तरुण भारत

भारतात कसोटी मालिका जिंकणे आवडेल

ऑस्ट्रेलियाचा अव्वल फलंदाज स्टीव्ह स्मिथचे प्रतिपादन, यंदाच्या आयपीएल स्पर्धेचे वेध

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

भारतात कसोटी क्रिकेट खेळणे नेहमीच कठीण आणि आव्हानात्मक असते. त्यामुळे, तेथे कसोटी मालिका जिंकणे मला निश्चितच आवडेल, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचा अव्वल फलंदाज स्टीव्ह स्मिथने केले. आयपीएलमधील पहिल्या आवृत्तीतील चॅम्पियन्स राजस्थान रॉयल्सने आयोजित केलेल्या पॉडकास्टमध्ये न्यूझीलंडचा लेगस्पिनर ईश सोधीशी तो यावेळी बोलत होता.

‘ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू या नात्याने आम्ही ऍशेस कशी महत्त्वाची आहे, विश्वचषक स्पर्धा कशी महत्त्वाची असते, यावर सातत्याने बोलत असतो. पण, भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये जागतिक स्तरावर अव्वलमानांकित आहे आणि त्यांच्या देशात कसोटी क्रिकेट खेळणे नेहमीच अवघड असते. तेथे मला निश्चितच मालिका जिंकायला आवडेल’, असे स्मिथ पुढे म्हणाला.

आपली अन्य मुख्य उद्दिष्टय़े काय आहेत, या प्रश्नावर त्याने आपण फारसे लक्ष्य न ठरवता एकावेळी एका मालिकेचा किंवा एकावेळी एका सामन्याचा विचार करतो, असे उत्तर दिले. विश्वचषक स्पर्धा व ऍशेस संपन्न झाल्यानंतर आम्हाला प्रदीर्घ काळ विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे, मी स्वतः पुन्हा मैदानावर उतरण्यासाठी उत्सुक आहे, असे त्याने नमूद केले.

भारताचा फिरकी अष्टपैलू रविंद्र जडेजाचे विशेष कौतुक करत त्याला सामोरे जाणे आव्हानात्मक असते, असे सांगितले. ‘आशियाई उपखंडात जडेजा अधिक बहरतो. त्याची नियंत्रित टप्प्यावर सातत्याने मारा करण्याची हातोटी परिणामकारक ठरते. त्याच्यासारखा लेगस्पिनर सातत्याने नियंत्रित टप्प्यावर उत्तम मारा करत मध्येच गुगली किंवा स्लायडर टाकतो, त्यावेळी फलंदाज गोंधळून जाणे साहजिक ठरते. जडेजा हा अशा गोलंदाजांपैकी एक आहे. त्याला खेळणे अतिशय कठीण असते’, असे स्मिथ एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला.

स्टीव्ह स्मिथने मागील आयपीएल हंगामाच्या मध्यातच अजिंक्य रहाणेकडून नेतृत्वाची धुरा स्वीकारली होती आणि यंदा आयपीएल स्पर्धा होऊ शकली तर राजस्थान रॉयल्सचे प्रारंभापासूनच नेतृत्व करण्यासाठी तो उत्सुक आहे. जगभरात खूप काही सुरु आहे. पण, एखाद्या वळणावर आयपीएल स्पर्धा होऊ शकेल, अशी मला आशा वाटते, असे स्मिथ म्हणाला. ऑस्ट्रेलियाच्या या मातब्बर फलंदाजाने 125 वनडेत 4162 व 73 कसोटीत 7227 धावा जमवल्या आहेत.

स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज म्हणून स्मिथचे पदार्पण!

सध्याच्या घडीला स्टीव्ह स्मिथ धडाकेबाज फलंदाज म्हणून नावारुपाला आला आहे. पण, प्रारंभी स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज म्हणून आपल्याला ऑस्ट्रेलियन संघाला संधी मिळाली होती, असा आश्चर्यजनक खुलासा त्याने स्वतः येथे केला. ‘शेन वॉर्न निवृत्त झाल्यानंतर आमचे संघव्यवस्थापन उत्तम फिरकी गोलंदाजांच्या शोधात होते. यासाठी त्यांनी 10-12 फिरकीपटू निवडले व त्यातून अंतिमतः माझी निवड झाली. पहिल्या दोन कसोटीत मी फिरकीपटू या नात्याने संघातून खेळलो. पण, त्यानंतर संघातून गच्छंती झाली. त्यानंतर मात्र संघात आलो ते फलंदाज म्हणून’, असे स्मिथ येथे स्मित हास्यासह म्हणाला.

Related Stories

इंग्लिश फुटबॉल स्पर्धा जूनमध्ये सुरू करण्याचे संकेत

Patil_p

भारताचा अमित पांघल बनला जागतिक अग्रमानांकित बॉक्सर

Patil_p

बेळगावच्या रोनित मोरे, रोहन कदम यांची कर्नाटक टी-20 संघात निवड

Patil_p

इंग्लंड-न्यूझीलंड दुसऱया कसोटीसाठी लहान मुलांना परवानगी नाही

Amit Kulkarni

गोव्यात फुटबॉल संघांच्या आगमनाला प्रारंभ

Omkar B

माजी ऑलिंपिक धावपटू बॉबी मॉरो कालवश

Patil_p
error: Content is protected !!