तरुण भारत

पावसाने मातीचा भराव आल्याने परशुराम घाट तासभर ठप्प!

चिपळूण परीसराला झोडपले,  तासभराच्या जोरदार पर्जन्यवृष्टीने दळवटणे, मोरवणे, कापरे, अडरेत नुकसान

चिपळूण / वार्ताहर

Advertisements

चिपळूण तालुक्याला बुधवारी सायंकाळी पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा  तडाखा बसला आहे. मेघगर्जनेसह कोसळलेल्या तासभर वादळी पावसाने शहर परिसराबरोबरच तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. या पावसात दळवटणे, मोरवणे, वालोटी, कापरे, अडरेसह अन्य गावांमध्ये नुकसान झाले आहे. दरम्यान,  मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणातील भरावाची माती रस्त्यावर आल्याने परशुराम घाटातील वाहतूक तासभराहून अधिक काळ ठप्प झाली होती.

  एप्रिल महिन्यात यापूर्वी झालेल्या दोन्ही वेळच्या अवकाळी पावसाने तसेच गारपीटने चिपळूण तालुक्यात हाहाकार उडवला होता. या पावसाने अनेक घरादारांचे लाखोंचे नुकसान केले आहे. आंबा पिकालाही मोठा फटका बसला आहे. यातूनच गेले आठवडाभर तालुक्यातील जनता सावरत असतानाच बुधवारी दुपारी पावसाने पुन्हा हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सकाळपासूनच वातावरणात बदल होऊन उकाडा वाढल्याने आणि त्यातच ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता दिसत होती. अशातच दुपारी 3 वाजल्यानंतर  वादळीवाऱयासह विजांच्या कडकडाट व ढगांच्या गडगडाटात पावसाने चिपळूणला झोडपून काढले.

शहरासह तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला. तासभर पडलेल्या या पावसाने एवढा जोर धरला होता की नागरिकांना जून, जुलै महिन्याचा अनुभव झाला. सर्व रस्ते धुवून निघाले, तर गटारेही तुडूंब भरून वाहू लागली. या पावसामुळे वातावरणातही गारवा पसरला होता. वादळी वाऱयासह कोसळणाऱया पावासात तालुक्यातील दळवटणे, मोरवणे, वालोटी, कापरे, अडरेसह अन्य काही गावांमध्ये घर, गोठे यांच्यावर झाडे व झाडय़ांची फांदी पडून, कौले व छप्परे उडून नुकसान झाल्याची नोंद तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागामध्ये करण्यात आली आहे. 

आंबा बागायतदार हवालदिल

 एप्रिल महिन्यात सलग तिसऱयांदा पावसाने हजेरी लावल्याने त्याचा फटका आंबा पिकाला बसला आहे. सध्या आंबा विक्रीचा हंगाम सुरू आहे. यातच सातत्याने अवकाळी पावसाचा फटका बसू लागल्याने आंबा पिकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा बागायतदार व शेतकरी हवालदिल झाले आहेत.

परशुराम घाटातील वाहतूक विस्कळीत

यापूर्वी पडलेल्या पावसामुळे भरावाची माती रस्त्यावर येऊन सलग दोनवेळा परशुराम घाटातील वाहतूक विस्कळीत झालेली असतानाच बुधवारी पुन्हा एकदा वाहनचालकाना सामोरे जावे लागले. महामार्ग चौपदरीकरणाचे काम कल्याणी टोलवेज कंपनी करीत आहे. मातीचा भराव, पडणारा पाऊस यामुळे कोणताही धडा न घेतल्याने वाहनचालकाना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागला. सुरूवातीला मातीतूनच एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र कंटेनर अडकल्यानंतर वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. सायंकाळी 4.30 वाजता ठप्प झालेली वाहतूक 5.45 वाजता हळूहळू सुरू झाली. ठप्प झालेल्या वाहत़ुकीमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Related Stories

जमावबंदी व कोव्हीड-19 निर्गमित मनाई आदेशाचे उल्लंघन प्रकरणी दोडामार्गात गुन्हे दाखल

NIKHIL_N

तळवडेत खवले मांजराला जीवदान

Patil_p

दापोली नगरपंचायतीकडून ‘कोविड’ सर्व्हे; ऑक्सीमिटर व थर्मामिटर गनने करणार तपासणी

Abhijeet Shinde

टोपीवाला दहावी ‘१९८६ बॕच’तर्फे दोनशे फेस शिल्ड

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी : राजापूर दळे येथे एकाच दिवशी तीन नेपाळी कामगारांचा मृत्यू

Abhijeet Shinde

शेती नुकसानीत शेतकऱयांची बोळवण

NIKHIL_N
error: Content is protected !!