तरुण भारत

कणकवलीतील गर्दी अखेर नियंत्रणात

मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद असल्याने शुकशुकाट

आमदार नीतेश राणे यांनी बाजारपेठेतून चालत जाऊन घेतला आढावा

Advertisements

मंगळवारची गर्दी रोखण्यासाठी नियोजन करणार!

वार्ताहर / कणकवली:

लॉकडाऊन असतानाही मंगळवारची होणारी गर्दी रोखण्यासाठी पोलीस, न. पं. व व्यापारी संघामार्फत मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून मंगळवारी बाजारपेठेत शुकशुकाट होता. आमदार नीतेश राणे यांनीही कणकवली बाजारपेठेत चालत दुकाने बंद असल्याबाबत आढावा घेत पोलीस, न. पं. व व्यापाऱयांच्या सहकार्याबद्दल कौतूक केले. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पुढील आठवडय़ापासून मंगळवारची गर्दी रोखण्यासाठी न. पं.मार्फत नियोजन करण्यात येणार असल्याचेही राणेंनी सांगितले.

कणकवलीचा आठवडा बाजार लॉकडाऊनमुळे रद्द करूनही गेले चार मंगळवारची शहरात होणारी गर्दी पोलिसांसह प्रशासनाची चिंता वाढविणारी ठरली होती. गेल्या मंगळवारी याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी गांभिर्याने घेत याबाबत व्यापारी संघ व न. पं. सोबत चर्चा केली होती. त्यानंतर लॉकडाऊन संपेपर्यंत दर मंगळवारी शहरातील औषध दुकाने वगळता इतर दुकाने पूर्णत: बंद ठेवण्याचा एकत्रित निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे इतर दिवसांपेक्षा मंगळवारी कणकवलीत तुरळक वर्दळ होती. कणकवलीत मंगळवारची दुकाने बंद राहणार असल्याचे समजल्यावर अनेकांनी सोमवारी सायंकाळी आपल्याला आवश्यक वस्तूंची खरेदी केली होती.

आमदार राणे यांनी मंगळवारी बाजारपेठेतून चालत जाऊन बंदबाबतची पाहणी केली. यावेळी न. पं.च्या स्वच्छता कर्मचाऱयांमार्फत स्वच्छतेचे काम सुरू असल्याचे पाहून राणे यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली.  

..तर पोलिसांमार्फत कडक कारवाई!

राणे म्हणाले, लॉकडाऊन अजूनही वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी आठवडय़ाचे नियोजन करून त्यानुसार अंमलबजावणी केली, तर गर्दी टाळता येणे शक्य आहे. कणकवलीत वाहनांवर पोलिसांमार्फत कारवाई कडक करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सकांनी सिंधुदुर्ग शल्य चिकित्सकांना पत्र दिले आहे. त्यानुसार सिंधुदुर्गातील कोरोना नसलेले अन्य रुग्ण उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवू नयेत, असे सांगण्यात आले आहे. एकीकडे जिल्हय़ातील रुग्णांना गोव्यात नेता येत नाही, दुसरीकडे कोल्हापूरनेही रुग्ण पाठवू नये, असे सांगितल्याने ही चिंतेची बाब आहे.

खासगी डॉक्टर संघटनांशी चर्चा

जिल्हय़ाच्या खासगी रुग्णालयांच्या यंत्रणेचा वापर जिल्हा आरोग्य यंत्रणेने करण्याची गरज आहे. याबाबत आरोग्य विभागाशी चर्चा करण्यात आली. खासगी वैद्यकीय सेवा देणाऱया डॉक्टरांनी कमी दरात आपल्याकडील रुग्णांना सेवा देण्यावर भर द्यावा. याबाबत खासगी डॉक्टर संघटनेशी माझे बोलणे झाले असून जिल्हय़ातील कोरोना व्यतिरिक्त रुग्णांना चांगले उपचार मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे राणे यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, नगरसेवक बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, ऍड. विराज भोसले आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या चाचण्या वाढायला हव्यात!

जिल्हय़ातील व्यक्तींच्या दिवसाला फक्त 15 कोरोना व्हायरसच्या चाचण्या होत आहेत. कोरोनामुक्त सिंधुदुर्ग जिल्हा करायचा असेल, तर या चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. यासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी सरकारसोबत चर्चा करून जिल्हय़ाच्यादृष्टीने याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे राणे यांनी सांगितले.

Related Stories

उंटासह पायीच निघाले मध्यप्रदेशला

NIKHIL_N

शिरशिंगे मळईवाडीतील पूरग्रस्तांना भगिरथ प्रतिष्ठानचा मदतीचा हात

NIKHIL_N

सावंतवाडीत रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

NIKHIL_N

प्रभुंकडून रिफायनरीचे समर्थन

Patil_p

सावंतवाडीची भक्ती जामसंडेकर मिस युनिव्हर्स २०२१ ची उपविजेती

Ganeshprasad Gogate

विसर्जनासाठी गणेशमूर्तींची कचऱयागाडय़ातून वाहतूक

Patil_p
error: Content is protected !!