तरुण भारत

204 देशांमध्ये संसर्ग 54199बळी

कोरोना विषाणू जगभरातील 204 देशांमध्ये फैलावला आहे. कोरोना विषाणूने जगातील 1030285 जण बाधित असून आतापर्यंत 54199 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 219896 रुग्ण या संसर्गातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सिंगापूरचे पंतप्रधान ली-सिएन लूंग यांनी शुक्रवारी देशभरात एक महिन्यासाठी टाळेबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. तर अमेरिकेत आता रुग्णांची संख्या 2 लाख 45 हजार 380 झाली आहे. बळींचा आकडा 6095 वर पोहोचला आहे. 

सिंगापूरमध्ये एक महिन्याची टाळेबंदी लागू होणार : अमेरिकेतील मृतांची संख्या 6 हजारापेक्षा अधिक

सिंगापूरचे कठोर पाऊल

कोरोना संकटाला शांतपणे आणि योग्य मार्गाने हाताळत आहोत. देशात टाळेबंदी 7 एप्रिलपासून लागू होणार असून कालावधीत आवश्यक सेवा आणि मुख्य आर्थिक क्षेत्र वगळता अन्य सर्व कामे बंद राहतील. रेस्टॉरंट, सुपरमार्केट, रुग्णालये, परिवहन आणि बँकिंग सेवा सुरूच राहणार आहे. चालू आठवडय़ात कोरोनाबाधितांची संख्या 1 हजारापेक्षा अधिक झाली आहे. आतापर्यंत 5 जणांना जीव गमवावा लागल्याची माहिती पंतप्रधान लुंग यांनी शुक्रवारी दिली आहे.

न्यूयॉर्कमध्ये 50 हजार रुग्ण

अमेरिकेच्या न्यूयॉर्क प्रांतात सर्वाधिक 93 हजार रुग्ण आढळून आले आहेत. यातील 50 हजार रुग्ण केवळ न्यूयॉर्क शहरातील आहेत. शहरातील 1 हजार 562 जणांचा मृत्यू झाला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर निक्की हेली यांनीही चीनच्या आकडेवारी संदर्भात संशय व्यक्त केला आहे. चीनने दर्शविलेला आकडा योग्य नसल्याचे हेली यांनी म्हटले आहे. सीआयएने देखील चीनच्या आकडेवारीवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला व्हाईट हाउसला दिला आहे.

फ्रान्समध्ये 59105 रुग्ण

फ्रान्समध्ये शुक्रवार सकाळपर्यंत 59105 रुग्ण सापडले असून 5 हजार 387 बळी गेले आहेत. राष्ट्रीय आरोग्य सेवेचे प्रमुख जेरोम सॅलोमन यांच्यानुसार मागील 24 तासांमध्ये 471 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 मार्चपासून आतापर्यंत तेथील रुग्णालयांमध्ये 4503 तर आरोग्य सेवा देणाऱया अन्य संस्थांमध्ये 884 मृत्यू झाले आहेत. रुग्णालयात मृत्युमुखी पडणाऱयांमध्ये 83 टक्के लोकांचे सरासरी वय 70 वर्षांपेक्षा अधिक होते.     

इटलीत 13 एप्रिलपर्यंत टाळेबंदी

युरोप खंडातच 37 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील केवळ इटलीमध्येच 13 हजार 915 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर देशातील एकूण रुग्णसंख्या 115242 झाली आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सरकारने 13 एप्रिलपर्यंत टाळेबंदी वाढविली आहे. इटलीत नव्या रुग्णांच्या संख्येतील वाढ मंदावण्यास यश आल्याचे दिसून येत आहे. तर स्पेनमध्ये मात्र रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे.

ब्रिटन : आरोग्य कर्मचाऱयांचे आभार

ब्रिटनमध्ये गुरुवारी संध्याकाळी नागरिकांनी टाळय़ा वाजवून आरोग्य तसेच अन्य आवश्यक सेवा पुरविणाऱयांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन देखील स्वतःच्या घराच्या बाल्कनीत टाळय़ा वाजवताना दिसून आले आहेत. जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याचे 28 मार्च रोजी उघडकीस आले होते. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 33718 रुग्ण आढळले असून 2921 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 135 जण संसर्गातून मुक्त झाले आहेत.

जपानमध्ये विदेशींना बंदी

पुढील 14 दिवसांच्या कालावधीत 70 देशांमधून परतलेल्या लोकांना प्रवेश देणार नसल्याची घोषणा जपान सरकारने केली आहे. जपानने संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. अमेरिका, ब्रिटन आणि चीन या देशांमधून परतणाऱया लोकांवर ही बंदी असणार आहे. नवा नियम शुक्रवारपासून लागू करण्यात आला आहे. जपानमध्ये आतापर्यंत 2 हजार 617 रुग्ण सापडले असून 63 जणांचा मृत्यू झाला आहे.

टोरंटोत 25 लाखांचा दंड

कॅनडाच्या टोरंटो शहरात सार्वजनिक ठिकाणी दोन लोकांदरम्यान 6 फुटांचे अंतर न राखल्यास 3500 डॉलर्सचा (सुमारे 26 लाख रुपये) दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅनडातील लोक सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत नसल्याचे चित्र दिसून आल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. कॅनडात आतापर्यंत 11283 रुग्ण सापडले असून 138 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेपाठोपाठ कॅनडातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

अर्जेंटीनात संसर्ग फैलावतोय

अर्जेंटीनामध्ये मागील 24 तासांच्या कालावधीत 132 नवे रुग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्रालयानुसार देशातील एकूण रुग्णांची संख्या 1265 वर पोहोचली आहे. यातील 622 रुग्ण विदेशातून परतले आहेत. तर 398 जणांना रुग्णांच्या संपर्कामुळे लागण झाली आहे. तर 103 जणांचा चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. देशात आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. अर्जेंटीनाच्या सरकारने कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.

इराण संसद अध्यक्षांना लागण

इराणच्या संसदेचे अध्यक्ष अली लारीजानी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची पुष्टी झाल्यावर लारीजानी यांना क्वारेंटाईन करण्यात आले आहे. इराणमध्ये गुरुवारी 2875 नवे रुग्ण सापडले आहेत. याचबरोबर एकूण रुग्णांची संख्या 53183 झाली आहे. देशात मागील 24 तासांत 124 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या 3294 वर पोहोचली आहे.

जर्मनीने चीनला मागे टाकले

जर्मनीतील रुग्णांची संख्या आता चीनपेक्षा अधिक झाली आहे. शुक्रवारी हा आकडा 85063 वर पोहोचला आहे. तर चीनमधील हा आकडा 81620 झाला आहे. जर्मनीत आतापर्यंत 1111 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 हजार 440 जण संसर्गातून मुक्त झाले आहेत. जर्मनीतील बळींचा आकडा मात्र कमी आहे.

Related Stories

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 55,67,126 वर

pradnya p

26/11 च्या सूत्रधारावर वक्रदृष्टी

Patil_p

3 वर्षांपासून ‘जिवंत’ सिद्ध करण्याची लढाई

Patil_p

टॉप ग्लवचे 2400 कर्मचारी बाधित

Omkar B

‘कोरोना’काळातही अमेरिकेत श्रीमंतांच्या संपत्तीत वाढ

Patil_p

माद्रिद लॉकडाऊनच्या दिशेने

Patil_p
error: Content is protected !!