तरुण भारत

गाडय़ा सुरू झाल्या की निघून जाऊ, पण तोवर..!

कर्नाटकातून मोचेमाडला आलेल्या चार कुटुंबांची स्थिती बिकट : माहिती देताना अश्रू झाले अनावर

भरत सातोस्कर / वेंगुर्ले:

Advertisements

कर्नाटकातील म्हैसूर येथील ठाकर जमातीतील चार कुटुंबे गेल्या पंधरा वर्षांपासून रोजगारासाठी सिंधुदुर्गात येतात. ही कुटुंबे मोचेमाड नदी किनाऱयावर तंबूमध्ये राहतात व खाडी व नदीत मासेमारी करून उदरनिर्वाह करतात. चारही कुटुंबांमध्ये मिळून 15 सदस्य आहेत. यात सहा लहान मुले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे चार कुटुंबे मोचेमाड येथेच अडकली आहेत. काम बंद असल्याने हातात पैसा नाही, खाण्यासाठी अन्नधान्य नाही, अशी त्यांची स्थिती झाली आहे.

यातील एका कुटुंबात एक नवजात बालक असून आई व त्या बालकाच्या संगोपनाचा प्रश्न उभा राहिला आहे. सदर परप्रांतीय कुटुंबांना आधार देण्यासाठी काही दात्यांनी मदत केली. मात्र, ती मर्यादित ठरली. या तिन्ही परप्रांतीय कुटुंबांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी सामाजिक संस्था, दात्यांनी मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे.

म्हैसूर येथील रंगा पाचकरी (70), महेश दुर्वा (40), दुर्वासकुमार (26), व पाचकरी यांची मुलगी यांची ही चार कुटुंबे रोजगारासाठी सिंधुदुर्गात दरवर्षी येतात. मार्च ते मे महिन्यापर्यंत जिल्हय़ातील नदी किनाऱयावर राहून गोडय़ा पाण्यात मासेमारी करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात. या चारही कुटुंबातील व्यक्ती अशिक्षित असून गावीही जमीन-जुमला नाही. सिंधुदुर्गातील देवबाग, सातार्डा, कवठणी व मोचेमाड नदी पूल या ठिकाणच्या नदी व खाडीत मासेमारीचा व्यवसाय गेली पंधरा वर्षे ते करीत आहेत. मोचेमाड येथील शिवराम वेंगुर्लेकर यांनी या तिन्ही कुटुंबांना राहण्यासाठी आपल्या जमिनीत जागा दिली आहे. येथे बांबूच्या सहाय्याने तंबू बांधून तिन्ही कुटुंबे राहतात. वेंगुर्लेकर यांनी त्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय केली आहे. सदर कुटुंबातील व्यक्ती पूर्वी डब्याच्या वापरातून मासेमारी करायचे. मात्र, आता पाच फूट व्यासाच्या गोलाकार छत्र्यांच्या आकाराच्या विशिष्ट काठय़ा व वेलीपासून बनविलेल्या होडय़ांमधून नदीत जाऊन ते मासेमारी करतात. गोडय़ा पाण्यात जे मासे मिळतात, त्यांची विक्री करून येणाऱया पैशांतून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

रेशनकार्ड नसल्याने धान्य नाही

देशातील संचारबंदीचा फटका या चारही कुटुंबांना बसला आहे. रेशनकार्ड नसल्याने धान्य मिळत नाही. यातील रंगा पाचकरी यांनी आपल्या गावातील पतसंस्थेकडून चार वर्षांपूर्वी दीड लाखाचे कर्ज घेतले आहे. ते अजून त्यांना फेडता आलेले नाही. मासेमारी करून साठवलेल्या पैशांतून ते कर्जाचे हप्ते भरतात. सध्या नदीत मासे मिळत नाहीत. त्यामुळे रोजगार बंद झाला आहे. त्यामुळे या कुटुंबांची स्थिती हलाखीची झाली आहे.

मदतीसाठी हात सरसावले, पण..

या कुटुंबांना मदत करण्यासाठी मोचेमाड सरपंच स्वप्नेशा पालव, अणसूरचे राजन गावडे, उदय गावडे तसेच मोचेमाड गावातील राजाराम तांडेल यांनी अन्नधान्य व अन्य पदार्थ त्यांना दिले. त्यातून काही दिवस त्यांची गुजराण झाली. मात्र 15 सदस्यीय कुटुंब असल्याने त्यांना अजूनही मदतीची गरज आहे. लहान मुलांना दूध वगैरेही मिळत नाही. त्यामुळे त्यांना तांदळाची पेज दूध म्हणून भरवतो, असे या कुटुंबियांनी सांगितले. लॉकडाऊन उठून एकदा सर्व वाहतूक सुरळीत झाली की आम्ही घरी जाणार, असे सांगताना सदर कुटुंबातील व्यक्तींना अश्रू आवरता आले नाही.

नवजात बालकाला पेज भरविण्याची वेळ

दरम्यान, संचारबंदीच्या काळात यातील एका कुटुंबातील सतीश पाचकरी यांच्या पत्नीला प्रसुतीसाठी 24 मार्चला शिरोडा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयामधून चार दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला. उघडय़ावर राहणाऱया या कुटुंबातील नवबालकाचे बाराव्या दिवशी नामकरण करायचे होते. उघडय़ा जागेत साडीचे पाळणे बनवून त्यात मुलास ठेवून बारसा करण्यात आला. मुलाचे नाव कृष्णा असे ठेवण्यात आले. खाण्याचीच मारामार असल्याने या माय-लेकाची अवस्था बिकट बनली आहे.

Related Stories

दापोलीत दोन कापड दुकानांना आग

Patil_p

मुटाटला डोंगर खचला, जमीन दुभंगली

NIKHIL_N

देश संरक्षणासाठी डोळसपणे पाहण्याची गरज

Patil_p

एसटीच्या 300 हून अधिक फेऱया सुरू

Patil_p

वेंगुर्ले कोविड सेंटर समस्यांच्या गर्तेत

NIKHIL_N

शिकवण्यासाठी शिक्षकांनी नेमली पर्यायी माणसे!

Patil_p
error: Content is protected !!