तरुण भारत

कोरोना-मानवी जीवनावर बहुआयामी परिणाम

जगभर सगळीकडे ठाण मांडून बसलेले ‘कोरोना’चे विषाणू कधी नाहीसे होतील, आणि या विचित्रपणे पसरू शकणाऱया रोगाचा संपूर्ण जगावर कोणता परिणाम होईल या विचाराने सध्या सर्वांनाच ग्रासले आह़े सर्वत्र टाळेबंदी असल्याने कारखाने बंद आहेत, जीवनावश्यक वस्तू आणि औषधे याखेरीज अन्य वस्तूंचा व्यापार ठप्प झाला आहे, वाहतूक थांबली आह़े ही साथ केव्हा आटोक्यात येईल आणि थांबलेले व्यवहार पुन्हा कधी सुरळीत होतील याचा अंदाज कुणालाच येत नाह़ी पंधरा दिवसांपूर्वीच्या याच स्तंभातील लेखामध्ये जगातील व्यवहारांचे एक ट्रिलियन (एकावर बारा शून्ये) डॉलर एवढे नुकसान होईल असा उल्लेख ‘जगातील वाणिज्य आणि व्यापार विकास संघटने’च्या अहवालाचा आधार घेऊन केला होता; आता त्याच आंतरराष्ट्रीय संस्थेने या नुकसानाची किंमत पावणेतीन ट्रिलियन डॉलर होईल, असा नवा अंदाज व्यक्त केला आह़े या काळात अमेरिकेमध्ये ‘कोरोना’चा प्रसार अत्यंत वेगाने वाढला आणि इटली व स्पेनमधलाही आटोक्यात आला नाह़ी

या नव्या रोगाचे परिणाम अनेक बाजूंनी होणार आहेत़ जगातील वेगवेगळ्या देशांवर होणार आहेत़ जोपर्यंत या विकासाला प्रतिबंध करणारी प्रभावी लस निर्माण केली जात नाही तोपर्यंत माणसांनी परस्पर संपर्क, थेट स्पर्श आणि गर्दी टाळणे हाच उपाय अवलंबण्यावर बहुतेक देशातील जनतेच्या आणि त्या देशातील सरकारांचा भर राहील़ परिणामी लोकांच्या मुक्त हालचाली आणि प्रवास यांच्याशी संबंध येणाऱया उद्योगधंद्यांना मोठा फटका बसेल, हे स्पष्ट आह़े या उद्योगांमध्ये पर्यटन, हॉटेल आणि वाहतूक साधने यांचा समावेश होत़ो माले, मालदीव, अशी छोटी छोटी राष्ट्रे पर्यटन व्यवसायावर चरितार्थ चालवतात़ भारतात लॉकडाऊन झाल्यावर दुधाचा खप कमी झाला आणि भाव उतरल़े याचे कारण हॉटेल्स बंद झाल़ी याचा अर्थ हॉटेलांना माल पुरवणाऱयांना फटका बसल़ा ही मोठी साखळी आह़े मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीवर कमालीच्या मर्यादा आल्याने इंधनांचे दर उतरल़े लक्षावधी वाहने एकेका देशात बंद अवस्थेत उभी राहिली आहेत़ गेल्या दीड महिन्यात भारतातील मोटार वाहनांची विक्री दहा ते बारा टक्क्यांनी घसरली, पण जगभरात ते प्रमाण तीस टक्क्यांवर गेल़े

Advertisements

मोटार निर्मिती हा एक महत्त्वाचा उद्योग आह़े जगातील एकूण उत्पन्नात त्याचा वाटा 8 ते 9 टक्के असत़ो या व्यापक उद्योगाला प्रचंड नुकसान सोसावे लागत आह़े भारतातील मोटार वाहन उत्पादनांच्या संघटनेच्या मते दररोज तेवीसशे कोटी रुपयांची विक्री बुडत आह़े युरोप खंडात सुमारे दोन कोटी लोक मोटार उद्योगात गुंतले आहेत, त्यापैकी निम्मे तरी नोकऱया गमावून बसले आहेत़ म्हणूनच एकूण जागतिक आर्थिक नुकसान आतापर्यंत पावणेतीन हजार अब्ज डॉलरच्या घरात गेल्याचा अंदाज व्यक्त झाला आह़े

हे नुकसान भरून काढण्यासाठी त्या त्या देशातील सरकारे, उद्योगपती आणि ‘युनो’सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांची धडपड सुरू झाली आह़े जगातील जवळजवळ सर्वच राष्ट्रांना मदत करावी लागेल असे ‘युनो’ला वाटत आह़े विशेषतः विकसनशील देशांच्या मदतीसाठी अडीच हजार अब्ज डॉलर एवढय़ा प्रचंड किमतीचे पॅकेज देण्याचे ‘युनो’ ठरवत आह़े जगातील अमेरिकेसारखी श्रीमंत राष्ट्रे आणि ‘कोरोना’बद्दल ज्याला दोष दिला जात आहे तो चीनदेखील प्रचंड आर्थिक मदतीच्या योजना तयार करत आहे. भारताने दक्षिण आशियाई देशासाठी आपले शंभर कोटी डॉलरचे पॅकेज पूर्वीच जाहीर केले आह़े

या रोगामुळे केवळ आर्थिकच नुकसान होईल असे नाह़ी मुळात त्याचा प्रसार मानवी संपर्कातून होत असल्याने माणसांनी एकत्र येण्यावरच संक्रांत आली आह़े परिणामी उत्पादन प्रक्रियेला जसा फटका बसत आह़े, तसाच मानवी संबंध, सामाजिक सुधारणा, राजकीय प्रतिनिधींची भूमिका, शासकीय सहभाग, तंत्रज्ञानाचा वापर अशा बऱयाच बाबींना हे परिणाम व्यापून उरतील़

अमेरिकेतील एका साप्ताहिकाने याबाबत पाहणी करण्यासाठी तेथील काही विद्वानांकडून विचार जाणून घेतले, त्यांनी प्रकट केलेले विचार अमेरिकेतील जीवनपद्धती, राजकीय, व्यावसायिक आ†िण सामाजिक मूल्ये यांच्या संदर्भात असले, तरी जगभरात सर्वच देशांना अशा पैलूंचा विचार करावा लागेल़

त्या अमेरिकन विद्वानांच्या मते वैयक्तिक संपर्क हा बेभरवशाचा ठरू लागल्याने ‘ऑनलाईन’ व्यवहार वाढतील़ विशेष करून संपर्क तंत्रज्ञानाचा अधिक चांगला उपयोग होऊ लागेल़ विश्वासार्हतेच्या नावाने ‘ऑनलाईन’ ला विरोध करणाऱया नोकरशहांचे काही चालणार नाह़ी अन्य देशातील व्यक्तींकडे संशयाने पाहण्याची सवय 9/11 च्या दहशवादी हल्ल्यानंतर अमेरिकन लोकांना लागली. ‘कोरोना’मुळे त्याच्या पुढची पायरी गाठली जाईल, त्यातून एक नवीन ‘राष्ट्रभक्ती’ उदयास येईल असेही एका विद्वानाने म्हटले आह़े आपली सामाजिक मूल्ये बदलावी लागतील असेही मत व्यक्त झाल़े

 ‘कोरोना’ची लागण टाळण्यासाठी सर्वप्रथम शाळांना सुटय़ा देण्यात आल्य़ा, परीक्षा रद्द झाल्य़ा पॅथरीन मँगुवार्ड या विदुषीला असे वाटत आहे की निकट भविष्यात ‘होमस्कूलिंग’चा स्वीकार करण्याचे प्रमाण वाढेल़ ठोकळेबाज शालेय शिक्षणाला पर्याय म्हणून मुलांना घरातूनच शिक्षण देऊन यथावकाश मान्यता प्राप्त परीक्षांना बसविण्याची ‘होमस्कूलिंग’ नावाची पद्धत गेली पंधरा सोळा वर्षे अगदी कासवगतीने प्रसारित होत आह़े तिला होणारा विरोध बोथट होईल, असे या विदुषीला वाटत आह़े

 निवडणूक झाल्यावर पाच वर्षे पुढारी गायब होतात असे भारतीयांना फार वाटत़े अमेरिकेतील राजकारणावर ‘कोरोना’चा काय परिणाम होईल त्यावर एथॅन झुकेरमन या प्राध्यापकांनी व्यक्त केलेल्या विचारांवरून अमेरिकेतही असेच काहीसे वातावरण असावे असे कोणालाही वाटेल़ प्राध्यापक महाशय म्हणतात की ठिकठिकाणची गर्दी कमी करण्यासाठी काँग्रेसही (तिथली आमसभा) बदलेल़ ती ‘व्हर्च्युअल’ म्हणजे आभासी होईल़ याचा अर्थ प्रत्यक्ष एकत्र न येता व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा होतील़ परिणामी लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी जे वॉशिंग्टनमध्ये तळ ठोकून राहतात, ते आपापल्या गावी परततील आणि मतदारांशी त्यांचा संपर्क वाढेल़ दुसरीकडे प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहिल्यावर गदारोळ करून दबाव निर्माण करता येतो ते या आभासी सभांमधून अजिबात प्रभावीपणे साधणार नाही आणि राजकारण्यांचे ‘लॉबिइंग’ कमी होईल असा अंदाजही प्राध्यापक महाशयांनी व्यक्त केला आह़े

  हार्वर्ड विद्यापीठाशी संलग्न असणाऱया एका महाविद्यालयातील प्राध्यापक अकीन फंग यांनी प्रकट केलेले मत भविष्यातील भारतालाही लागू पडेल असे आह़े अमेरिकेसारख्या देशात राज्य सरकारे अािण राज्यातील प्रशासकीय यंत्रणा न्याय आणि ऐक्य भावनांची जपणूक करणारी केंद्रे बनून संकटाचा मुकाबला करण्याचा दूरगामी लोकशाही मार्ग अवलंबतील असे त्यांना वाटत़े महाराष्ट्रातील सरकार आणि जनतेने बव्हंशी याचा प्रत्यय आणून देणारी पावले ‘कोरोना’ संकटात उचलली आहेत़ अनेक बाजूंनी हा चमत्कारिक आजार मानवी जीवनात बदल घडवून आणणार आहे हे नक्की!

राजेंद्रप्रसाद मसुरकर,  9960245601

Related Stories

पेठ वडगाव : शिवसेनेच्यावतीने चीनचा राष्ट्रध्वज जाळून तीव्र निषेध

Shankar_P

रेडझोनमधून बाहेर येण्यासाठी कठोर निर्णयांची गरज

Patil_p

काय आले, काय गेले (1)

Patil_p

अमेरिकेत कोरोनाने घेतले 90 हजार बळी

datta jadhav

अमेझॉनच्या घनदाट जंगलात उकळणाऱया पाण्याची नदी

Patil_p

कोरोनाधीन आहे जगती मानवी समाज

Patil_p
error: Content is protected !!