास्कला आहे, त्याची तर मोठय़ा प्रमाणात कमतरता आहे. वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावणाऱयांनाही हे मास्क मिळेनासे झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा एक मोठा उद्योगच सुरू झाला आहे. महिला बचत गटातील सदस्या, कारागृहातील कैदी यांनी मास्क तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. समाजमाध्यमांचा सेवाकार्यासाठी चांगलाच वापर होत आहे. ज्यांना अन्न मिळत नाही त्यांना अन्न पोचविण्याचे काम गावोगावी कार्यकर्ते करीत आहेत. पोलीस, महसूल व आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत. निजामुद्दिनहून कर्नाटकातील वेगवेगळय़ा भागात परतलेल्यांनी काळजी घेतली नाही म्हणून कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे.

केवळ कर्नाटक, महाराष्ट्र किंवा आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीमुळे त्रस्त आहे. ज्या चीनमधील वुहानमधून याचा फैलाव झाला तेथील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. काटेकोरपणे लॉकडाऊन केल्यामुळेच चीनमधील परिस्थिती नियंत्रणाखाली आली. आपल्याकडे नियमांची सातत्याने पायमल्ली केली जाते. प्रत्येक जण 21 दिवस आपापल्या घरात बसा, खाण्यापिण्याचे सामान खरेदी करून झाले की लगेच घरी परता, अनावश्यकपणे रस्त्यावरून फिरू नका, अशा सूचना वारंवार देऊनही त्यांचे पालन होताना दिसत नाही. कोरोना महामारीचे संकट मानगुटीवर असतानाही याला पक्षीय व जातीय रंग देऊन फैलाव रोखण्याऐवजी तो कसा वाढेल यालाच खतपाणी घातले जात आहे. फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांची लॉकडाऊनची घोषणा केली. या कृतीला पक्षीय व जातीय रंग देत लॉकडाऊनची गरज नाही, असे सांगत सुटणारा वर्गही कार्यरत आहे. देशात काय चालले आहे, कोरोनापासून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी जगभरात काय करत आहेत याची पुरेपूर कल्पना असूनही त्याला गांभीर्याने घेतले जात नाही. अशा परिस्थितीत कोरोनासारख्या महामारीचा फैलाव रोखण्यासाठी सरकारला गंभीर पावले उचलावी लागणार आहेत.

लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त फटका शेतकरी व कृषी मालाला बसला आहे. भाजीपाला, फळे आणून विकण्याची सोय नाही. बाजारपेठा कधी सुरू होतात तर कधी बंद केल्या जातात. त्यामुळे कलिंगड, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो आदी शेतीमाल नष्ट केला जात आहे. कारण हा माल शेतातून बाजारात आणून विकण्यासाठी जितका खर्च येतो तितका खर्चही निघेना, अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच आर्थिक संकटातून वाचण्यासाठी शेतकरी उभ्या पिकातच रोलर फिरवतो आहे. शेतकऱयाला या संकटातून वाचविण्यासाठी राज्य सरकारने भाजीपाला व टोमॅटो, कलिंगड, द्राक्षे, लिंबू, टरबूज आदि खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी हा माल शेजारील राज्यांना पुरवला जात होता. लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे शेतीमाल जिथल्या तिथे पडून आहे. म्हणून राज्य सरकारने भाजीपाला व फळांबरोबरच रोज आठ लाख लिटर दूध खरेदी करून ते गरिबांना वाटण्याचा निर्णय घेतला आहे. 14 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊनचा काळ ठरला आहे. सध्याच्या विस्कळीतपणा पाहता ही महामारी लवकर आटोक्मयात येईल, याची शाश्वती नाही. लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊन गंभीर संकटाचा सामना करावा लागेल, याची भीती आहे.

Related Stories

पुलकित नाग्या

Patil_p

कृषिव्यवस्थेतील युवकांचा सहभाग चिंताजनक

Patil_p

फ्रान्समधील बिघडलेले सामाजिक वातावरण

Patil_p

चीनमधील उच्चशिक्षण व्यवस्थेकडून काय शिकता येईल?

Patil_p

ग्रामवास्तव्याने समस्यांचे वास्तव येणार का समोर?

Amit Kulkarni

चंद्रपुरातील मानव-वाघ संघर्ष

Amit Kulkarni
error: Content is protected !!