तरुण भारत

माणुसकीने सोडली साथ… अन् प्रशासनाने दाखविला हात

अनंत कंग्राळकर/ बेळगाव

आपल्या गावाकडे पायी चालत निघालेल्या नागरिकांना काहींनी सहकार्य केले.  काहींनी संशयाने पाहत गावाबाहेर हाकलण्याचा प्रकार केला. त्यामुळे घरचा रस्ता धरलेल्या नागरिकांना हिंडलगा गावात जेवणाची व्यवस्था केली. एक रात्र काढण्यासाठी मराठी शाळेचा आधार घेतला. मात्र याही ठिकाणी काही नागरिकांनी त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हा प्रशासनाचे दरवाजे ठोठावले. जिल्हा प्रशासनाकडूनही कोणतेच सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे लमाणी तांडय़ातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून त्या ठिकाणी रात्र घालविली. अशा अडचणीच्या वेळी ‘माणुसकीने सोडली साथ… अन् प्रशासनाने दाखविला हात’ अशी अवस्था कामगारांची झाली.

Advertisements

लॉकडाऊनमुळे दोडामार्ग येथे महिन्याभरापासून अडकलेल्या लमाणी तांडय़ातील 36 नागरिकांना घरी जाण्याची सूचना स्थानिक प्रशासनाने केली. त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी प्रशासनाने कोणतीच सुविधा उपलब्ध केली नाही. त्यामुळे आपल्या राज्यात गेल्यानंतर तेथे काही तरी सोय होईल या अपेक्षेने तांडय़ातील नागरिकांनी वृद्ध व लहान बालकांसह आपल्या साहित्यासह यादगीर जिल्हय़ातील सुरपूर गावी पायी जाण्याचा निर्णय घेतला. तिलारीमार्गे सलग चार दिवस पायी प्रवास करून कर्नाटक राज्यात दाखल झाले. ठिकठिकाणी अडवणूक झाली, विचारपूसही झाली आणि आरोग्य तपासणीही झाली. मात्र, त्यांच्या खाण्या-पिण्याची किंवा घरी पोहोचविण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे विचारपूस करत शेतवडीतील रस्त्याने उचगाव येथे पोहोचले. काही नागरिकांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांना मळेकरणी देवस्थानच्या आमराईमध्ये राहण्याची सूचना केली. जेवणाची व्यवस्था करून जिल्हा प्रशासनाला व तहसीलदारना सूचना केली. त्यानंतर त्यांची उचगाव येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. पण दुसऱया दिवशी गावकऱयांनी कोरोनाच्या संशयाने लमाणी तांडय़ातील नागरिकांना राहण्यास आक्षेप घेऊन गावातून जाण्यासाठी तगादा लावला.

त्यामुळे शनिवारी रात्री 7 वा. पायी चालत बेळगावकडे निघाले. याच दरम्यान हिंडलगा विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ ग्रामीण पोलीस स्थानकाच्या अधिकाऱयांनी त्यांना अडवून विचारपूस केली. चौकशी केल्यानंतर आरोग्य तपासणी केलेले दाखले लमाणी कामगारांनी दाखविले. आम्ही पोट भरण्यासाठी दोडामार्गला गेलो होतो. महिन्यापासून काम नाही. तेथील अधिकाऱयांनी घरी जाण्याची सूचना केली. त्यामुळे आम्ही चालत निघालो आहे, अशी माहिती नागरिकांनी पोलीस अधिकाऱयांना दिली. तांडय़ामध्ये महिला, लहान मुले व वृद्ध पाहून पोलीस अधिकाऱयांनी जेवणाबाबत विचारपूस केली. आमचे जेवण झाले नाही, असे सांगितल्याने हिंडलगा येथील सामाजिक कार्यकर्ते रवि कोकीतकर यांच्यासह जि. पं. सदस्या माधुरी हेगडे व त्यांचे पती अनिल हेगडे यांना बोलावून जेवणाची सुविधा करता येईल का, अशी विचारणा पोलीस अधिकाऱयांनी केली. त्यामुळे गावातील युवकांनी कामगारांना बिस्कीट, पाण्याची बाटली दिली. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात केली. यावेळी सहकार्य करण्यासाठी गावातील असंख्य युवकांनी सहकार्य दर्शविले.

सकाळी जिल्हा प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतर बसने आम्ही गावी जाणार आहे. आम्हाला एक रात्र राहण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती कामगारांनी केली. त्यामुळे सर्व चौकशी करून हिंडलगा येथे मराठी शाळेत राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली. यावेळी आशा कार्यकर्त्या व आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांना सूचना देऊन सर्व कामगारांची माहिती घेण्याची सूचना करण्यात आली. आशा कार्यकर्त्या व आरोग्य खात्याचे कर्मचारी मराठी शाळेत दाखल झाले. मात्र काही कामगार मराठी शाळेत दाखल झाल्याची माहिती गावात पसरल्यानंतर काही युवक मराठी शाळा परिसरात दाखल झाले. कामगारांना राहण्यास आक्षेप घेतला. प्रथम कामगारांना गावाबाहेर काढा अशी मागणी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण गावात नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱयांनी परिस्थिती नियंत्रणात आणून कामगारांना पाठविण्यात येईल, पण त्यांच्या अडीअडचणींचा विचार करा, अशी सूचना केली. आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांनी त्यांची तपासणी केली असून, यामध्ये कोणीही कोरोनाचा रुग्ण किंवा संशयित नाही. यामध्ये महिला व लहान मुले असल्याने या ठिकाणी राहणार आहेत. सकाळी ते निघून जातील, अशी विनंती गावकऱयांना करून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण काही नागरिकांनी ऐकले नाही. या कामगारांना बाहेर काढा, अन्यथा मोर्चा काढू असा इशारा दिला.

त्यामुळे या ठिकाणी दाखल झालेले लमाणी समाजातील समाजसेवक शंकर चव्हाण यांनी अधिकाऱयांना विनवणी केली. जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची विनंती केली. पण प्रशासनाकडून सहकार्य मिळाले नसल्याची माहिती शंकर चव्हाण यांनी दिली. लॉकडाऊन काळात कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासनाच्या मदत केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण जिल्हा प्रशासनाच्या मदत केंद्राकडूनही कोणतीच मदत झाली नाही. सातत्याने संपर्क साधूनही कोणतेच सहकार्य मिळाले नसल्याने खासगी वाहनाच्या माध्यमातून सदर लमाणी तांडय़ातील कामगारांनी रात्री 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्या ठिकाणी मदत केंद्राकडे माहिती दिली. पोलीस कंट्रोल रूमला कळविण्यात आले. त्यामुळे पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात धाव घेऊन कामगारांची भेट घेतली. सविस्तर चौकशी करून सकाळी आरोग्य तपासणी करण्याची सूचना केली. लहान मुलांसह महिलांनी संपूर्ण रात्र जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जागून काढली. पण जिल्हा प्रशासनाकडून सदर कामगारांना जिल्हा प्रशासनाकडून कोणतीच मदत मिळाली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या सतर्कतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पण मदत करण्यासाठी कोणीच अधिकारी येत नसल्याची बाब चव्हाटय़ावर आली.

रविवारी सकाळी शंकर चव्हाण यांनी सर्व कामगारांची जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी करून त्या ठिकाणी थांबण्याची सूचना केली. जिल्हा प्रशासनाकडे धाव घेऊन कामगारांना गावी पाठविण्यासाठी परवानगीसाठी प्रयत्न चालविले. अखेर चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आल्याने दुपारनंतर जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतर परिवहन मंडळाच्या बसद्वारे लमाणी तांडय़ातील कामगारांना स्वगृही पाठविण्यात आले. 

Related Stories

हिमाचल प्रदेश राज्यपालांची‘लोकमान्य’ला भेट

Amit Kulkarni

जय भवानी महिला सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Patil_p

सीमावासीय मागासवर्गीयांना महाराष्ट्रात आरक्षण द्या

Patil_p

‘दी गँरेज कॅफे’ येथे थाई फूड फेस्टिवलचे आयोजन

Amit Kulkarni

हंगरगे परिसरातील शिवारात गव्यांचा धुमाकूळ

Omkar B

बेळगावात ग्राहक न्यायालयाचे बेंच स्थापन करण्याबाबत शिफारस

Patil_p
error: Content is protected !!