तरुण भारत

कृष्णाचि सरिसा भासतसे

तरुण प्रद्युम्नाला एकदम पाहून त्याची आई रुक्मिणीला काय वाटले याचे वर्णन राजा परिक्षितीकडे करताना महामुनी शुकदेव पुढे म्हणतात-आपला हरवलेला मुलगा आठवून तिचा कंठ सद्गदित झाला होता. अंग थरथरा कापत होते. सर्वांगावर रोमांच उठले होते. अंगाला घाम फुटला होता. आपले मन निवांत करून ती प्रद्युम्नाला पाहत होती. प्रद्युम्नाचे रूप आपला पति कृष्णाप्रमाणेच आहे हे पाहून तिला आश्चर्य वाटत होते.

कोण हा नररत्न पुरुषश्रे÷ । कोणे वंशीं जन्मला स्पष्ट ।  सहज भासे अंगलोट । श्रीवैकुंठपडिपाडें । रातोत्पलदलमृदुलचरण। कमळकोमळ करतळ अरुण ।  फुल्लारवर्तुळ पंकजवदन । कमलेक्षण कमनीय । कवणे सुभगेनें निजजठरिं । धरूनि वाहिला नवमासवरी । तत्समसादृश्यता शरीरिं । इंगितें श्रीहरीसम गमती । येणें कोण हे पाविजेली। पूर्णेश्वर्यें दैवाथिली ।  पौलोमीही ठेंगणी केली । निजलावण्यें पैं इणें ।

Advertisements

रुक्मिणी मनोमन विचार करू लागली-हे नररत्न कोण आहे? हा कमलासारखे डोळे असलेला पुत्र कोणाचा आहे? कोणत्या भाग्यवान स्त्रीने याला आपल्या गर्भामध्ये धारण केले असेल? याला ही कोण पत्नी म्हणून मिळाली आहे?

म्हणे माझाही आत्मज गेला । प्रसूतिगृहींहूनि जो नेला ।  कोठें असेल जरी वांचला । तरी असेल येतुला रूपवयें । याचिऐसा तेजःपुंज । पंचरात्र म्यां मुखपंकज।  पाहिलें तें गमतें बोज । मानी चोज तें ऐका ।

रुक्मिणी पुढे विचार करते-माझासुद्धा लहान मुलगा हरवला होता. मी केवळ पाच दिवस त्याचे तेजःपुंज मुखकमल पाहिले. त्याला सूतिका गृहातूनच पळवले होते. तो जर कुठे जिवंत असेल तर त्याचे वय आणि रूप याच्यासारखेच असेल.

म्हणे हें आश्चर्य वाटतें थोर । शाङ्गर्धन्वा गमे अपर ।  तत्सारूप्य हा सुंदर नर । कैसे परी लाधला । कृष्णासमान आकृतिठसा। पूर्णावयवीं कृष्णाचि ऐसा। गमनागमनें पदविन्यासा । कृष्णाचि सरिसा भासतसे।

कृष्णाऐसी स्वरमाधुरी। कृष्णाऐसी स्मितभा वत्री। कृष्णसादृश अपाङ्गनेत्री । कौशल्यकुसरी समसाम्य । ऐसें तर्कितां मोहऊर्मीं । विशेषें झळंबे हृदयपद्मी। म्हणे बहुतेक तोचि हा मेघश्यामें । मदुदरसद्मी संभव जो। यदर्थीं कारण हेंचि दृढ । याचेचि ठायीं मत्प्रेम वाड। वाम भुजही स्फुरणारूढ । लवे सुघड वामाक्ष । जो कां श्रीकृष्णवीर्याङ्कुर । माझिये जठरिं जाला स्थिर। यास्तव उभयसदृशाकार । हा मम कुमर निश्चयें । गेला आला कवणे रीती । यदर्थीं भ्रमित माझी मति। ऐसें विवरिं रुक्मिणी चित्तीं । तंव आला श्रीपति तें ऐका ।

रुक्मिणी मनोमन विचार करू लागली-याला श्यामसुंदरासारखे रूप, अंगाची ठेवण, चालणे, आवाज, हास्य, पाहणे हे सारे कोठून प्राप्त झाले? किंवा हाच तो मुलगा असेल का? ज्याला मी गर्भामध्ये धारण केले होते. कारण मला याच्याबद्दल खूपच प्रेम वाटत आहे आणि माझा डावा डोळासुद्धा लवत आहे. Ad. देवदत्त परुळेकर

Related Stories

गोडी अपूर्णतेची…

Omkar B

संत तुकाराम महाराज का अवतीर्ण झाले ?

Patil_p

ज्याचे खावे मीठ त्याच्याशी वागावे नीट!

Omkar B

मल्ल्याचे प्रत्यार्पण निश्चित

Patil_p

अमेरिका-चीन संघर्ष तीव्र होणार

Patil_p

आता लढा घटनापीठात!

Patil_p
error: Content is protected !!