तरुण भारत

भक्तीच्या विठ्ठलपुरी, वसली कारापूर नगरी

नवी संस्कृतीचे भरणपोण करण्यात नवाश्मयुगापासून नदीचे योगदान महत्त्वाचे ठरलेले आहे. त्यामुळे नद्यांच्या किनारी भारतीय लोकमानसाला पवित्र घाटाची संकल्पना स्फुरली आणि स्थापन केलेल्या देवदेवतांच्या साह्याने त्यांनी व्रतवैकल्ये आणि सण -उत्सवांद्वारे आपल्या सांस्कृतिक मूल्यांची अभिवृद्धी करून आपले जगणे अधिकाधिक भक्तिरसाने सुंदर करण्याचा प्रयत्न केला आहे. चोर्ला घाटात उगम पावणाऱया थोरली न्हंयच्या उजव्या काठावरती डिचोली तालुक्यातल्या कारापूर गावात विठ्ठल संस्थानाची उभारणी झाली. गोव्यातल्या पेडणे ते काणकोणपर्यंत जेथे जेथे व्यापार, उद्योगाद्वारे एखाद्या गावाला भरभराटी लाभले तेथे विठ्ठलाच्या मंदिराची उभारणी कऱणे भाविकांनी उचित मानले. कारापूरच्या एका टोकाला जेथे थोरली न्हंय येते त्या ठिकाणी असलेल्या मारुतीगडावरती संरक्षणदृष्टय़ा महत्त्वाच्या जागी विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्या मंदिराची उभारणी करण्याची प्रेरणा क्षात्रधर्मियांना होणे ही अविस्मरणीय अशीच बाब आहे. एकेकारी कारापुरात काजऱयांच्या वृक्षांची गर्दी होती. विषारी फळांनी युक्त असलेल्या या वृक्षाला लोकधर्मातल्या परंपरांनुसार सहजासहजी तोडण्यास धजत नसे. विषवृक्षांनी नटलेल्या या ग्रामदेवी शांतादुर्गेच्या गावाला भक्तिच्या अमृततुल्य अशा स्पर्शाने श्रीविठ्ठलाने पावन केले आहे.

‘क्षात्रतेजाचे प्रताप’ या पुस्तकात वामन पालयेकरा यांनी या मंदिरासंदर्भात श्रीपांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना शके 1410त आदिशाहीतील पडक्या मशिदीवर उभारलेल्या देवालयात केल्याचे नमूद केले आहे. मशिदीचे बांधकाम होण्यापूर्वी इथे भगवती आणि मारुती यांची मंदिरे असल्याची लोकमानसाची श्रद्धा आहे. मारुती, भगवती यांच्या मंदिराबरोबर आज या परिसरात सिद्धेश्वर, ब्रह्मा, गरुड, काळभैरव आणि पुंडलिक यांची मंदिरे उभारलेली आहेत. पर्येची साठा सत्तरीची भूमका, गावठणची सातेरी आणि कारापूरच्या शांतादुर्गा यांच्या परिसरात वसलेल्या मारुतीगडावरती श्रीविठ्ठलाचे झालेले आगमन क्रांतिकारक ठरले आणि त्यामुळे वाळवंटी नदीच्या किनाऱयावरती मारुतीगडावरच्या या संस्थानच्या लौकिकामुळेही तीर्थक्षेत्र  विठ्ठलापूर म्हणून नावारुपास आले. महाराष्ट्रात श्रीक्षेत्र पंढरपूरला भाविकांनी भूवैकुंठाचे स्थान दिलेले आणि त्यामुळे तिथे संपन्न होणाऱया आषाढी आणि कार्तिकी यात्रेला गोव्यातील वारकरी पाचशे वर्षांपासून जात असल्याचे पुरावे आढळतात. त्यामुळे राणे कुटुंबातल्या वारकऱयांच्या निस्सीम भक्तीसाठी पंढरपुराचा त्याग करून श्रीविठ्ठलाने कारापुरात येण्याचे निश्चित केले आणि त्यानुसार भाविकाच्या झोळीतन श्रीविठ्ठलाची मूर्ती आल्याचे मानले जाते. दुसऱया लोककथेनुसार प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाने विठू शिल्पकाराचे  रूप धारण करून कर कटावरी व समचरणा स्थितीतील श्रीविठ्ठलाची मूर्ती घडवली असल्याचे मानले जाते. पंढरपुरातून भाविकांनी ही मूर्ती रामघाट-दोडामार्ग मार्गे पडोशेत (पर्ये) आणल्याचे मानले जाते. तर सत्तरी आणि कर्नाटकातल्या कृष्णापूर तसेच पंचक्रोशीत प्रचलित असलेल्य लोकपरंपरांनुसार ही मूर्ती प्रथम कृष्णापूर व नंतर करंझोळ आणि तेथून मोर्लेगडाच्या पायथ्याशी वसलेल्या घोडेमळातल्या वायंगणी ओहोळाच्या तीरावरती आली. मोर्लेहून श्रीविठ्ठलमूर्ती पडोशेतल्या अरण्यात आणि कालांतराने 1488 साली श्रीविठ्ठलमूर्तीसह सत्यभामा आणि रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना मारुतीगडावरती करण्यात आली.

Advertisements

पंढरपुरात श्रीविठ्ठलची मूर्ती स्थापन करण्यात आली असून, कारापूर – विठ्ठलापुरातल्या मंदिरात श्रीविठ्ठलाच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला रुक्मिणी तर उजव्या बाजूला सत्यभामेची मूर्ती स्थापन केलेली आहे. या मूर्तीच्या वरती विजयनगर साम्राजातल्या मंदिरातल्या मूर्तीकलेचा प्रभाव प्रकर्षाने दृष्टीस पडत असल्याने खानापूर तालुकातल्या सोसोगडाच्या पायथ्याशी वसलेल्या वरकडसारख्या गावातल्या रणमालेसारख्या लोकनाटय़ात श्रीविठ्ठल आणि वारकरी संप्रदायाचा प्रभाव आढळतो आणि त्यामुळे विजयनगर साम्राज्यातल्या हंपी येथील कानडा विठ्ठलाची भक्तिपरंपरा जशी पंढरपुरात गेली त्याचप्रमाणे गोव्यातल्या कारापूरच्या विठ्ठलापुरात आली असण्याची शक्यता आहे. एकेकाळी शैव आणि वैष्णवात आराध्यदैवतांच्या संदर्भात असलेल्या संघर्षाच्या समन्वयाचे प्रतीक म्हणून श्रीविठ्ठलाच्या उपासनेचे प्रस्थ विस्तारत गेले. त्यामुळे कारापुरातल्या या विठ्ठल मंदिरात चैत्र शुक्ल दशमीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत चैत्रोत्सवाची परंपरा साजरी केली जाते. चैत्र शुक्ल दशमीपासून पारंपरिक दशावतारी नाटक सादर केले जाते. चैत्र पौर्णिमेला दशावतारी नाटकात दक्ष यज्ञाचे आख्यानाच्या समारोपावेळी शिवगणातल्या वीरभद्राचे युद्धनृत्याच्या सादरीकरणाच्या आवेशात आगमन होते. वैष्णवी परंपरेतल्या श्रीकृष्णाचे रुपांतर लोकमानसाने श्रीविठ्ठलात करून, त्याच्या चैत्रोत्सवात शिवपरिवारातील वीरभद्राचे युद्धनृत्य वाळवंटी नदीतीरावरच्या चैत्रपौर्णिमेतल्या वसंत ऋतूतल्या रात्रीला आगळीवेगळी उभारी मिळवून देते. दक्षिण भारतातल्या कानडी भाषा, संस्कृतीच्या पैलूंचे दर्शन घडविणारा वीरभद्र वाळवंटी तीरावरती निर्माण झालेल्या भक्तिरसाला शौर्याची लखलखती किनार असल्याची प्रचिती देतो.

पर्ये गावातला छोटासा वाडा आज साखळी नगरीच्या लौकिकास पात्र ठरला. व्यापार उद्योगामुळे चोर्ला घाटाशी संलग्न असलेल्या जलमार्गामुळे साखळीस सत्तरी तालुक्याचे मुख्यालय आले. नदीतून चालणाऱया व्यापार आणि उद्योगावरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी इथे किल्ला बांधला गेला. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या प्रांतातून येणाऱया व्यापारी, यात्रेकरू यांच्यामुळे सांखळीत कस्टम हाऊस उभे राहिले. कोकणातून पांगम, कर्पे, गोपकपट्टणहून गोवेकर, सावईवेरेतून वेरेकर, दक्षिण भारतीय संस्कृतीशी नाते सांगणारे हिंदे, तुसवाडीतल्या दिवाडी बेटावरचे नार्वेकर, विठ्ठलभक्ती परंपरेशी निगडित पिंगे, कामत, दुभाषी, बाक्रे आदी मंडळी, क्षात्रतेजाचा वारसा मिरवमारे म्हावळिंगकर, आणि गावठणकर देसाई तसेच हणजुणकर, दातये, काणेकर, बुडकुले, सडेकर, लवंदे, साखरदांडे, बोरकर, पावसकर, भजे, पडवळ,  चिमुलकर, डांगी, हळदणकर, माशेलकर, पै कुचेलकर, पोकळे, संजगिरी, शेटये, गायतोंडे, शिरोडकर, मुजावर, शेख, आगा, खान, फर्नांडिस, डिसोझा, डिसिल्वा आदा मंडळी विविध प्रांतातून सांखळीत स्थायिक झाली. या साऱया मंडळींच्या वास्तव्यामुळे एकेकाळी वाळवंटी नदीमुळे सांखळीला लाभलेल्या नगराच्या दर्जाची कल्पना येते.

राजेंद्र पां. केरकर

Related Stories

साबण आणि आपण

tarunbharat

महत्त्व कलेचे

Patil_p

या वर्षातील पहिले ग्रहण

Patil_p

मनमोहक नृत्याविष्कार सोहळा

Patil_p

व्यावहारिक चातुर्य

Patil_p

कैलास मानससरोवर यात्रेची अनुभूती

Patil_p
error: Content is protected !!