तरुण भारत

कोरोनो चितपट, भीती उपासमारीची

आफ्रिकन नायजेरियातून पद्मनाभ बुवांनी साधला तरुण भारतशी संवाद

  • लॉकडाऊन कालावधी वाढला, तर जनता रस्त्यावर उतरण्याची भीती
  • अडिच लाख भारतीयांची चिंता वाढली, तोडग्याची अपेक्षा

शेखर सामंत / सिंधुदुर्ग:

Advertisements

नायजेरिया हा आफ्रिका खंडातील गरीब देश असला, तरी ‘इबोला’ या महाभयानक आजाराचा पूर्वानुभव गाठिशी असल्याने, पुरेशा वैद्यकीय सुविधा नसतानाही लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे प्रामाणिकपणे पालन करीत या देशाने कोरोनाची डाळ शिजू दिलेली नाही. मात्र या देशाला कोरोनापेक्षाही खरा धोका आहे, तो भूकमारीचा म्हणजेच उपासमारीचा. पूर्णपणे रोजंदारीवर अवलंबून असलेला हा देश कोरोनामुळे नव्हे, तर लॉकडाऊनमुळे हतबल झालाय. लॉकडाऊनची मुदत आणखी वाढली, तर अन्नासाठी या देशातील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहाणार नाही आणि तसं झालं तर या देशात मोठं अराजक माजू शकते. त्यामुळे या देशात उद्योग व्यवसायानिमित्त वास्तव्य करून असलेल्या अडीच लाख भारतीयांच्या हृदयात धडधड वाढू लागली आहे.

मूळ कोल्हापूरचे असले, तरी सिंधुदुर्गातील सावंतवाडी येथे राहून आपलं संपूर्ण शिक्षण पूर्ण करून नंतर इंजिनिअरींगचे उच्च शिक्षण घेऊन नायजेरीयात स्थाईक झालेले पद्मनाभ शंकर बुवा ‘तरुण भारत’शी संवाद साधत तेथील भारतीयांच्या मनातील भीती व्यक्त करीत होते.

 त्यांनी देशात कोरोनाची डाळ शिजू दिली नाही

 नायजेरियातील कोरोनाची माहिती देताना ते म्हणाले, आफ्रिका खंडातील या देशात फेब्रुवारी महिन्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला. त्यानंतर या देशाने तात्काळ देशात लॉकडाऊन जाहीर केले. येथे आतापर्यंत फक्त 1205 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यात 240 बरे होऊन घरी गेले व या संपूर्ण देशात 40 जणांचा मृत्यू झाला. थोडक्यात या देशाने आपल्या देशात कोरोनाची डाळ शिजू दिली नाही. गरीब देश आणि फारशा आरोग्यविषयक साधन सुविधा नसतानाही जगभरातील इतर कोणत्याही देशांपेक्षा या देशाने अधिक चांगल्या प्रकारे कोरोनाच्या मुक्त संचारास आळा घातला. या मागची कारणमिमांसा करताना बुवा म्हणाले, 2012 मध्ये ‘इबोला’ नावाच्या महाभयंकर आजाराने या देशात धुमाकूळ घातला होता. कोरोनापेक्षाही घातक असलेल्या या रोगाने संपूर्ण नायजेरीयात हजारो बळी घेतले. या रोगाला रोखण्यासाठी या देशाने 2012 मध्ये लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंन्सिंगचा वापर केला होता. तब्बल 82 दिवस या देशाने झुंज देत या आजारावर मात केली होती. त्यानंतर या देशातील नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग जवळपास अंगवळणीच पडलं. त्याचा लाभ कोरोनावर मात करण्यासाठी या देशाला झाला. लोकांनी प्रामाणिकपणे लॉकडाऊन, डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन पाळलं आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे या देशाला शक्य झाल्याचे ते म्हणाले.

तेल उत्पादक देश असूनही गरिबी

पद्मनाभ हे सावंतवाडीतील प्रा. डॉ. जी. ए. बुवा यांचे पुतणे. ते पेशाने इंजिनिअर आहेत. नायजेरीयात येथील कंपन्यांचे ऍटोमायझेशन करण्याचे काम ते करतात. मागील दोन वर्षांपासून ते या देशात राहतात. नायजेरीयाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱया ‘लेगोस’ या महानगरात ते राहतात. या शहराची लोकसंख्या दोन कोटी असल्याचे सांगून सुमारे अडीच लाख भारतीय येथे उद्योग-व्यवसायानिमित्त राहत असल्याचे ते म्हणाले.

 कोरोनापेक्षा उपासमारीची भीती

जागतिक बाजारपेठेत मागणीच घटल्याने तेलाच्या किमती अगदी रसातळाला पोहोचल्या. त्याचा नायजेरीयाच्या अर्थव्यवस्थेला जबर धक्का पोहोचला. त्यात येथील सरकार जनतेला भारताप्रमाणे रेशन वगैरे काही देत नाही. येथील 80 टक्के जनता रोजंदारीवर अवलंबून आहे. लॉकडाऊनमुळे रोजगाराचा मार्गच बंद झालाय. त्यात गोरगरीबांना सवलतीच्या दरात धान्यही उपलब्ध होत नाही. त्यामुळे उपासमारी सुरू झाली आहे. येथील प्रशासनाने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला, तर उपाशी जनता रस्त्यावर उतरून उत्पात माजवल्याशिवाय राहणार नाही. तसं झालं तर परिस्थिती हाताळणे या देशाला कठीण पडेल. या देशात रहाणाऱया अडिच लाख भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे येथील सारे भारतीय काहीसे चिंतीत असल्याचे ते म्हणाले. प्रशासनाला याची कल्पना असून कदाचित एक दिवस आड काम अशा पद्धतीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा प्रशासन विचार करीत असल्याचे ते म्हणाले. आम्ही सारे भारतीय विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमांतून येथील गोरगरीबांना मदत करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गवासीयांनी देखील जिल्हय़ात कोरोनाची डाळ शिजू दिली नाही, हे ‘तरुण भारत’च्या माध्यमातून समजल्यानंतर फार आनंद झाल्याचे ते म्हणाले.

Related Stories

रत्नागिरीत पेट्रोलची 90 पार तर डिझेल 80 रुपये प्रती लिटर

Patil_p

40 टक्के कर्मचाऱयांची कोरोना लसीला नकारघंटा

Patil_p

जिल्हय़ात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखा

NIKHIL_N

चिपळुणातील 19 सावकारांना नोटीस धाडणार!

Patil_p

ठोक निधीतील कामाबाबत 28 रोजी सुनावणी

triratna

वैभववाडीतही मोफत ‘कमळ थाळी’

NIKHIL_N
error: Content is protected !!