तरुण भारत

स्थलांतरितांची वेदना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज (14 एप्रिल) जयंती आहे आणि या दिवशी त्यांच्या विचारांचा सारासार विचार करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरणार आहे. बाबासाहेबांनी स्वातंत्र्यानंतर जे आपल्या देशाच्या भवितव्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते, त्यात लोकसंख्या वाढीचा प्रश्न महत्त्वाचा मानला जातो. भविष्यात लोकसंख्या वाढ नियंत्रणात आली नाही, तर इथल्या गोरगरीब जनतेला दोनवेळचे अन्नही मिळणार नाही, असे भाकित त्यांनी केले होते. त्यांच्या या विचाराला आता अर्धशतक लोटले आहे आणि त्याचा प्रत्यय आता या कोरोनाच्या महामारीत स्थलांतरितांच्या जीवन-मरणाचे जे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यावरून येत आहे. कोणताही महापुरुष एका जाती-धर्मात अडकत नाही तशी त्याची दृष्टीही दूरदृष्टीच असते. म्हणूनच अशा महापुरुषांनी जी वक्तव्ये केलेली असतात, त्याचा समाजाने गांभिर्याने विचार करून त्याची वेळोवेळी कृतीत अंमलबजावणी व्हायला हवी. कोरोनाने ज्या समस्या निर्माण केल्या आहेत, त्यात ‘स्थलांतरित’ हा एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा समाजासमोर आला आहे. कोरोनाने जगात उच्छाद मांडला. त्याचा प्रसार डिसेंबरपासून चीनमध्ये होऊ लागला. चीनने ही गोष्ट प्रारंभी लपवून ठेवली असली तरी स्पेन, इटली, अमेरिका अशा स्वावलंबी राष्ट्रांमध्ये कोरोनाने जसजसा हातपाय पसरायला प्रारंभ केला, तेव्हाच चीनची ही परिस्थिती जगासमोर आली आणि जग हादरले. भारत तोपर्यंत सुशेगाद होता. भारतातील राजकीय व्यवस्थेला याचे त्यावेळी गांभीर्य समजले नव्हते हे जरी खरे असले, तरी नागरिकांचीही याबाबतची उदासिनता नजरेआड करता येणार नाही. त्यातूनच मग आज कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या अनेक समस्या पुढे आल्या आहेत. 22 मार्च रोजीच पुढे देशभर ‘लॉकडाऊन’ करण्यात येणार असल्याची कल्पना दिली गेली असती, तर आज अनेक लोक आपापल्या गावी, घरी सुरक्षित राहिले असते आणि त्यांच्या पोटापाण्याचा कधी नव्हे एवढा प्रश्न निर्माण झाला नसता. या सगळय़ाचा स्थलांतर करू पाहणाऱया मोलमजुरी करणाऱया कष्टकऱयांना मोठा फटका बसला आहे. लोक अज्ञानात जगत असतात. त्यांना ज्ञानाची आस नाही, असे म्हणता येत नाही. परंतु, त्यांच्यापर्यंत ज्ञान पोहोचविण्याची आपल्याकडे सुनियोजित व्यवस्थाच नाही. आता स्थलांतरित लोक आणि ज्ञान याचा संबंध काय असा प्रश्न इथे निर्माण होईल. पण त्याचा परस्परांशी संबंध असतोच. जर ही कष्टकरी माणसे चारचौघांसारखी नियमित व्यवस्थेशी जोडून राहतील, तेव्हा त्यांना या महामारीचे गांभिर्य लक्षात आले असते. त्यातून त्यांनी इतरांसारखेच आधी आपले गावही गाठले असते. हातावर पोट घेऊन फिरणाऱया बऱयाच लोकांना आपण अडकून पडल्यामुळे ‘लॉकडाऊन’ हा शब्द माहीत आहे. पण त्यांना कोरोनाची दाहकता माहीत नाही. त्यामुळेही स्थलांतरितांचे लोढेंच्या लोंढे गाव गाठण्यासाठी धडपडत आहेत. देशातील मुंबई, दिल्ली अशी मोठी शहरे या स्थलांतरितांची मुख्य केंद्रे आहेत. येथील जनजीवन कोरोनामुळे कमालीचे अस्थिर झाले आहे. कुणालाच आपल्या जीवाची शाश्वती नाही. ज्याला-त्याला आपले काय होईल, या भयानेच ग्रासले आहे. त्यात मग या स्थलांतरितांचे काय होत असेल, याची कल्पनाही न केलेली बरी. ‘लॉकडाऊन’मुळे जगच जागच्या जागी थांबले आहे. प्रवासासाठी वाहतूक व्यवस्था नाही आणि तरीही जीव वाचविण्यासाठी देशभरातील निराधार आपले ठिकाण शोधण्यासाठी पायी प्रवास करत आहेत. त्यात अनेकांचा भूकबळी गेला आहे. एवढी करुण कहाणी कधी ऐकिवात आली नव्हती. दुसऱया महायुद्धानंतर प्रथमच एवढे भूकबळी जात असल्याच्याही बातम्या येत आहेत. यात लोकांचे अश्रूही गोठून गेले आहेत. यात वाईट गोष्ट अशी, की जी माणसे गाव गाठण्यासाठी हजारो मैल पायी प्रवास करत आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत आहे, त्यांनी हे दुःख कुणाशी वाटून घ्यावे? ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशा परिस्थितीला ती सामोरी जात आहेत. अर्थात त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी समाजाचा एक मोठा गट पुढे येत आहे, ही त्यातली चांगली घटना असली तरी, या जीवनावश्यक वस्तू सगळय़ांपर्यंत पोहोचत आहेत असेही नाही. त्यामुळे अनेकांना दोन-दोन दिवस उपाशीही राहायची वेळ आली आहे. अर्थात गावाकडे जाऊन जगता येईल का असाही प्रश्न त्यांच्यासमोर असताना ही माणसे गुन्हेगारच आहेत, असे त्यांच्याकडे पाहिले जाते आहे. याबाबत उत्तर प्रदेशातील काही घटनांबाबतचा काहींचा अनुभव विदारक आहे. माणसे भयभीत होऊन घर गाठण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आला. पोलीस यंत्रणेला बळाचा वापर करा, असाही आदेश देण्यात आला. ज्यांच्यावर लाठीहल्ला होत होता, त्या माणसांचा गुन्हा काय, तर ती आपले गाव गाठण्यासाठी उपाशीपोटी पायपीट करत होती. दुसरीकडे योगी सरकारने काही स्थलांतरितांसाठी बस पाठविण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात ती पाठविण्यात आलीच नाही. त्यामुळे  हजारो लोक सीमेवरच अडकून पडले. ही खरंतर त्यांची क्रूर चेष्टाच होती. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात हातावर पोट असणाऱयांना जीवनावश्यक सुविधांपासून दूर ठेवू नये, असे संकेत आहेत. पण इथे तर त्याची सरळ-सरळ पायमल्ली करण्यात आली. मग याच्या बातम्या रसभरीत वर्णनाने चॅनलेवरून प्रसारित करण्यात येत होत्या. आपण कुठे चाललो आहोत, हेच कळेनासे झाले आहे. आपल्यातील विवेक, संवेदनशीलता आपण अशावेळी कशी काय गमवून बसत असतो, याचा तर्कच लावता येत नाही. भारत स्वतंत्र होऊन 70 वर्षे लोटली. पण आपण आपल्या देशातील सर्व स्तरातील नागरिकांना आपत्तीच्या काळातही सर्व सुविधा देण्याला कमी पडत असू, तर आपल्या फक्त वैज्ञानिक, तांत्रिक प्रगतीला काय अर्थ आहे? पण कोरोनामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली. राष्ट्रीय आपत्तीत भूकबळी जाणारे स्थलांतरित असो की श्रीमंत, सगळय़ांनाच काळजी असते ती, जीवन-मरणाची…!

Related Stories

एक अजब सहल

Patil_p

रूप गणेशाचे….देई बीज संस्काराचे…..

Patil_p

स्मरणकथा एका नेत्याची!

Patil_p

गोव्याला महासंकटातून वाचविण्यासाठी सज्ज व्हा !

Patil_p

थेम्सच्या तीरावरून

Patil_p

नव्या जगातील प्रेमकहाण्या

Patil_p
error: Content is protected !!