तरुण भारत

वेळ ‘परीक्षा व मूल्यांकन’ पद्धतीत बदल करण्याची

सामान्यतः 15 मार्च ते 5 मे दरम्यानचा कालावधी शैक्षणिक संस्थांच्या कार्यकाळातील सर्वात व्यस्त असतो. प्रकल्प मूल्यांकन, प्रायोगिक व संस्थांतर्गत मूल्यांकनांची अंतिम फेरी आयोजित करणे, परीक्षेचे पेपर तयार करणे, परीक्षा घेणे, पेपर तपासणी, निकालांची घोषणा आदी कामात एरवी व्यस्त असणारे शैक्षणिक जगत सध्या नाईलाजाने घरात बंदिस्त आहे. कोरोनाच्या भीतीमुळे या वषीच्या शैक्षणिक वर्षाचा शेवट अपरिष्कृत अपवाद ठरला, नव्हे तर शैक्षणिक वर्षाचा शेवटचा टप्पा पूर्णपणे विस्थापित झाला असेच म्हणावे लागेल. नियोजित परीक्षा वेळापत्रक तयार असतानाच परीक्षेच्या ऐन तोंडावर संपूर्ण प्रक्रियाच खंडित करावी लागली. प्रत्यक्षात परिस्थिती एवढी भीषण ठरली की दीड महिना झाला तरी परीक्षा पुन्हा घेतल्या जातील की नाही व झाल्याच तर त्या केव्हा याचे उत्तर कुणीच देऊ शकत नाही.

कोरोना संकटाची चाहूल लागताच लागलीच गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रासकट सर्व राज्यांनी इयत्ता सहावी ते आठवीच्या वार्षिक परीक्षा रद्द केल्या होत्याच. परीक्षा न घेताच सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात बढती देण्याचा निर्णय तसा योग्य झाला. नपेक्षा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसारखे त्यांनाही ति÷त राहावे लागले असते. गोवा राज्यातील बारावीच्या परीक्षेचे एक-दोन पेपर तेवढे राहिले आहेत तर दहावीच्या परीक्षा अजून घ्यायच्या बाकी आहेत. महाविद्यालय विद्यापीठांच्या परीक्षांबाबतही तसेच आहे. संपूर्ण देशभर दहावी, पदवी परीक्षांसकट, अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. एकंदरीत डोक्मयावर परीक्षांची टांगती तलवार घेऊन विद्यार्थी व त्यांचे पालक घरात बंदिस्त जीवन जगत आहेत.

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) मे महिन्याच्या शेवटच्या किंवा त्यापेक्षाही पुढे जूनच्या पहिल्या-दुसऱया आठवडय़ापर्यंत तहकूब ठेवण्यात आल्या आहेत. परीक्षा प्रवेशपत्र वितरित करण्याची तारीख अजून जाहीर व्हायची आहे. मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या परीक्षा घेण्यासारखी परिस्थितीच अनुकूल नसल्यामुळे देशभरातील 16 लाख परीक्षा इच्छुक विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आयआयटीसारख्या संस्थांमधील प्रवेश परीक्षा (जेईई) तर अनपेक्षित काळासाठी पुढे ढकल्या गेल्या आहेत. थोडक्मयात पुढील शैक्षणिक वर्ष कधी सुरू होईल हेही सांगता येण्यासारखे नाही.

एकंदरीत काय तर सध्या विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्गाचे जीवनच ठप्प झाले आहे. पालक व शिक्षकांचे व्हॉट्सअप ग्रुपात परीक्षासंदर्भात प्रश्नांचा भडिमार चालू आहे. विद्यार्थ्यांना अचानक प्राप्त झालेल्या एवढय़ा मोकळय़ा वेळात काय करावे याचा सुगावा लागत नसल्यामुळे गोंधळ उडाला आहे. थोडक्मयात घराघरात तणावाची परिस्थिती आहे. अनपेक्षित मिळालेल्या मोकळय़ा वेळात अभ्यास होत नाही अशी तक्रार विद्यार्थी करत असून पालकांची तारांबळ उडत आहे. परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या तेव्हा याच विद्यार्थी व पालकांनी समाधान व आनंद व्यक्त केला होता ही अभिव्यक्ती आता चिंता व गोंधळात बदलली गेली आहे. अभ्यासात लक्ष लागत नाही तर ‘बॅकबेंचर्स’ आनंदित आहेत. कारण परीक्षांचे मूल्यांकन यंदा सोपे व सुलभ होऊन आपण ‘पास’ होऊ यावर त्यांचा विश्वास आहे.

केंद्र सरकारने राज्य सरकारांना पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका तयार ठेवण्याच्या सूचना यापूर्वीच देऊन ठेवल्या आहेत. सीबीएसई व आयसीएसई संबंधित शाळा पारंपरिकपणे एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ातच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात करतात व मे-जून महिन्यात उन्हाळी सुट्टय़ा घेऊन पुन्हा जुलै महिन्यात सत्र सुरू करतात, तर राज्य शैक्षणिक मंडळे एप्रिलपर्यंत परीक्षा पूर्ण करून जून महिन्यातून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करतात. विद्यापीठ-महाविद्यालयांच्या परीक्षा मे-मध्यापर्यंत चालतात व जूनच्या मधल्या आठवडय़ात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते. यावषी अजूनपर्यंत परीक्षाच सुरू झाल्या नसल्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाला जुलै-ऑगस्टमध्येच सुरुवात होईल असे दिसते.

शिक्षण हक्क अधिकार कायद्याचा फायदा घेत यंदा इयत्ता पहिली ते आठवीच्या शालेय परीक्षा झाल्या नाहीत. पंचाईत मात्र महाविद्यालयांची झाली आहे. देशातील महाविद्यालयातील विद्यमान सत्रातील शिकवण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. त्या अपूर्ण शैक्षणिक तास घेण्यासाठी अजून एका पंधरवडय़ाची गरज असेल. विद्यमान परिस्थितीत त्या शिकवण्या पूर्ण करण्यासाठी वेळच उरलेला नाही. महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्ष (तेरावी-चौदावी) वर्गाच्या परीक्षा घेतल्यानंतरच विद्यापीठाच्या (पंधरावी) पदवी परीक्षा घेता येतील. परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे, पुन्हा नापास झालेल्यांसाठी पूरक परीक्षा घेणे, निकाल तयार केल्यानंतरच पुढील वर्गाची प्रवेश प्रक्रिया पार होऊ शकेल. एवढा वेळ आता उरलाय कुठे. थोडक्मयात प्रथम व द्वितीय वर्ष पदवी परीक्षांचे निकाल परीक्षा न घेताच गेल्या वर्षभरात घेतल्या गेलेल्या एकत्रित मूल्यांकनांवर घोषित केले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत पक्षपातीपणाच्या संभावना आहेत पण त्याला तूर्तास पर्याय नाहीत. फार तर तृतीय वर्ष पदवी परीक्षा घ्यायला वेळ मिळू शकतो. गोवा विद्यापीठाने 1 जून नंतर या परीक्षांचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. देशभरातील शाळा-विद्यापीठानी आता उन्हाळी सुट्टय़ांची घोषणा केली असून जूनच्या पहिल्या आठवडय़ात शैक्षणिक संस्थांची कवाडे उघडतील व त्यानंतरच विद्यमान शैक्षणिक वर्षाचा शेवट होईल व लागलीच नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होईल.

दहावी-बारावी व तृतीय वर्ष पदवी परीक्षा घेणे तर अनिवार्यच आहे. पण यासाठी ‘सामाजिक अंतर’ राखण्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधांचा विचार व्हायला हवा. विद्यार्थ्यांमध्ये योग्य अंतर ठेवून त्यांच्या आरोग्य हिताची खबरदारी घेणे आवश्यक आहे. चेहऱयावर मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य असणे गरजेचे आहे.

हे विद्यमान शैक्षणिक वर्ष कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचेलही, पण आपल्या एकंदरीत शिक्षण व परीक्षा व्यवस्थेबाबत गंभीरपणे विचार करण्यासाठी पुन्हा वेळ मिळणार नाही. आपली सध्याची शिक्षण पद्धती फक्त परीक्षार्थी झाली असून विद्यार्थी परीक्षांसाठी अभ्यास करतात, शिक्षण घेण्यासाठी नाही. शिक्षण घेणाऱयांचे संपूर्ण लक्ष पदवी संपादनावर असते, ज्ञान मिळविण्यासाठी नाही. शैक्षणिक अभ्यासक्रमातील शब्दसंग्रह लक्षात ठेवायचे, परीक्षेत ते पुन्हा जशाच्या तसे पुनउ&त्पादित करायचे, घोकंपट्टी उजाळायची व पुन्हा मनाची, ज्ञानाची पाटी कोरी करून पुढील वर्षात प्रवेश घ्यायचा एवढय़ापुरते शिक्षण मर्यादित झाले आहे. परीक्षेतील प्रश्नसुद्धा ‘काय?’ या पुरते मर्यादित असून ‘का?’, ‘कसे?’ असे विचारण्याचा त्रास परीक्षक घेत नाहीत.

शिक्षकांनी प्रसारित केलेल्या संबंधित ‘नोट्स’ वगळता पुस्तके, संदर्भांचे वाचन विद्यार्थ्यांकडून होत नाही. दुर्दैवाने परीक्षेत ‘ग्रेड’ मिळतात पण ज्ञानाची अभिवृद्धी होत नाही. योगायोगाने कोरोनानिमित्त घडलेल्या बंदिवासात परीक्षा व मूल्यांकन परिस्थितीबद्दल विचार करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ मिळाला आहे. परिस्थितीत बदल करण्याची संधी आपण दवडू नये एवढेच.

Related Stories

प्राणिक हीलिंगः एक आधुनिक आणि पूरक उपचार पद्धती

Patil_p

क्रीडार्थ उपवनाच्या ठायीं

Omkar B

ऐकोनि देवकी पडली धरणी

Patil_p

न्यायालय आणि अवमानना

Patil_p

उपचारापेक्षा प्रतिबंध बरा !

Omkar B

कोरोना योद्धय़ांना हवे जनतेचे पाठबळ

Patil_p
error: Content is protected !!