तरुण भारत

हॉकी प्रशिक्षक सोर्द मारिने यांची लेखनप्रपंचाकडे गरुडझेप!

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोव्हिड-19 च्या जागतिक प्रकोपामुळे आपल्या कुटुंबापासून कित्येक कोस दूर अडकून पडलेले महिला भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक सोर्द मारिने यांनी आता मिळत असलेला फावला वेळ सत्कारणी लावण्यासाठी लेखनप्रपंचाकडे मोर्चा वळवला आहे. मूळ डचचे असणारे 45 वर्षीय सोर्द कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत भारतात अडकले आहेत. त्या अनुभवावर ते पुस्तक लिहित आहेत.

सोर्द यांनी कुटुंबापासून दूर राहणे अतिशय कठीण असते, असे यावेळी कबूल केले. सोर्द यांची पत्नी व चार मुले- तीन मुली व एक मुलगा हे आपल्या निवासस्थानी आहेत.

‘अन्य कोणाहीप्रमाणे मला देखील प्रतिकूल स्थितीला सामोरे जावे लागले. त्यातही कुटुंबापासून दूर असणे खूप वेदना देणारे ठरत आहे. सध्या मी स्वतःला कुठे ना कुठे तरी गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत असून पुस्तक लिहिण्याचा उपक्रम त्यासाठीच हाती घेतला आहे’, असे सोर्द मारिने यांनी सांगितले. भारतीय महिला संघाचे हे विदेशी प्रशिक्षक बेंगळुरातील राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणात असून तेथून त्यांनी वृत्तसंस्थेशी संवाद साधला.

‘मी साडेतीन वर्षे भारतात राहिलो असून या कालावधीत अनेक विस्मयकारी क्षण येथे अनुभवले. प्रशिक्षकाच्या दृष्टीने आणि व्यावसायिक स्तरावर ते उपयुक्त ठरणारे आहेत’, याचा त्यांनी उल्लेख केला. भारतात लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी मारिने हे नेदरलँड्सला रवाना होणार होते. पण, त्यांनी विचार बदलला आणि कुटुंबाचे हित चिंतत संघासाठी भारतातच थांबण्याचा निर्णय घेतला.

‘सध्या मी एका वेळी फक्त एका दिवसाचा विचार करतो. माझे कुटुंबिय घरी सुरक्षित आहेत आणि त्यांनी परिस्थिती उत्तमरित्या हाताळली आहे. विशेषतः माझी पत्नी यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. घरी जाण्याऐवजी भारतात थांबण्याचा निर्णय घेणेही कठीण होते. पण, पूर्ण संघ येथे एकत्रित असल्याने मी संघाला आणि भारताला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला’, असे सोर्द पुढे म्हणाले.

‘भारतीय महिला खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांची आठवण होणे साहजिक आहे. पण, त्यांनी सरावात स्वतःला झोकून दिले आहे. मेरी कोम व दंगलसारखे प्रेरणा देणारे चित्रपटही त्यांनी एकत्रित पाहिले आहेत. याशिवाय, ते इंग्रजी बोलण्याचाही सराव करत आहेत. मी स्वतः यासाठी त्यांना व्हीडिओ दाखवत आहे’, असे त्यांनी शेवटी नमूद केले.

Related Stories

हरियाणात दोन आयटीएफ टेनिस स्पर्धांचे आयोजन

Patil_p

राष्ट्रीय सराव शिबिरात भारतीय टेबल टेनिसपटूंचे पुनरागमन

Patil_p

न्यूझीलंडचे माजी खेळाडू जॉन रीड यांचे निधन

Patil_p

सिलीकचा पहिल्या फेरीत पराभव

Patil_p

फॉर्ममधील मुंबईचा आज बांबोळीत ओडिशाशी सामना

Patil_p

राष्ट्रीय पुरस्कार शिफारस प्रक्रियेत मुदतवाढ

Patil_p
error: Content is protected !!