तरुण भारत

इराणहून आलेल्या कोल्हापूरच्या महिलेचा जोधपूरमध्ये मृत्यू

प्रतिनिधी / कोल्हापूर

इराणहून मायदेशी परतल्यानंतर जोधपूर (राजस्थान) मधील एमडीएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोल्हापूरच्या महिलेचा गुरूवारी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यु झाला. शमसुन्निसा मोमीन (वय 59, रा. मयुरा अपार्टमेंट लिशा हॉटेल शेजारी, कदमवाडी रोड, कोल्हापूर) या  महिलेचे नाव आहे. त्यांच्या पतीवरही जोधपूरमधील एम्स हॉस्पिटमध्ये उपचार सुरू आहेत. तेच प्रारंभी कोरोना पॉझिटिव्ह होते. पण आता त्यांच्या कोरोनाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असताना त्यांच्या पत्नी शमसुन्निसा मोमीन यांचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisements

मोमीन कुटुंबीय हे मूळचे मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम परिसरात राहणारे. सध्या त्यांचे वास्तव्य कदमवाडी रोडवरील लिशा हॉटेल समोरील मयुरा अपार्टमेंटमध्ये आहे. त्यांचे पती आणि शमसुन्निसा मोमीन यांना शफीक आणि इरफान दोन मुलगे आहेत. इरफान यांचे मेडिकलचे शॉप आहे तर शफीक पुण्यात नोकरीला आहेत. मुंबईतील साद टुरिस्ट कंपनीने इराकच्या सहलीचे आयोजन केले होते. या सहलीत त्यांचे पती आणि शमसुन्निसा मोमीन हे देखील सहभागी झाले होते. मोमीन दाम्पत्याबरोबर या सहलीत कोल्हापुरातील 21 पर्यटकांचाही सहभाग होता. नियोजनाप्रमाणे सहल निघाली. फेबुवारी महिन्यात सर्व पर्यटक इराणमध्ये गेले असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इराकमध्ये जाणारी विमानसेवा बंद करण्यात आली. त्यामुळे मोमीन दाम्पत्यासह इतर सर्व पर्यटक इराणमध्येच अडकले. त्यानंतर  हे सर्व पर्यटक इराणमधून 14 मार्चला दिल्लीत आले. परदेशातून आल्याने त्यांना जैसलमेरमध्ये लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले.

28 मार्चला त्यांच्या क्वॉइंटाईनचा कालावधी संपणार होता. क्वॉरंटाईनच्या काळात मृत शमसुन्निसा यांच्या पतींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जोधपूरच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी शमसुन्निसा यांची चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र आपला पती कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समजताच शमसुन्निसा यांना मानसिक धक्का बसला. त्यातच त्यांना पक्षाघाताचा झटका (पॅरालेसिस) आला. त्यांना जोधपूरच्या एमडीएम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.   शमसुन्निसा यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मोमीन यांच्या मुलांना देण्यात आली. मोमीन कुटुंबीयांचे स्नेही असणाऱया नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत जोधपूरला जाण्यासाठी पास काढून दिला. त्यानुसार मोमीन यांचा मुलगा इरफान हे जोधपूरला निघाले पण त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना वापी येथून परतावे लागले. दरम्यान, 6 एप्रिलला शमसुन्निसा यांची प्रकृती सुधारत असून त्यांना आयसीयुतून बाहेर काढण्यात आल्याची माहिती मोमीन कुटुंबीयांना मिळाली. दरम्यान, उपाचार सुरू असताना 9 एप्रिल रोजी शमसुन्निसा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कोल्हापुरातील त्यांच्या नातेवाईकांत हळहळ व्यक्त होत आहे.

पार्थिव कोल्हापुरात आणण्याचे प्रयत्न

दरम्यान, शमसुन्निसा यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजस्थान सरकार आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधला आहे. पत्रव्यवहारही सुरू केला आहे.  नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनीही गेहलोत यांचे स्वीय सहाय्यक शशिकांत शर्मा आणि राजस्थान सरकारमधील महसूल मंत्री हरिष चौधरी यांच्याशी संपर्क साधून प्रयत्न सुरू केले आहेत. शुक्रवारी दुपारी शमसुन्निसा यांचा स्वॉब घेण्यात आला आहे. या स्वॉबचा अहवाल शनिवारी प्राप्त होण्याची शक्यता आहे. अहवाल काय येतो? यावर पुढील गोष्टी ठरणार आहेत. स्वॉब निगेटिव्ह आला तर लष्कराच्या वतीने पार्थिव कोल्हापुरात पाठविण्यात येणार आहे. स्वॉब पॉझिटिव्ह आला तर पार्थिव कोल्हापुरात आणण्यात अडचण येऊ शकते, अशी माहिती नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी दिली. दरम्यान, आमदार चंद्रकांत जाधव यांनीही मोमीन कुटुंबीयांना मानसिक आधार दिला आहे. आमदार जाधव यांचा पूर्वी पाटाकडील तालीम परिसरात राहणाऱया मोमीन कुटुंबीयांशी स्नेह आहे.

पतीच्या प्रकृतीत सुधारणा

शमसुन्निसा यांचे पती हे कोरोना पॉझिटिव्ह होते. पण त्यांच्या दोन चाचण्या निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांची प्रकृती सुधारली आहे. शुक्रवारी ते मुलगा इरफान आणि नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांच्याशी फोनवरून बोलले.

शब-ए-बारात दिवशी मरण

धार्मिक वृत्ती असणाऱया शमसुन्निसा आपल्या पतीसह सुफी पंथाची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी इराकला जाण्यासाठी परदेशात गेल्या होत्या. मायदेशी परतल्यानंतर पतीच्या प्रकृतीची चिंता आणि कोल्हापूरला परतण्यची ओढ असणाऱया शमसुन्निसा यांना गुरूवारी मुस्लिम धर्मियांसाठी महत्वाच्या असणऱया शब-ए-बारात या पुण्य दिवशी मरण आले.

Related Stories

दहिवडीचे मुख्य न्यायाधीश अमितसिंह मोहने

Patil_p

जिल्हय़ात बेकायदा दारूचा महापूर सुरुच

Patil_p

कोल्हापूर : किणी येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांना मारहाण,अद्याप कारवाई नाहीच

Abhijeet Shinde

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण तरच सातवा वेतन आयोग

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गांधीनगर बनतंय गुटखा विक्रीचे केंद्र

Abhijeet Shinde
error: Content is protected !!