तरुण भारत

कोरोना विरोधातील युद्ध जिंकण्यास सहकार्य करा

वार्ताहर/   चिकोडी

कोरोना विषाणूपासून सार्वजनिकांची सुरक्षा व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी व मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी अनेक नियमावली तयार केली आहे. टप्याटप्यात कोरोनासंदर्भात माहिती घेण्यात येत असून त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सरकार योग्य तो पाठपुरावा करत आहे. कोरोनाविरोधातील युद्ध जिंकण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी केले.

Advertisements

चिकोडी येथील लोकोपयोगी खात्याच्या सभाभवनात चिकोडी उपविभागातील अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शेट्टर पुढे म्हणाले, कोरोना व्हायरसचा प्रसार सर्वत्र होत असताना बेळगाव जिल्हय़ात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. पण दिल्ली येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमातून जे समाजबांधव बेळगाव जिल्हय़ातील विविध ठिकाणी दाखल झाले. तेव्हापासून बेळगाव तालुक्यात पहिल्यांदा तीन पॉझिटिव्ह तर नंतर रायबाग तालुक्यातील कुडची येथे चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे बेळगाव जिल्हय़ातील संख्या 7 इतकी झाली आहे.

कोरोनाची लागण सर्व धर्मातील नागरिकांना आहे. पण दिल्लीतील प्रकरणामुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त वाढला आहे. बेळगाव येथील कोरोनाबाधितांची सरकार व जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. सध्या दिल्लीहून आलेल्या संशयितांची नावे पोलिसांकडून मिळाली आहेत. पण त्यांनी स्वत:बरोबर कुटुंब व समाजाला वाचविण्यासाठी स्वत:हून तपासणी करून घ्यावी तसेच क्वारंटाईन होऊन कोरोना विरोधातील लढय़ाला पाठबळ दिले पाहिजे.

माहिती न दिल्यास कारवाई

आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका माहिती घेण्यासाठी गेल्या असता त्यांना सहकार्य मिळत नसल्याची घटना कुडची येथे घडली आहे. जर अधिकारी अथवा कर्मचाऱयांना योग्य ती माहिती न दिल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा सुरक्षेसाठी बंद केली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार विविध राज्यातील नागरिकांना त्या-त्या राज्यात आश्रय देण्यात आला आहे. या अगोदर कागवाड व गोवा सीमेवर परराज्यातून आलेले पुन्हा आपल्या राज्यात जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या घटना घडल्या आहेत. पण त्या सर्वांची सोय केली आहे. यामुळे गेल्या 4-5 दिवसांपासून अशा घटना घडल्या नाहीत.

..तर लॉकडाऊन वाढवावा लागेल

कोरोना विरोधात लढण्याची 14 एप्रिलपर्यंत सर्वांची परीक्षा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव 100 टक्के नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊन वाढवावा लागेल. त्यासंदर्भात पंतप्रधान व मुख्यमंत्री निर्णय घेतील. लॉकडाऊनच्या काळात सर्व सरकारी कर्मचारी काम करत आहेत. त्यांना सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. सरकार 50 हजार लिटर दूध मोफत देत आहे. भाजीपाला, किराणाची योग्य ती सोय केली आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी सर्व खासगी डॉक्टरांनी सकाळी व सायंकाळी दवाखाने उघडून रुग्णांवर उपचार करावेत. नागरिकांनी शिस्त, संयम पाळून देशासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी सरकारच्या नियमांचे पालन करावे. तसेच सोशल डिस्टन्सिंगला महत्त्व द्यावे, असे त्यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित

लोकोपयोगी खात्याच्या सभागृहात आयोजित बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष करून सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधींना सोशल डिस्टन्स ठेवूनच बैठक घेण्यात आली. यावेळी मास्क वितरणावरुन अधिकाऱयांना धारेवर धरल्याचे समजते. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, मंत्री शशिकला जोल्ले, मंत्री श्रीमंत पाटील, आमदार गणेश हुक्केरी, आमदार महांतेश कवटगीमठ, खासदार आण्णासाहेब जोल्ले, राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे, आमदार दुर्योधन ऐहोळे, आमदार पी. राजीव, आमदार महेश कुमठहळ्ळी, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र के. व्ही., प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णवर, तहसीलदार सुभाष संपगावी यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

बसस्थानकातील व्यापारी गाळय़ांची उभारणी युद्धपातळीवर

Amit Kulkarni

स्मार्ट सिटीचे अर्धवट काम चव्हाटय़ावर

Amit Kulkarni

‘त्या’ वृद्धाच्या मृत्युला कारणीभूत आठ जणांविरुद्ध एफआयआर

Amit Kulkarni

शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट

Amit Kulkarni

कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

Patil_p

रेशन वितरणात बेळगाव जिल्हा प्रथम

Amit Kulkarni
error: Content is protected !!