तरुण भारत

चिपी ते हायवे दुपदरीकरण होणार!

सिंधुदुर्गातील अनेक विकासकामांबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून घोषणा

हायवे भूमिपूत्रांचे अडकलेले 130 कोटी आठवडाभरात देणार

Advertisements

सिंधुदुर्गनगरी, कणकवलीत शिवछत्रपतींचे भव्य अश्वारुढ पुतळे

आंगणेवाडी व लगतच्या तीन गावांच्या पाण्यासाठी 22 कोटी

वेंगुर्ल्याचे सेंट लुक्स हॉस्पिटल लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होणार

प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नऊ मोठय़ा घोषणा केल्या. यामध्ये चिपी विमानतळ ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत दुपदरीकरण, राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमिनी दिलेल्या भूमिपूत्रांचे प्रलंबित 130 कोटी रुपये आठवडाभरात मिळवून देणार, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जिल्हय़ातील पाच शासकीय विश्रामगृहांचे सुशोभिकरण, सिंधुदुर्गनगरी व कणकवलीतील शिवपुतळय़ांची उभारणी आदी कामांचा यात समावेश आहे.

पालकमंत्री उदय सामंत ‘तरुण भारत’शी विशेष बातचीत करताना म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आम्ही अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे चिपी विमानतळ ते राष्ट्रीय महामार्ग दरम्यानच्या मार्गाचे दुपदरीकरण करण्याकामी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर याच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वेंगुर्ले, मालवण, कणकवली, सावंतवाडी आणि देवगड अशा पाच शासकीय विश्रामगृहांचे सुशोभिकरण व सुसज्जतेसाठी 14 कोटी रुपये मंजूर करून तो निधी प्राप्तही करून घेतल्याचे त्यांनी सांगितले.

आंगणेवाडी व लगतच्या तीन गावांसाठी पाण्याकरिता 22 कोटी

आंगणेवाडी तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबत बोलताना ते म्हणाले, आतापर्यंत आंगणेवाडीची यात्रा आली की या तीर्थक्षेत्र विकासाच्या केवळ घोषणाच व्हायच्या. प्रत्यक्षात काहीच होत नसे. आपण याबाबत गांभिर्याने लक्ष घालून या यात्रेला येणारे भाविक व लगतच्या तिन्ही गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी 22 कोटी रुपये मंजूर केले.

हायवे भूमिपूत्रांचे प्रलंबित 130 कोटी लवकरच देणार

राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्णत्वाकडे येत असलेल्या कामाचा हवाला देत ते म्हणाले, या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमिनी दिलेल्या भूमिपूत्रांचे प्रलंबित असलेले 130 कोटी रुपये तातडीने मिळावेत, यासाठी आपण केंद्र शासनाच्या संबंधित खात्याला पत्र लिहिले असून येत्या आठवडाभरातच ही सर्व रक्कम भूमिपूत्रांच्या खात्यात निश्चितपणे जमा होईल.

सिंधुदुर्गच्या राजधानीत लवकरच भव्य राष्ट्रध्वज

शहर विकास व सुशोभिकरण आणि त्या माध्यमातून पर्यटन याबाबत बोलताना ते म्हणाले, सिंधुदुर्गची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरीच्या प्रवेशद्वारानजीक असलेला शिव पुतळा बदलून त्या ठिकाणी शिवरायांचा नवा भव्य अश्वारुढ पुतळा त्याचप्रमाणे सभोवतालचे शिवोद्यान नव्याने उभारण्यास लवकरच सुरुवात केली जाणार आहे. तसेच याच राजधानीत जिल्हय़ातील सर्वाधिक म्हणजेच 30 मीटर उंचीचा 24 तास फडकणारा भव्य राष्ट्रध्वज उभारण्याचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे ते म्हणाले.

शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळा लवकरच उभारणार

याच शहर सुशोभिकरणांतर्गत कणकवलीमध्ये चर्चेत असलेल्या शिवरायांच्या भव्य अश्वारुढ पुतळय़ाचा प्रश्न आपण मार्गी लावल्याचे ते म्हणाले. यासाठी डीपीडीसी, आमदार, खासदार फंड आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या सर्वांच्या माध्यमातून निधी उभारून पुतळय़ाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे, तर महामार्गाच्या बांधकामांतर्गत तोडण्यात आलेले श्रीधर नाईक बालोद्यान नव्याने उभारण्याचे आदेश नॅशनल हायवे ऍथॉरेटीला दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याकामी निधी कमी पडल्यास डीपीडीसी फंडातून उर्वरित निधीची तरतूद करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

वेंगुर्ल्याचे सेंट लुक्स हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू होणार

वेंगुर्ल्यातील सेंट लुक्स हॉस्पिटलच्या पुनः उभारणीसंदर्भात माहिती देताना ते म्हणाले, येत्या काही दिवसांतच या हॉस्पिटलमध्ये ओपीडी व आयसीयू युनिट सुरू होणार असून पुढील सहा महिन्यांच्या आत पूर्ण क्षमतेने हे हॉस्पिटल सुरू करण्याचे आपले प्रयत्न राहतील.

Related Stories

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी ‘मिशन वात्सल्य’

NIKHIL_N

पाली वळके सीमेनजीक बिबट्याचा वावर

Abhijeet Shinde

आवानओल प्रतिष्ठानतर्फे कवी सफरअली इसफ यांचा गौरव

Abhijeet Shinde

मेडिकल कॉलेजसाठी तीन जागांची प्राथमिक निवड!

Patil_p

लॉकडाऊन कालावधीत गंभीर गुन्हय़ांचे प्रमाण घटले

Patil_p

उमेदवारी तिकिटाच्या राजकीय चर्चांना शहरात उधाण

Patil_p
error: Content is protected !!