तरुण भारत

कोरोनावर चीनचा ‘त्रीसुत्री फॉर्म्युला’!

कुडाळच्या अक्षय हळदणकरचे अनुभव कथन : महिनाभरापासून चीनमध्येच वास्तव्यास

  • ‘उहान’पासून तासाभराच्या अंतरावर ‘किंगडाव’ शहरात अक्षयचा मुक्काम
  • सोशल डिस्टंन्स, लॉकडाऊन, गरम पाणी या बळावर चीनची कोरोनावर मात!
  • कोणी शिंकला वा खोकला, तरी त्वरित नेले जाते इस्पितळात!

शेखर सामंत / सिंधुदुर्ग:

Advertisements

‘कोणी काहीही बोलोत! चीनने कोरोना रोखण्यासाठी जादू वगैरे काहीही केलेली नाही. अतिशय कडकपणे लॉकडाऊनचे पालन आणि गरम पाणी यावरच या देशाने कोरोनावर मात केली आहे. येथील प्रत्येक नागरिकाच्या मनात कोरोनाची दहशत अजूनही आहे. मात्र आम्ही सुरक्षित आहोत. महिनाभरापूर्वी आम्ही या देशात जहाज दुरुस्तीसाठी आलोय. आणखी महिनाभर तरी आम्हाला चीनमध्ये राहावे लागणार आहे.’

सिंधुदुर्गचा सुपुत्र अक्षय हळदणकर चीनमधील ‘किंगडाव’ या शहरातून ‘तरुण भारत’शी संपर्क साधून तेथील परिस्थिती सांगत होता. भारतातील परिस्थितीबाबत काळजी व्यक्त करताना तो म्हणाला, ‘ज्या तळमळीने, काटेकोरपणे चीनमधील नागरिक लॉकडाऊन, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करतात, तेवढे काटेकोरपणे पालन आपल्या देशात म्हणजेच भारतात होत नाही. ‘सोशल डिस्टन्स आणि लॉकडाऊन मनापासून पाळा, गरम पाणी प्या’ हा चिनी फॉर्म्युलाही फॉलो करा, असे त्याने पुनःपुन्हा सांगितले.

महिनाभरापासून चीनमध्ये वास्तव्य

 अक्षय हळदणकर हा कुडाळचा सुपुत्र. तो मर्चंट नेव्हीत कार्यरत असून तो हाँगकाँग शिपिंग कंपनीत नोकरीस आहे. या कंपनीमार्फत दगडी कोळसा व आयर्न ओव्हर या खनिजाच्या आंतरराष्ट्रीय वाहतुकीचे काम चालते. या कंपनीमार्फत सिंगापूरचे एक मालवाहक जहाज दुरुस्तीकरीता चीनमध्ये गेले आहे. या जहाजावर अक्षय हा थर्ड ऑफिसर म्हणून सेवा बजावत आहे. महिनाभरापूर्वी हे जहाज चीनमधील किंगडाव शहरातील एका शिपयार्डमध्ये दुरुस्तीकरीता दाखल झालं आहे. आणखी महिनाभर ते तिथेच थांबणार आहे.

काळजी नसावी, मी सुरक्षित आहे

किंगडाव शहरातून ‘तरुण भारत’शी संवाद साधताना अक्षय म्हणाला, ‘मी इकडे पूर्णपणे सुरक्षित आहे. आम्ही या शहरातील एका ड्राय गोदीत असून बोटीवरून कोणीही उतरू नये, अशा सक्त सूचना आम्हाला करण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही चिनी कर्मचाऱयाच्या नजीकच्या संपर्कात येऊ नका, असेही आम्हाला सांगण्यात आले आहे. या आदेशाचे आम्ही अत्यंत काटेकोरपणे पालन करीत आहोत. जहाज दुरुस्तीकरीता शिपवर येणाऱया प्रत्येक कामगाराची डोळय़ात तेल घालून वैद्यकीय तपासणी केली जाते. आमच्यासाठीही डॉक्टर तैनात आहेत. थोडक्यात आम्ही क्वारंटाईन होऊन पडलो आहोत. त्यामुळे आपण पूर्णपणे ‘सेफ’ असल्याचे तो म्हणाला.

चीनमधील परिस्थितीबाबत बोलताना म्हणाला, ‘या कोरोनाचा प्रसार चीनमधून उर्वरित जगात झाला असला, तरी चीननेच सर्वप्रथम या संकटावर मात करण्यात यश मिळविले, हेही तेवढेच खरे आहे. चीनला मिळालेले या यशाचे श्रेय येथील नागरिकांमधील शिस्त, सरकार प्रती असलेला विश्वास, देशाबद्दलचे प्रेम याच्यातच सामावले आहे. तो पुढे म्हणाला, आमचे शहर हे ‘उहान’ शहरापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे. मात्र या शहरात कोरोनाचा फारसा फैलाव झालेला नाही. येथील लॉकडाऊन केव्हाच उठवले आहे. मात्र अलिकडच्या काही दिवसांत उहान बाहेरील शहरातही कोरोना रुग्ण सापडू लागल्याने येथील प्रशासन पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहे.

चीनची कोरोनावर मात

लॉकडाऊनबाबत बोलताना तो पुढे म्हणाला, चीनमधील लॉकडाऊन आणि भारतातील लॉकडाऊन यात खूप फरक आहे. चीनमध्ये लॉकडाऊन काळात रस्त्यांवर चिटपाखरुही नसते. भारतात मात्र शासनाने सांगून देखील लॉकडाऊन तोडताना, सोशल डिस्टंन्सिंगचे उल्लंघन करताना अनेकजण दिसतात. इकडे कोणी शिंकला वा खोकला असे समजले की त्याला शासकीय यंत्रणा तात्काळ उचलून नेते व आपल्या देखरेखीखाली क्वारंटाईन करते. इकडे कोरोनावर अद्याप कोणतीही औषधे नाहीत. प्रशासनाने सर्व नागरिकांना सतत गरम पाणी प्या व कोरोना टाळा, असे सांगितले आहे. त्यामुळे इथे श्रीमंतांपासून ते गरिबापर्यंत प्रत्येकजण सॅनिटायझर, मास्क आणि गरम पाण्याचा थर्मास घेऊन फिरत असताना दिसत असल्याचे तो म्हणाला. त्यामुळे या कोरोनाला ‘उहान’मध्येच रोखण्यात या देशाला यश आलंय. मात्र अलीकडच्या दोन-चार दिवसात अन्य काही शहरांमध्ये कोरोना बाधित सापडू लागल्याने या देशाची चिंता वाढली आहे. आपल्या देशाबद्दल जगात काय बोललं जात आहे, याकडे येथील नागरिकांचा मुळीच लक्ष नाही. प्रत्येकाच्या चेहऱयावर कोरोनाची भीती मात्र स्पष्टपणे दिसत असल्याचे तो म्हणाला. चीनमधील अनुभव विचारात घेऊन अक्षय शेवटी म्हणाला, कोरोनावर लस मिळेल तेव्हा मिळेल. पण तत्पूर्वी माझ्या देशबांधवांनी शासनाने दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून स्वत:चे आणि स्वत:च्या कुटुंबाचे रक्षण करावे.

Related Stories

रत्नागिरीत कामगारांचे सरकार जगावो आंदोलन

Patil_p

बाळ-बाळंतीनीसह 1320 जण उत्तरप्रदेशला रवाना

Patil_p

ज्येष्ठ नागरिक मेडिक्लेम पॉलिसीपासून वंचितच

Omkar B

दशावतार कलाकारांना राज्यपालांकडून दिलासा

NIKHIL_N

तळवडेत खवले मांजराला जीवदान

Patil_p

रत्नागिरी : टाळेबंदीमुळे स्थानिक बाजारपेठेमधील हापूसची विक्री ठप्प

Abhijeet Shinde
error: Content is protected !!