तरुण भारत

प्रद्युम्नाचा जन्म

रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाबद्दल एकनाथ महाराज पुढे सांगतात-रुक्मिणीची इच्छा श्रीकृष्णाने पूर्ण केली त्याप्रमाणे आदराने जो हा ग्रंथ वाचेल त्याच्या इच्छा, मनोरथ श्रीकृष्ण पूर्ण करेल. या ग्रंथाचा वक्ता व श्रोता जनार्दनच आहे, असे म्हणून नाथांनी आपल्या कर्तृत्वाचे सारे श्रेय गुरु जनार्दनस्वामींच्या कृपेला दिले आहे. शके चौदाशे त्र्याणव, प्रजापति संवत्सर, राम नवमी दिवशी, वाराणसी नगरीत, गंगातीरी मणिकर्णिका घाटावर एकनाथांनी रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहून पूर्ण केला.

श्रीकृष्ण व रुक्मिणी यांचा संसार मोठय़ा आनंदात द्वारकेत चालू झाला. भागवताचार्य वै. डोंगरे महाराज म्हणतात-रुक्मिणी महालक्ष्मी आहे आणि कृष्ण नारायण. जीव जर लक्ष्मीचा बाळ होऊन तिला नमस्कार करील तर ती त्याला भगवंताच्या मांडीवर बसवील. जर लक्ष्मीला आईचे स्थान द्याल तर सुखी व्हाल. परंतु स्वामी होण्याचा प्रयत्न कराल तर पतनाच्या गर्तेत पडावे लागेल. लक्ष्मीचा स्वामी जीव नाही, ईश्वर आहे. लक्ष्मीला मातृस्वरूप मानण्यात कल्याण आहे. ही सृष्टी हीच लक्ष्मी आहे असे मानले तर आपले नाते या सृष्टीसी कसे असायला हवे? पण आपण तिच्यावर स्वामित्व गाजवायला गेलो तर त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागतीलच. लवकरच रुक्मिणीला पुत्ररत्न प्राप्त झाले. ते कोणते? एकनाथांची कृपा प्राप्त झालेले कृष्णदयार्णव आपल्या हरिवरदा या ग्रंथात म्हणतात-सर्वान्तरिं ज्याचा वास। जो परमात्मा आदिपुरुष। काम चित्तोद्भव तदंश। सृष्टिहेतुत्वे जो सृजिला। तोचि मन्मथ सुरवरकार्या। छळूं गेला कैलासराया। तेथ रुद्रक्षोभदृगग्नीं काया। कर्पूरन्यायें जळाली । तैं रतीच्या आर्तविलापीं । द्रवोनि कारुण्यें विश्वव्यापी । रति प्रबोधिली संक्षेपीं । गगनवाग्जल्पीं भविष्यार्थें।पूर्वी सृष्टीनिर्मितीच्या वेळी परमात्मा आदिपुरुष वासुदेव याने त्याच्या चित्ताचा अंश असा कामदेवाला सृष्टीच्या सृजनासाठी जन्माला घातले. पुढे देवतांचे कार्य करण्यासाठी हा कामदेव म्हणजेच मदन, तप करणाऱया महादेव शिवाला छळू लागला. तेव्हा शिवाने आपल्या क्रोधाग्निने त्याचे भस्म केले. त्यावेळी मदनाची पत्नी रति हिने मोठाच आर्त विलाप केला. तेव्हा तिची दया येऊन करुणामूर्ती शिवाने तिला आशीर्वाद दिला की भगवान वासुदेवाच्या कृष्ण अवतारात त्याचा पुत्र म्हणून कामदेव जन्म घेईल व तुला तुझा पती पुन्हा मिळेल. ऐसा वासुदेवांश विख्यात। तोचि कृष्ण वीर्यसमुद्भूत।रुक्मिणीजठरिं लावण्यभरित। मनसिज मूर्त जन्मला पैं ।असा मुळात कामदेवाने आता पुन्हा शरीर धारण करण्यासाठी वासुदेवांचाच आश्रय घेतला. तोच मदन यावेळी श्रीकृष्णांपासून रुक्मिणीच्या ठिकाणी उत्पन्न झाला.तो प्रद्युम्न नावाने प्रसिद्ध झाला.मदनावतार असल्याने तो अत्यंत सुंदर होताच,एवढेच नव्हे तर तो कोणत्याही बाबतीत पित्यापेक्षा कमी नव्हता.  तमांशरूपी रुद्रावतार। महामायावी शंबरासुर । जन्म पावला दैत्य घोर। मन्मथवैर स्मरोनी। रुद्रें मन्मथ निरपराध। भस्म केला होऊनि प्रुद्ध ।  रुद्रक्रोधचि तो प्रसिद्ध। शंबररूपें अवतरला ।

Advertisements

Ad.. देवदत्त परुळेकर

Related Stories

प्रतापें नांदे भौमासुर

Patil_p

पालिका आरक्षणाला न्यायालयाची चपराक…

Patil_p

पाकिस्तानचा नवा नकाशा

Patil_p

आपले वोझे घालू नये ! कोणीयेकासी !!

Patil_p

टाटा मोटर्सची खास सवलत योजना

Patil_p

कोरोना आणि अर्थव्यवस्था

Amit Kulkarni
error: Content is protected !!