तरुण भारत

काला बाजार

देव आनंद, वहिदा आणि विजय आनंदचा ‘काला बाजार’ सिनेमा वाचकांना आठवत असेल. इंटरनेट किंवा केबल टीव्हीचे आगमन होण्याआधी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणे ही एक साधी आणि लोकप्रिय करमणूक होती. मात्र त्या करमणुकीसाठी थोडे कष्ट उपसावे लागत. नवा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होई. सोमवारपासून त्याची आगाऊ तिकीट विक्री सुरू होई. रसिक चाहते तिकीट खरेदीसाठी चित्रपटगृहावर झुंबड करीत. तिथले नोकर रसिकांशी अभूतपूर्व उर्मटपणे वागत. रांग लावण्याचे, इकडून तिकडे सरकण्याचे हुकूम खेकसून देत. रसिक सगळे अपमान सहन करीत. अनेकदा येणारा सर्वात वाईट अनुभव म्हणजे आपला नंबर आला की आतला कारकून लाकडी पट्टी खाली आपटून खिडकी बंद करायचा. काही ठिकाणी पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगळय़ा रांगा असत. एकतर्फी प्रेमिक असलेल्या आमच्या एका मित्राला त्याची प्रेयसी रांगेत उभी दिसली होती आणि त्याने तिला स्वतःचं तिकीट काढायची विनंती केली होती. तिने तिकीट काढले. जवळजवळचे सीट नंबर्स मिळाल्याने मित्र काही क्षण खुश झाला. पण आत गेल्यावर मित्राच्या शेजारी ती न बसता तिची आई बसली.

आयत्या वेळी मैत्रिणीबरोबर सिनेमाला गेल्यावर सिनेमा आधीच हाऊसफुल्ल झालेला असेल तर मुलांचा चेहरा जाम पडायचा. तिकीटे घेऊन आत जाणाऱया लोकांकडे ते आशाळभूतपणे बघत. अचानक एखादा कळकट कपडय़ातला इसम जवळ येऊन कानात ‘बाल्कनी, दो का पांच-दो का पाच’ किंवा तत्सम आशयाचे शब्द पुटपुटायचा नि पुढे निघून जायचा. खिशात भरपूर पैसे असतील तर तो मुलगा त्या कळकट इसमाच्या पाठोपाठ जायचा. लांब आडोशाला गेल्यावर तो कळकट इसम दोन रुपयांची तिकीटे प्रत्येकी पाच रुपये दराने द्यायचा. त्या इसमाला लोक ब्लॅकवाला म्हणायचे.

Advertisements

सध्या लॉकडाऊन चालू आहे. सकाळी दोन तास फक्त औषधांची दुकाने चालू असतात. परवा मी माझ्या ब्लड प्रेशरसाठीच्या गोळय़ा घ्यायला गेलो होतो. पोलीस सर्वांना लवकर घरी जाण्यासाठी घाई करीत होते. येताना समोरून कळकट कपडय़ातला तोंडाला मास्क बांधलेला इसम आला. माझ्या अगदी जवळ (एक मीटरच्या आत) उभा राहून पुटपुटला, “देवगड हापूसची पेटी, पाच हजारला. पाहिजे असेल तर माझ्या मागून या.’’ मी काही न बोलता शहाण्या मुलासारखा घरी आलो. घरी आल्यावर सिनेमांच्या तिकिटांच्या काळय़ा बाजाराबद्दलचं सगळं आठवलं.

Related Stories

सत्तांतराचे वारे

Patil_p

हवी आहे दारुअतिरेक बंदी!

Patil_p

अंतःकरण शुद्ध झाले की,सत्त्वगुण वाढतो अध्याय तेरावा

Patil_p

कानकोरणे

Patil_p

फुकटातले पडले महागात…डेटावर व्हाट्सअपचा अधिकार

Patil_p

ईश्वर समर्थ नोळखती

Patil_p
error: Content is protected !!