तरुण भारत

कर्नल, मेजरसह पाच जण हुतात्मा

काश्मीरमध्ये तुंबळ चकमक : गोळीबारात दहशतवाद्यांच्या म्होरक्यासह तिघांना कंठस्नान

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्हय़ातील हंदवाडा येथे शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी झालेल्या तुंबळ चकमकीत लष्कराच्या कमांडिंग ऑफिसर, मेजरसह पाच जणांना हौतात्म्य आले. तसेच लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमुळे दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यासह तिघांना कंठस्नान घालण्यात आले. गेल्या काही दिवसातील ही सर्वात संघर्षमय चकमक असल्याचे मानले जात असून भारत आता पाकिस्तानच्या कारवायांविरोधात जोरदार पावले उचलण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, चकमकीच्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात 8 स्थानिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

उत्तर-काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्हय़ात हंदवाडाच्या चांजमुल्ला भागात शनिवारी एका घरात लपलेल्या काही दहशतवाद्यांनी नागरिकांना बंधक बनवले होते. यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या एका तुकडीने काश्मीर पोलिसांच्या मदतीने या भागाला घेरले आणि सर्व नागरिकांना सोडवले. बंधक नागरिकांना सोडवण्यात येत असतानाच दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला. यानंतर लष्करानेही प्रत्युत्तर दिले. यात लष्कराचे कमांडिंग ऑफिसर (सीओ) कर्नल आशुतोष शर्मा आणि मेजर अनूज यांच्यासह दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीसचे उपनिरीक्षक शकील काझी यांना हौतात्म्य आले.

गेल्या दोन दिवसांपासून काश्मीर खोऱयात दहशतवादी कारवायांनी जोर धरला आहे. याशिवाय पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला जात आहे. यापूर्वी पुलवामाच्या डोंगरपोरामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध मोहिमेदरम्यान तेथे लपून असलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

कर्नल आशुतोष यांच्या अनेक मोहिमा यशस्वी

या चकमकीत हौतात्म्य प्राप्त झालेले कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा यांनी यापूर्वी दहशतवाद्यांविरोधातील अनेक कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. मात्र, या कारवाईत त्यांना हौतात्म्य आले. जम्मू-काश्मीरमध्ये पाच वर्षानंतर झालेल्या दहशतवादी चकमकीत सैन्याने कमांडिंग ऑफिसर गमावला आहे. यापूर्वी 2015 मध्ये कुपवाडाच्या हाजीनाका जंगलात दहशतवादी चकमकीत 41 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते.

दहशतवादी कमांडरचा खात्मा

चकमकीत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा मुख्य कमांडर हैदरला कंठस्नान घातले. हैदर हा पाकिस्तानचा रहिवासी होता. तो लष्कर-ए-तोयबाचा काश्मीरचा कमांडर-इन-चीफ होता. याशिवाय अन्य दोन दहशतवादीही ठार झाले आहेत. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी याला दुजोरा दिला आहे.

‘टीआरएफ’ने स्वीकारली जबाबदारी

लष्कर-एöतोयबाच्या ‘द रेजिस्टेस प्रंट’ने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. जम्मू-काश्मिरात सध्या दोन दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला टक्कर देण्याचा लष्कर-ए-तोयबाच्या द रेजिस्टेस प्रंटचा प्रयत्न आहे. वर्चस्वाच्या या लढाईतूनच टीआरएफने शनिवारी रात्री उशिरा हा हल्ला केला.

18 तासांचे चकमकनाटय़…

शनिवारी सैन्याला हंदवाडाच्या जंगली भागात दहशतवादी लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर सैन्याने पोलिसांच्या मदतीने या भागात तातडीने शोधमोहीम राबविली. मात्र, त्यात कोणताही दहशतवादी सापडला नाही. त्यानंतर छझीमुल्ला गावात काही दहशतवादी बसले आहेत आणि त्यांनी लोकांना ओलिस ठेवल्याचे समजताच शोध पथकाने आपला मोर्चा संबंधित ठिकाणाकडे वळवला. अपहरणकर्त्यांना मुक्त करण्यासाठी सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली. या पथकाचे नेतृत्व 21 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आशुतोष शर्मा यांनी केले. त्यांच्यासमवेत लष्करासह जम्मू-काश्मीर पोलिसांचेही एक पथक होते.

सैनिक जेव्हा घरात घुसले तेव्हा दहशतवादी गोठय़ामध्ये लपले होते. सुरक्षा दलाने लोकांना घरातून सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू होऊन चकमक वाढत गेली. त्यातच या भागात मुसळधार पाऊस झाला. रविवारी सकाळी सातच्या सुमारास गोळीबार थांबला. यानंतर सैन्याने घराची तपासणी केली. त्यानंतर लष्कराच्या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली. परंतु यावेळी कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह 5 सहकाऱयांना प्राण गमवावे लागले होते.

शौर्य वाया जाणार नाही : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील या चकमकीबद्दल शोक व्यक्त केला आहे. हंदवाडा येथे हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या शौर्यास मी अभिवादन करतो. त्यांचे शौर्य आणि त्याग देश विसरु शकत नाही. मी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीही हंदवाडातील चकमक अतिशय दु:खद आहे. दहशतवाद्यांशी लढा देताना त्यांनी निर्भय धैर्य दाखवून देशासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांचा त्याग आणि शौर्य देशाला आठवेल, असे स्पष्ट केले.

Related Stories

पंतप्रधान मोदींनी केले आशियातील सर्वात मोठ्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन

datta jadhav

राजस्थानात गुर्जर आंदोलन : इंटरनेट बंद

Patil_p

सणासुदीच्या काळात पश्चिम रेल्वेच्या 24 विशेष गाड्या धावणार

datta jadhav

सज्जाद लोन ‘गुपकार’मधून बाहेर

Patil_p

दिल्लीतील सीआरपीएफच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा, मुख्यालय सील

pradnya p

जानेवारी महिन्यात निर्यातीत वाढ

Patil_p
error: Content is protected !!