तरुण भारत

जपानच्या 7 प्रातांमध्ये आणीबाणी

जगातील एकूण रुग्णसंख्या 1358958 वर : बळींचा आकडा 75897 : युरोपमध्ये संकट कायम

जगरात कोरोना विषाणूचा संसर्ग 1358958 जणांना झाला आहे. तर या महामारीमुळे 75 हजार 897 लोकांना जीव गमवावा लागला आहे. इटली (16523) आणि स्पेन (13798) नंतर अमेरिकेतही मृतांचा आकडा 10 हजारांपेक्षा अधिक झाला आहे. तर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी टोकियो, ओसाका आणि अन्य पाच प्रांतांमध्ये 6 मेपर्यंत आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. टोकियो, चिबा, कानागावा आणि सायतामासह, ओसाका, ह्योगो आणि फुकुओकामध्ये लोकांना अनावश्यक घराबाहेर पडणे टाळण्यास सांगण्यात आले ओह. जपानमध्ये आतापर्यंत 3906 रुग्ण सापडले असून 92 जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

पाकिस्तानात तबलिगमुळे चिंता

पाकिस्तानने इस्लामिक मिशनरी आंदोलन, तबलिगी जमातकडून आयोजित कार्यक्रमात सामील झालेल्या 20 हजार जणांना लाहोरमध्ये विलग केले आहे. तबलिगी जमातचे सदस्य देशात संसर्ग फैलावू शकतात, अशी चिंता अधिकाऱयांना सतावू लागली आहे. पाकिस्तानातील रुग्णांची संख्या आता 4004 झाली आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान अतिदक्षता विभागात

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सध्या अतिदक्षता विभागात असले तरीही त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले नाही.  प्रकृती बिघडल्याने जॉन्सन यांना आयसीयूत हलविण्यात आल्याची माहिती कॅबिनेट मंत्री मायकल गोवे यांनी दिली आहे. जॉन्सन यांच्या अनुपस्थितीत विदेशमंत्री डोमिनिक रॉब कार्यभार सांभाळत आहेत. भारतीय वंशाचे सर्जन जितेंद्र कुमार राठोड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत 10 हजारांपेक्षा अधिक बळी

अमेरिकेत 24 तासांत 30 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळले असून 1150 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये 29 एप्रिलपर्यंत शटडाउन वाढविण्यात आले आहे. न्यूयॉर्क प्रांतात 5 हजार बळी गेले असून यातील निम्म्याहून अधिक जणांचा मृत्यू न्यूयॉर्क शहरात झाला आहे. तर प्रांतात 1 लाख 20 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीलंकेत रुग्ण वाढले

श्रीलंकेत आतापर्यंत कोरोनाचे 150 रुग्ण सापडले असून तेथे महामारीच्या विरोधात उचलण्यात आलेली पावले सिनहाला तसेच तमिळ नववर्षानंतरही कायम राहण्याची शक्यता आहे. देशात 14 एप्रिलपर्यंत टाळेबंदी लागू राहु शकते. यापूर्वी 17 मार्च ते 24 मार्चपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली होती.

नेपाळने टाळेबंदी वाढविली

नेपाळ सरकारने टाळेबंदीचा कालावधी 8 दिवसांनी वाढविला आहे. तेथे आता 15 एप्रिलपर्यंत टाळेबंदी राहणार आहे. देशात 9 रुग्ण सापडले असून यातील एक रुग्ण संसर्गातून मुक्त झाला आहे. नेपाळमध्ये विषाणूने दुसऱया टप्प्यात प्रवेश केला आहे. सरकारने 24 मार्च रोजी प्रारंभी 7 दिवसांच्या टाळेबंदीची घोषणा केली होती. 29 रोजी याची मुदत 7 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली होती.

न्यूझीलंडमध्ये खबरदारी

न्यूझीलंडचे आरोग्यमंत्री डेव्हिड क्लार्क यांनी टाळेबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्वतःला मूर्ख संबेधिले आहे. 20 किलोमीटर अंतरावरील सागरकिनारी कुटुंबीयांसोबत गेल्याचे मान्य करत क्लार्क यांनी पंतप्रधान आर्डर्न यांच्यासमोर राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु संकट पाहता त्यांना पदावर कायम राहण्यास सांगण्यात आले आहे.

इटलीत दिवसात 636 बळी

इटलीत सोमवारी 636 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3599 नव्या रुग्णांची भर पडली आहे. याचबरोबर देशात एकूण बळींचा आकडा 16523 वर पोहोचला आहे. तर एकूण रुग्णसंख्या आता 132547 झाली आहे. मागील काही दिवसांत इटलीतील नव्या रुग्णांच्या संख्येत होणारी भर काही प्रमाणात कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी झाला आहे.

फ्रान्समध्ये संकट वाढले

फ्रान्समध्ये सोमवारी 833 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशात आतापर्यंत 8911 जणांचा बळी गेला आहे. तर 98010 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अद्याप आम्ही या महामारीच्या अंतापर्यंत पोहोचलेलो नाही असे उद्गार फ्रान्सचे आरोग्यमंत्री ओलिविर विरैन यांनी काढले आहेत.

रशियात 7497 रुग्ण

रशियात मंगळवारी 1154 रुग्ण आढळले आल्याने एकूण संख्या 7497 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 11 जण मृत्युमुखी पडले आहेत. राजधानी मॉस्को कोरोनाचे केंद्रबिंदू ठरले असून देशात आंशिक टाळेबंदी लागू आहे. लोकांना केवळ आवश्यक सामग्री तसेच उपचारासाठी घरातून बाहेर पडण्याची अनुमती आहे.

सिंगापूरमध्ये 4 मेपर्यंत टाळेबंदी

सिंगापूरमध्ये 1375 रुग्ण सापडले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी तेथील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. तेथे 4 मेपर्यंत टाळेबंदी असून आवश्यक सुविधा वगळता सर्वांना घरातून काम करण्यास सांगण्यात आले आहे. बँका सुरू असल्या तरीही मागील काही दिवसांमध्ये भेट देणाऱया ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. रेस्टॉरंट सुरू असले तरीही तेथे बसून खाण्याची अनुमती नाही.

स्पेन : स्थिती सुधारण्याची चिन्हे

स्पेनमध्ये सोमवारी कोरोनामुळे 637 जणांचा मृत्यू झाला आहे. सलग चौथ्या दिवशी बळींच्या आकडय़ात घट दिसून आली आहे. मागील 2 आठवडय़ांमध्ये ही सर्वात कमी संख्या आहे. देशात 26 एप्रिलपर्यंत टाळेबंदी असून आतापर्यंत 13798 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 140510 रुग्ण सापडले आहेत.

इराण : 2600 कैदी मायदेशी

कोरोना संकटामुळे काही देशांसोबत कैद्यांची अदलाबदली केली जाणार असल्याचे इराणचे कायदा राज्यमंत्री महमूद अब्बासी यांनी सांगितले आहे. सध्या 2600 कैदी मायदेशी परतण्यास तयार आहेत.

Related Stories

शाळेतील अनोखे ग्रॉसरी स्टोअर

Patil_p

बनावट वैमानिकांमुळे पाकिस्तानवर ओढवली नामुष्की

Patil_p

सापाचे सूप बेतले जीवावर

Amit Kulkarni

ॲस्ट्राझेनेकाच्या लसीकरणाला वयोमर्यादेचे बंधन

datta jadhav

इंडोनेशियात रात्री चमकणारे गूढ सरोवर

Patil_p

काबुलमध्ये राष्ट्रपती भवनाजवळ रॉकेट हल्ले

datta jadhav
error: Content is protected !!