तरुण भारत

जेव्हा यजुवेंद चहल क्रिकेटकडून पुन्हा बुद्धिबळाकडे वळतो!

फावला वेळ सत्कारणी लावण्यासाठी 64 घरांच्या पटाकडे मोर्चा, बुद्धिबळानेच संयम शिकवला असल्याचे प्रतिपादन

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisements

यजुवेंद्र चहल हा भारताचा अव्वल दर्जाचा फिरकीपटू. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या खात्यावर आतापर्यंत 52 वनडेत 91, 42 टी-20 सामन्यात 55 तर 31 प्रथमश्रेणी लढतीत 84 बळी आहेत. पण, चहल हा पूर्वाश्रमीचा क्रिकेटपटू अजिबात नव्हे. सर्वप्रथम त्याने बुद्धिबळाचे धडे गिरवले, बुद्धिबळातील स्पर्धा गाजवल्या, 12 वर्षाखालील गटात विजयी ठरला आणि त्यानंतर तो क्रिकेटकडे वळला. पण, गम्मत म्हणजे आता 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे क्रिकेट ठप्प झाल्यानंतर चहलने पुन्हा एकदा आपला मोर्चा 64 घरांच्या पटाकडे, अर्थात बुद्धिबळाकडे वळवला असून काही ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत त्याने सहभाग घेतला आहे.

माजी राष्ट्रीय 12 वर्षाखालील वयोगटातील बुद्धिबळ जेता असलेल्या चहलने विश्व युवा चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले असून तो फिडेच्या वेबसाईटवरही सूचिबद्ध आहे. त्याचे एलो रेटिंग 1956 इतके आहे. येथील ऑनलाईन स्पर्धेत खेळण्यापूर्वी ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता व आंतरराष्ट्रीय मास्टर राकेश कुलकर्णी यांच्याशी झालेल्या अनौपचारिक चर्चेत तो म्हणाला, ‘बुद्धिबळाने मला संयम शिकवला. क्रिकेटमध्ये आपली गोलंदाजी उत्तम होत असतानाही बळी मिळत नसतात. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये मोठय़ा स्पेलमध्ये सातत्याने मारा करत असताना अगदी दिवसच्या दिवस एकही बळी मिळत नाही, असेही घडू शकते. पण, अशा कसोटीच्या वेळी संयम अतिशय महत्त्वाचा ठरतो आणि ही संयमाची देणगी मला बुद्धिबळाकडून मिळाली. फलंदाजाला बाद करण्यासाठी मी प्रचंड संयम ठेवत माझी रणनीती काटेकोर राबवण्याचा प्रयत्न करतो’.

बुद्धिबळात उत्तम खेळत असतानाही क्रिकेटकडे का वळावेसे वाटले, या प्रश्नावर उत्तर देताना क्रिकेटमध्ये अधिक स्वारस्य असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे त्याने सांगितले.

‘मला बुद्धिबळ व क्रिकेट यांच्यापैकी एकच खेळ निवडणे भाग होते. मी माझ्या वडिलांशी बोललो. पण, अंतिम निर्णय तूच घ्यायचा आहेस, असे ते म्हणाले. माझे स्वारस्य क्रिकेटमध्ये जास्त होते. त्यामुळे, मी अंतिमतः क्रिकेटकडे वळलो’, असे चहल म्हणाला.

बुद्धिबळातील तीन फॉरमॅटपैकी एक असलेल्या ब्लित्झमध्ये प्रत्येक खेळाडूला प्रत्येक चालीनंतर इन्क्रीमेंटसह किंवा त्याशिवाय, 10 मिनिटे किंवा त्याच्यापेक्षा कमी अवधी मिळतो. चहलने भारताचा दुसरा सर्वात युवा ग्रँडमास्टर पीआर प्रज्ञानंदा, ग्रँडमास्टर्स बी. अधिबन, निहार सरिन व कार्तिकेयन मुरली आदींसह आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

शेन वॉर्नला आदर्श मानणाऱया चहलचा वेळ मिळाल्यानंतर जिथे शक्य असेल तेथे ऑनलाईन बुद्धिबळ सामने खेळण्यावर भर असतो.

इंग्लंडमधील 2009 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या फॅफ डय़ू प्लेसिसला बाद केले, तो चेंडू कारकिर्दीतील सर्वोत्तम असल्याचे तो मानतो.

‘बुद्धिबळात ज्याप्रमाणे रणनीती रचली जाते. त्याप्रमाणे, क्रिकेटमध्येही फलंदाजाला बाद करण्यासाठी गोलंदाज रणनीती आखत असतो. मी स्वतः यष्टीरक्षकाशी संवाद साधत त्याची मतेही आजमावतो आणि त्यादृष्टीने गोलंदाजीवर भर देतो’, असे तो येथे म्हणाला. कोव्हिड-19 विरुद्ध लढण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन त्याने केले. घरी थांबून हिरो होण्याची ही सुवर्णसंधी आहे. या वेळेत आपण वाचन करु शकतो, डान्स करु शकतो, स्वयंपाकघरात नवे पदार्थ करुन पाहू शकतो आणि नव्या काही कला आत्मसात करु शकतो’, असे त्याने शेवटी नमूद केले.

Related Stories

जपानमधील फुटबॉल, बेसबॉलला प्रेक्षकांना परवानगी देणार

Patil_p

नदाल माद्रिद ओपन स्पर्धेत खेळणार

Patil_p

ब्रिटनची रॅडुकानू बनली नवी टेनिस युवराज्ञी

Patil_p

बांगलादेशचा 430 धावांचा डोंगर, मिराजचे शतक

Amit Kulkarni

आयपीएल संघाच्या नेतृत्वासाठी डीव्हिलियर्सची धोनीला पसंती

Patil_p

न्यूझीलंडचा इंग्लंडवर मालिका विजय

Patil_p
error: Content is protected !!