तरुण भारत

गवळी गल्लीला हॉटस्पॉट घोषित केल्याने गवळी बांधवांवर अन्याय

प्रतिनिधी/ बेळगाव

जिल्हा प्रशासनाने मंगळवार पेठ (गवळी गल्ली), टिळकवाडीला हॉटस्पॉट घोषित करून सीलडाऊन केले आहे. मात्र, यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज व संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. याचा फटका गल्लीतील गवळी बांधवांना बसत आहे. या गवळी बांधवांकडून दूध घेणे बंद करण्यात आले असून घरकामास येणाऱयांनाही मज्जाव करण्यात येत आहे. यामुळे गल्लीतील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी प्रशासनाने येथील खऱया परिस्थितीची जाणीव करून देणे गरजेचे बनले आहे.

Advertisements

गवळी गल्ली, मंगळवार पेठ भागात कोरोनाचा संशयित रुग्ण नसताना आणि कोणीही क्वॉरंटाईन अथवा आयसोलेशनमध्ये नसतानाही गल्लीला सीलडाऊन करून हॉटस्पॉट घोषित केले आहे. यामुळे अन्य नागरिकांमध्ये गैरसमजूत निर्माण झाली आहे. या गल्लीतील अनेक गवळी बांधव टिळकवाडी, भाग्यनगर, इंद्रप्रस्थनगर, चन्नम्मानगर आदी भागात दररोज दूध पुरवठा करतात. यावरच त्यांची गुजराण चालते. मात्र या गल्लीला हॉटस्पॉट घोषित केल्याने दूध घेणाऱया नागरिकांनी येथील दूध घेणे बंद केले. पुढील तीन ते चार महिने येऊ नका, असेही सांगितले आहे. घरकामास जाणाऱयांनाही कामावर येण्यास मज्जाव करण्यात आल्याने त्यांनाही घरी बसावे लागले आहे. यामुळे गल्लीतील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी प्रशासनाने येथील हॉटस्पॉट हटवून खरी परिस्थिती नागरिकांसमोर आणावी. गल्लीतील सर्व नागरिकांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात मंगळवारी जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गवळी गल्ली येथून दररोज 500 ते 600 लिटर दुधाची विक्री करण्यात येत असते. हे सर्व दूध शिल्लक राहत असून त्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गल्लीतील रूपसिंग भवानी, राजश्री गवळी, संदीप भवानी, लक्ष्मी भवानी, समीर गवळी, मनोज चौधरी, सचिन गवळी आदींसह अन्य गवळी बांधवांनी सोमवारी रस्त्यावर येऊन आपल्या मागण्या मांडल्या.

दरम्यान, गल्लीत काही जणांकडून जीवनावश्यक साहित्य वाटप करण्याचे काम सुरू आहे. मात्र सदर काम रात्रीच्या अंधारात होत असून गरीब व गरजूंना साहित्य मिळण्याऐवजी आपल्या मर्जीतील लोकांना देण्यात येत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. या विषयावरून रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी गवळी गल्लीत तणाव निर्माण झाला होता. गरीब व गरजूंनाच साहित्याचे वाटप करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 

Related Stories

कुडचीवर आता ड्रोनची नजर

Patil_p

कडोली – जाफरवाडीत शिवजयंती साजरी

Amit Kulkarni

सावळगी तालुका केंद्र करण्याची मागणी

Patil_p

जितो लेडिज विंगतर्फे ‘पहचान’ वेबिनार

Amit Kulkarni

राष्ट्रीय महिला आयोगाची राणी चन्नम्मा विद्यापीठाला भेट

Amit Kulkarni

अथणी, हुक्केरी येथील दोन महिलांचा कोरोनाने मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!