तरुण भारत

कोरोनाच्या संकटछायेत शुभ मुहूर्ताचा दिवस नीरव शांततेत

बेळगाव / प्रतिनिधी

अक्षय तृतीया… अर्थात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा मुहूर्त. मात्र कोरोनाच्या संकटछायेत शुभ मुहूर्ताचा हा दिवस नीरव शांततेतच पार पडला. कोरोनाची काळीकुट्ट छाया दूर व्हावी व सुख-समृद्धी, समाधान, शांती नांदावी, अशी प्रार्थना करत बेळगावकरांनी घरातच अक्षय तृतीयेचा सण आपल्या कुटुंबासमवेत साजरा केला. एरव्ही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाखोची उलाढाल होते. खरेदी करण्याबरोबरच शुभ सोहळय़ांचा मुहूर्तदेखील साधला जातो. मात्र, कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय बंद असल्याने मंदीच्या सावटाखाली बाजारपेठेत शुकशुकाट आणि नीरव शांतताच दिसून आली.

Advertisements

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मुहूर्ताचा दिवस साधत लक्ष्मी पूजेपासून नवीन वस्तू खरेदी करणे तसेच नवीन व्यवसाय-उद्योगाची सुरुवात केली जाते. मात्र, हा उत्साह आणि आनंद कोरोनाच्या धास्तीतच विरून गेला. बाजारपेठेत शुकशुकाट आणि बंद दुकाने, निर्मनुष्य रस्ते, जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठीची धडपड, ना पाने-फुले घेण्यासाठी गर्दी, ना कुठे आंब्यांची राशी अशा वातावरणात हा सण साजरा झाला.   घरोघरी मुहूर्तावर लक्ष्मी पूजन करत गोडधोड पक्वान्नाचा नैवेद्य दाखवून सणाची परंपरा जोपासण्यात आली. पाना-फुलांची सजावट व कैरी आंब्याचा मान असतो. मात्र कोरोनाच्या संकटछायेत आंब्याचे डहाळे आणि फुलांचे हार मिळणे कठीण झाल्याचे चित्र दिसून आले. कैरीचे पन्हे, चटणी असे आंबट-गोड पदार्थ आणि आंब्याचा आमरस हे पदार्थ प्रामुख्याने पूजेच्या नैवेद्याचा मान असतात. मात्र कोरोनामुळे कैरी आंबा मिळणे कठीण बनले.

खरेदीचा मुहूर्त हुकला

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱया या सणाच्या निमित्ताने लाखोची आर्थिक उलाढाल होते. वाहनांपासून इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदीचा मुहूर्त याच दिवशी साधला जातो. आगाऊ बुकिंग करत या दिवसावरच खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र या संकटात सर्वत्र व्यवसाय-उद्योग ठप्प असल्याने खरेदीचा मुहूर्त हुकला आहे. गुढी पाडव्यानंतरचा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकल्याने व्यापार -व्यवसायाचे दिवस कोरडे गेले आहेत. सराफी पेढी, वाहनांची दुकाने, वस्त्र दालने, इलेक्ट्रॉनिक साहित्य अर्थात मोबाईल, टीव्ही, फ्रीज असे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानांबाहेर रांगा लागतात. मुहूर्तावर पूजा करण्यासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या सणाचा उत्साह दिसून येतो. गणपत गल्लीपासून खडेबाजार, मारुती गल्लीपासून नरगुंदकर भावे चौकापर्यंत मुख्य बाजारपेठ आणि इतर परिसर फुल्ल असतो. मात्र, महामारीच्या संकटात सर्व व्यवहार बंद असल्याने हा सण साधेपणाने साजरा करण्यात आला.

विवाहाचे मुहूर्त लांबणीवर

अक्षय तृतीया अर्थात 26 एप्रिल रोजी विवाहाचा मुहूर्त असल्याने वधू-वर पक्षाकडून विवाह ठरविण्यात आले होते. विविध सोहळय़ांचे आयोजनही केले होते. मात्र, कोरोनामुळे सर्व सोहळे लांबणीवर पडले असून दिवाळीनंतर यांचा मुहूर्त साधण्यात येणार आहे. लॉकडाऊनमुळे प्रामुख्याने मार्चपासून होणारे सर्वच सोहळे रद्द करण्यात आले आहेत. सामाजिक अंतर ठेवत कोणतेही कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे विवाहासारखे मोठे सोहळे लांबणीवर पडले आहेत. परवानगीनुसार मर्यादित लोकांसमवेत अथवा घरगुती पद्धतीने विवाह सोहळे करण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी या संकटात आनंद उत्साहाचे कार्यक्रम करणे टाळले जात असल्याचे दिसून आले. परिणामी हा विवाहाचा मुहूर्त मात्र हुकला आहे. 

Related Stories

भुतरामहट्टीत दाखल होणार सांबर, अस्वल, तरस

Amit Kulkarni

मंगळवारी 47 जण कोरोनामुक्त तर 30 जणांना लागण

Patil_p

मनपा सभागृहात चालणार नगरविकासमंत्र्यांची बैठक

Patil_p

स्मार्ट सिटीच्या अंदाधुंद कामाचा रहिवाशांना फटका

Amit Kulkarni

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ज्योती व्होसट्टीला रौप्य

Amit Kulkarni

पूरग्रस्तांसाठी मनपाची निवारा केंद्र सज्ज

Patil_p
error: Content is protected !!