तरुण भारत

साडेपाच लाखाची गोवा दारू खारेपाटण चेकपोस्टवर जप्त

गोवा येथून नवी मुंबईकडे जात होता टेम्पो : तिघांवर गुन्हा दाखल :‘टॉयलेट क्लिन’च्या बॉक्समधून करत होते दारूची वाहतूक

वार्ताहर / खारेपाटण:

गोवा येथून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱया टेम्पोमधून सुरू असलेली गोवा बनावटीची दारू वाहतूक कणकवली पोलिसांनी रोखली. ही कारवाई महामार्गावरील खारेपाटण येथील चेकपोस्टवर रविवारी सकाळी सातच्या सुमारास करण्यात आली. यात तब्बल 5 लाख 40 हजार रुपयांची दारू व टेम्पो जप्त करतानाच तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ‘लॉकडाऊन’ असतानाही दारूच्या बॉक्सने भरलेला टेम्पो इथपर्यंत पोहोचलाच कसा, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

याप्रकरणी चालक प्रमोद सखाराम राऊळ (28, रा. कसाल-कुडाळ), रामधनी रामलखन केवट (30, रा. मध्यप्रदेश), सिद्धेश सखाराम बोडेकर (35, रा. कसई – दोडामार्ग) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संशयितांनी ‘टॉयलेट क्लिन’च्या बॉक्समधून दारूचे बॉक्स नेण्याचा प्रयत्न केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलिसांचे पथक खारेपाटण-चेकपोस्ट येथे डय़ुटी बजावत होते. सकाळच्या सुमारास तेथे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेला टेम्पो (एमएच07 एजे 5411) आला. पोलिसांनी टेम्पो थांबवून चालकाकडे विचारणा केली. त्यावर टेम्पोमध्ये ‘टॉयलेट क्लिनर’चे बॉक्स असल्याचे चालकाने सांगितले. पोलिसांनी टेम्पोच्या हौद्याची तपासणी केली असता, आतमध्ये खरोखरच ‘टॉयलेट क्लिनर’चे बॉक्स आढळून आले. मात्र, हे बॉक्स उघडून पाहिले असता, आतमध्ये ‘टॉयलेट क्लिनर’च होते. मात्र, खालील काही बॉक्सची पॅकिंग संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी ती फोडली असता, आतमध्ये दारूचे बॉक्स आढळून आले.

पोलिसांनी 90 बॉक्स जप्त केले आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये 12 बाटल्या होत्या. कारवाईत उपनिरीक्षक आर. डी. गुरव, खारेपाटण दूरक्षेत्राचे हवालदार अनमोल रावराणे, पोलीस नाईक रवींद्र देवरुखकर, व्ही. वाय. खेडकर, एस. एस. घारकर, आर. पी. बुचडे, यू. बी. साबळे, एस. एस. पोकळे आदी सहभागी झाले होते.  तपास हवालदार अनमोल रावराणे करत आहेत.

Related Stories

‘वादळग्रस्तां’च्या भरपाईत भरीव वाढ

NIKHIL_N

बालगृहातील 6 जणांचा राज्य शासनाकडून गौरव!

Patil_p

आयुर्वेद रुग्णालयात अतिदक्षता विभाग

tarunbharat

मालवणात शिवसेनेतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

NIKHIL_N

साखरप्यात शिवभोजन थाळीचा शुभारंभ

Patil_p

40 टक्के कर्मचाऱयांची कोरोना लसीला नकारघंटा

Patil_p
error: Content is protected !!