तरुण भारत

लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होणे महत्वाचे होते

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचे मत

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने उचललेली पावले व उपाय योजना बरोबर होत्या का ? असा सवाल केला असता श्री. कामत म्हणाले की, कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. अनेक देशातील नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चीन, इटली, स्पेन सारख्या देशांत मृतांची संख्या खुप मोठी आहे. बलाढय़ अमेरीकेला सुद्धा या विषाणूपासून वेगळे राहता आलेली नाही. परंतु, परमेश्वराच्या कृपेने भारतात व खास करून गोव्यात आज पर्यंत तशी परिस्थिनी निर्माण झालेली नाही व यापुढे होणार नाही आपल्याला विश्वास आहे. सरकारने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय योग्य होता व त्याला आम्ही सुरवातीपासूनच पाठिंबा दिला होता. परंतु, लॉकडाऊन नंतर वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी तसेच त्या क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्सेस व इतर तसेच पोलीस आणि इतर सरकारी कर्मचारी यांना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी लागणारी सामुग्री तसेच विलगीकरण केंद्र अशा गोष्टींची तयारी करण्यास सरकारने उशीर केला असे आपल्याला वाटते. आजही सामाजिक तपासणी करण्यासाठी सरकारकडे तेव्हढे कीट उपलब्ध नाहीत व लक्षणे दिसू लागल्यावरच जर रूग्ण इस्पितळात गेला तरच त्याला संशयित म्हणून बाजूला ठेवले जाते व नंतरच त्याची तपासणी केली जाते. आता हे चित्र बदलले पाहिजे. गावांगावातून लोकांची तपासणी सरकारने हाती घेणे गरजेचे आहे.

Advertisements

लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर सगळा बाजार, वाहतूक बंद झाली. लोकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा पहिले तीन-चार दिवस झाला नाही व सगळीकडे गोंधळाचे वातावरण तयार झाले याबद्दल आपले मत व्यक्त करताना विरोधीपक्ष नेते म्हणाले, लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. सदर बैठकीत आपल्यासह सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी वस्तुंचा पुरवठा चालू राहणे महत्वाचे असल्याचे ठामपणे मुख्यमंत्र्यांना सांगितले होते व त्यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता. परंतु, नंतर सरकारने सर्व व्यवहार बंद करण्याची घोषणा केली. त्यात सरकारातील काही मंत्र्यांनीच परस्पर विधाने केल्याने गोंधळात भर पडली व लोकांना पुढे काय होणार याची भीती पडली. त्यातच काही मंत्र्यांनीच जीवनावश्यक वस्तुंचा साठा करून ठेवल्याचे व्हिडियो समाजमाध्यमांवर आल्याने लोकांच्या संतापात भर पडली. या सगळय़ा गोंधळात अनेक लहान मुलांना दुधापासून सुद्धा वंचित रहावे लागले. ज्येष्ठ नागरिकांचे तर खुपच हाल झाले.

आता एकंदर परिस्थिती अशी आहे ? बाजारात आता जीवनावश्यक वस्तुचा पुरवठा सुरळीत झाला काय असे विचारता श्री. कामत म्हणाले, जीवनावश्यक वस्तुचा गोंधळ वाढल्यानंतर आपण माननीय राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी संपर्क साधून त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यांनी लगेच मुख्य सचिवांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले. कोरोना व्हायरस संबंधीचे सर्व निर्णय घेण्यासाठी सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारी समितीचे गठन केले. त्यानंतर परिस्थितीत सुधारणा दिसू लागली. आत्ता भाजीपाला व दूध पुरवठा सुरळीत झाला असून, बाजारात आत्ता फळे सुद्धा मिळू लागली आहेत. भुसारी दुकाने, सुपर मार्केट उघडे असून लोकांची खरेदीसाठी गर्दी ओसरली आहे. सुरवातीलाच भयानेच मिळेल ती वस्तू विकत घेण्यासाठी लोकांनी धाव घेतली. परंतु, आत्ता मुबलक साठा उलपब्ध असल्याचे लोकांनाही पटले आहे. कडधान्ये, तांदुळ, पीठ अशा वस्तूही आत्ता उपलब्ध होत आहेत. फलोत्पादन महामंडळाने आपले सर्व गाडे सुरू केल्याने लोकांना दिलासा मिळाला. त्यात गोवा बागायतदार तसेच खाजगी आस्थापनानी आपले सुपरमार्केट उघडल्याने लोकांची सोय झाली.

बाजारात दुकाने उघडी झाली असली तरी मडगावात आपण घरपोच सेवा देण्यावर भर दिला आहे. त्याबद्दल बोलताना म्हणाले, लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत चालू राहणे महत्वाचे होते. त्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सदर दुकाने उघडी ठेवण्याची आम्ही मागणी करत होतो. सरकारने सुरवातीला घरपोच सेवा देण्याची घोषणा केली परंतु तो प्रयोग असफल झाला. त्यानंतर आपली पत्नी आशा कामत यांनी कलाश्री महिला मंडळ या स्वयंसेवी गटातर्फे ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर लोकांना घरपोच सामान देण्याची व्यवस्था करण्याची कल्पना पुढे आणली व आमचे नगरसेवक व कार्यकर्ते यांनी ती उचलून धरली. सरकारतर्फे 20 स्वयंसेवक पास देण्यात आले होते. त्याचा योग्य उपयोग करून मी त्यांच्या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा दिला व लोकांना घरपोच सामान देण्यास सुरवात झाली. सदर सेवा सुरू होण्यापूर्वी आमच्या स्वयंसेवकांनी लोकांना दूध, अंडी, भाजीपाला व कडधान्ये स्वता विकत घेऊन दिली आहेत. दुकाने उघडी झाल्यावर आमच्या स्वयंसेवकांनी लोकांना व्यवस्थित उभे राहण्यासाठी चौकोन व वर्तुळ रंगविणे, लोकांना एकमेकांपासून योग्य अंतर ठेवणे याबद्दल मार्गदर्शन करणे अशी कामे कोणताही गाजावाजा न करता केली व त्याबद्दल आपण आपण, त्याचे आभार मानतो.

आपण जरी विरोधी पक्षनेता असलो तरी राजकारण बाजूला ठेऊन आपण सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचे स्पष्ट सांगितले होते. केरळमध्ये मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन लोकांना सहकार्याची विनंती केली होती. परंतु गोव्यात दुर्देवाने असे घडले नाही, याचे मला वाईट वाटते. सुरवातीच्या चार दिवसांत लोकांना भंयकर त्रास झाले व अनेकजण उपाशी पोटी राहिले. गोव्यातील अनेक भागातून मदतीसाठी फोन आले. परंतु वाहतूक बंद असल्याने मनात असूनही सर्वानांच मदत करणे शक्य झाले नाही. अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू वितरित करताना राजकारण करण्यात आले. त्यामुळे आमचे कार्यकर्ते संतप्त झाले. परंतु, त्यांना आपण शांत राहण्याचा सल्ला दिला व लोकांनाही थोडी कळ सोसण्याची विनंती केली. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा रोषही आपल्याला स्वीकारावा लागला. परंतु या कठीण प्रसंगी राजकारण करायचे नाही असे आपण ठामपणे ठरविले आहे असे श्री. कामत शेवटी म्हणाले.

Related Stories

म्हार्दोळ भीषण अपघात वृद्ध ठार : दोघे पुत्र गंभीर जखमी

Amit Kulkarni

वेर्णा येथे 26 रोजी ‘स्वरधारा’

Patil_p

लोकमान्य मल्टिपर्पजतर्फे 11 लाख मदत

Patil_p

नियमांचे पालन करून खनिज वाहतूक करावी

Omkar B

विनयभंग प्रकरणी कन्हैय्या नाईक निर्दोष

Amit Kulkarni

राज्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

Omkar B
error: Content is protected !!