तरुण भारत

तान्हुल्याच्या भेटीसाठी व्याकुळली आई

आई रत्नागिरीत, सहा महिन्यांचे बाळ मालवणात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधामुळे दोन कुटुंबियांची घालमेल

Advertisements

तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांचे सहकार्य पण…

मनोज चव्हाण / मालवण:

लॉकडाऊनच्या आधी दोन दिवस अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला आजी-आजोबा आपल्यासोबत रत्नागिरीहून मालवणात घेऊन आले. नंतर दोन दिवसांनी बाळाची आई रत्नागिरीहून मालवणात येणारच होती. मात्र, लॉकडाऊन जाहीर झाल्याने या तान्हुल्याची आणि आईची भेट गेल्या दीड महिन्यांपासून होऊ शकली नाही. रत्नागिरीत आई आणि मालवणात बाळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बाळाची आणि आईची भेट घडवून आणण्यासाठी मालवणचे तहसीलदार अजय पाटणे आणि पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनीही कायद्याच्या आधारे अनेकवेळा प्रयत्न केले.

मात्र, या जिल्हय़ांची सीमा बदलून येणाऱया व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या आदेशाने आई व बाळाची भेट लांबणीवर पडत गेली. त्यामुळे दोन्ही कुटुंबियांची सध्या घालमेल सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणेनेही काही प्रमाणात लवचिकता दाखवून बाळ आणि आईची भेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

मालवणात व्यास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील मुलगी रत्नागिरी येथे विवाह करून देण्यात आली आहे. या विवाहितेला साडेपाच वर्षांचा आणि एक सहा महिन्यांचा असे दोन मुलगे आहेत. विवाहितेच्या वडिलांवर मुंबईत शस्त्रक्रिया झाल्याने ते मुंबईहून मालवणात येताना, रत्नागिरीत एक दिवस थांबले. मालवणात जाताना ते सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन आले. मोठय़ा मुलाचे परीक्षेचे दोन पेपर झाल्यानंतर दोन दिवसांनी या दाम्पत्याची मुलगी मालवणातच येणार होती. त्यामुळे आजी-आजोबांनी तान्हुल्याला आपल्यासोबत घेतले. जेणेकरून मुलीला येताना त्रास होऊ नये. तान्हुला मालवणातच जन्मल्यामुळे आजीला त्याचा लळा लागला होता. फक्त दोन दिवसांचाच विषय असल्याने बाळाच्या आई-वडिलांनीही त्याला मालवणात नेण्यास सहज होकार दिला.

45 दिवस सुरू आहे घालमेल

लहान बाळाला रत्नागिरीला नेण्यासाठी किंवा त्याच्या आईला आणि दुसऱया मुलाला मालवणात आणण्यासाठी गेले 45 दिवस दोन्ही कुटुंबे आपापल्यापरिने प्रयत्न करत आहेत. मात्र, जिल्हय़ाची सीमा बदलण्याचा प्रश्न येत असल्याने अधिकृत परवानगी घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडे पोहोचण्यास त्यांना उशीर झाला. मालवणात तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना हे समजल्यानंतर त्यांचे हृदयही हेलावले. त्यांनी तात्काळ आपल्या स्तरावर कार्यवाही करून बाळाला रत्नागिरीत पाठविण्याची परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न केले. आईला आणायचे, की बाळाला पाठवायचे, यावरही एकमत होत नसल्याने पुन्हा अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस दोन्ही कुटुंबियांची घालमेल वाढतच आहे.

शासकीय नियमांचा फटका

दरम्यान, आता संस्थात्मक विलगीकरण ठेवण्याचा निर्णय झाल्याने बाळाला आणि आईला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास दुसरा मुलगा आणि त्याच्या वडिलांची काळजी घेणार कोण? सहा महिन्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी आजी सोबत गेली, तर शस्त्रक्रिया झालेल्या आजोबांची काळजी घेणार कोण? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत. यामुळे संस्थात्मक विलगीकरणातून सुट मिळाल्यास तान्हुल्याची आणि आईची भेट शक्य होणार आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱयांनी यात लक्ष घातल्यास सध्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हय़ातील दोन कुटुंबियांची सुरू असलेली फरफट थांबू शकेल. गेले पंचेचाळीस दिवस आईपासून दुरावलेल्या बाळाला आईचा ममतेचा पदर मिळेल.

Related Stories

जनशताब्दी आता ‘सीएसएमटी’वरून धावणार

NIKHIL_N

सावंतवाडीत सक्रिय रुग्णसंख्या तीन

NIKHIL_N

लॅबसाठी रिटपिटीशनची आमचीही तयारी!

NIKHIL_N

खेर्डी थ्री एम पेपर मिलमध्ये साडेबारा लाखांचा अपहार

Patil_p

जिह्यात चाचण्या घटल्या; 623 नवे रूग्ण

Patil_p

दोडामार्गातील युवाईला राणेंकडून मोठे अपेक्षा

NIKHIL_N
error: Content is protected !!